वैदेही भाग २

कहाणी आधुनिक सीतेची

वैदेही भाग २



रात्रभर जागे असलेला राघव तसेच आवरून ऑफिसला जायला निघाला.. त्याची चाहूल लागून वैदेही उठली..  

"सॉरी.. मला झोप लागली होती.. तू थांब.. मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्ता करते.."

" नको.. तू दमली असशील.. तू आज आराम कर.. मी बघतो आईने काही केले असेल तर.."

" मी एक विचारू?" वैदेही राघव जवळ जात म्हणाली..

" बोल ना.." 

" तू चिडला आहेस का?" वैदेही त्याला मिठीत घेत म्हणाली..

" नाही.. " राघवने मिठी घट्ट केली.. त्याचे डोळे पाणावले होते..

" आज माझ्या सोबत घरी थांबशील? खूप दिवस झाले आपण एकत्र वेळ घालवलाच नाही.."

" तू म्हणशील तसे.." राघवने सगळ्या मिटिंग कॅन्सल केल्या.. दोघे एकमेकांसोबतचा वेळ खऱ्या अर्थाने घालवत होते..

" राघव, तुला माहित आहे त्या दिवशी सोनोग्राफीचा रिपोर्ट काय आला ते?"

वैदेही त्याच्या कुशीत झोपली होती..

" तू न सांगता, मला कसे कळणार?"

" तू तरी कुठे विचारलेस?"

" मी वाट बघत होतो तुझ्या सांगण्याची.. "

" कधी रे सुधारणार तू? कधी तरी समोरून विचारना? असो.. डॉक्टरांनी जुळी बाळे आहेत असे सांगितले आहेत.."

" अरे वा.. डबल धमाका.." राघव खुश होऊन म्हणाला..

" हो ना.. मला आत्ताच टेन्शन आले आहे.. कसे होणार ते.."

" नको काळजी करूस.. होईल सगळे व्यवस्थित.."

" तू असशील तर मला कसलेच टेन्शन नाही.. तुला खरं सांगू.. मला ना खूप चांगली आई व्हायचे आहे.. आईबाबांनी मला जसे वाढवले आहे ना तसेच मला माझ्या बाळांना वाढवायचे आहे.. तू असशील ना माझ्यासोबत?" वैदेहीने विचारले..

"वैदेही.. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.. माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.. आईबाबांनंतर मी जर कोणावर निरतिशय प्रेम केले असेल तर ती तू आहेस.. माझ्यावर विश्वास ठेवशील?"

" मला माहीत आहे तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे.. तेवढे नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रेम माझे तुझ्यावर आहे.. ऐक ना.. मी ना अजून आईबाबांना , सौमित्र, उर्मिला कोणालाच हि बातमी सांगितली नाही.. सासूबाई म्हणाल्या होत्या तीन महिने तरी कोणाला सांगू नकोस म्हणून.. आता सांगूया?"

 लगेच दोघांनी व्हिडिओ कॉल करून हि बातमी इनामदारांकडे सांगितले..

बातमी ऐकून सगळे इतके खुश झाले कि डोहाळजेवणाचे प्लॅनिंगही सुरू झाले.. 

" अभिनंदन दादा, वहिनी.. फायनली मी काका होणार.." सौमित्र खुश होऊन म्हणाला..


" खूपच छान खबर बेटा.. वैदेही मी आणि उर्मिला लगेच येतो तिथे.."

" नाही आई.. आता नाही आपण ना ताईच्या सातव्या महिन्यात जाऊ. म्हणजे तिथे डोहाळजेवण पण करू.. आणि मला माझ्या भाचरांसोबत जास्त वेळ पण घालवता येईल.. आता जाऊन मी नाही हिची सेवा करणार.. ती करायला जिजू आहेतच.. हो ना जिजू.." उर्मिलाने वैदेहीला वेडावून दाखवले..

"पण आम्हाला तर तुला आत्ताच बघावेसे वाटते.. आणि तू पण अशी आहेस आत्ता सांगितलीस ना हि गोष्ट.." वैदेहीचे बाबा म्हणाले..

" हो, आम्ही एक काम करतो.. लवकर तिथे काही दिवसांकरिता येतो.. आपल्या तिकडच्या घरी काय आहे काय नाही पाहतो.. म्हणजे मग नंतर धावपळ नको व्हायला.." वैदेहीची आई म्हणाली..

त्या सगळ्यांचे प्रेम बघून वैदेही रडायला लागली.. तिथेही तिच अवस्था होती.. राघवने फोन बंद करून वैदेहीला जवळ घेतले..

" असेच माझ्यावर प्रेम करत रहा.." ती त्याला रडतच म्हणाली..

एक अख्खा दिवस घरी घालवल्यानंतर राघव खूप छान मूडमध्ये ऑफिसला जायला निघाला होता.. आज ऑफिसमध्ये सगळे त्याच्याकडे वळून बघत होते.. काहीतरी कुजबुजत होते.. पण त्याने पाहताच लोक गप्प बसत होते.. त्याला काही कळले नाही.. शेवटी त्याने आपल्या सेक्रेटरीला बोलावले..

" आज ऑफिसमध्ये कसली कुजबुज चालली आहे?" तिने उत्तर न देता मान खाली घातली..

" मी काय विचारतो आहे, कळले का?"

" हो सर.. ते रजतसर काल ऑफिसमध्ये आले होते.. बोलता बोलता त्यांनी परवा मॅमची गाडी कशी बंद पडली, मग तुम्ही त्यांना घेऊन कसे आलात हे सगळे स्टाफसमोर सांगितले.. म्हणून.." तिने कमी शब्दात जे हवे ते राघवला सांगितले.. राघवला त्या दिवशीचा रजतचा चेहरा समोर आला.. रागाने त्याने रजतला फोन लावला..

" का वागलास तू असा?"

" तुला आठवते मागे माझी एक छोटीशी चूक झाली होती.. म्हणून तू सगळ्या ऑफिससमोर माझा अपमान केला होतास.. मी तेव्हाच मनाशी ठरवले होते तुझा बदला घेईन.. माझ्याकडे त्या दिवसाचे फोटो पण आहेत.. नशीब समज मी ते कोणाला पाठवले नाहीत.."

" पण माझा राग तू वैदेहीवर का काढलास?" राघवने हताश होऊन विचारले..

" कारण तू एवढा श्रीमंत आहेस कि मी पैशाने तुला हरवू शकत नाही.. तुझा स्टाफही तुझ्याशी एकनिष्ठ आहे.. मग तुला खाली बघायला लावणारी हि संधी मी कशी बरे सोडेन.." राघव फोन हातात घेऊन सुन्नपणे बसला होता.. त्याने सौमित्रला फोन लावला.. " दादा.. आता या वेळेस फोन? सगळे ओके आहे ना?"

" सौमित्र आजच्या आज वैदेहीला तुझ्याकडे बोलावून घे.."

" अरे, असे अचानक काय झाले? काल तर सगळे व्यवस्थित होते.. आज अचानक?"

" मी तुला जे सांगतो ते कर.." कधी नव्हे ते राघव सौमित्रवर ओरडला..

काहीतरी विचित्र घडते आहे हे कळून सौमित्रने ऑफिसमधल्या जुन्या कर्मचाऱ्याला फोन केला.. त्याच्याकडून ऑफिसमध्ये काय झाले हे कळल्यावर काय बोलावे हेच त्याला सुचेना.. एवढ्या रात्री सौमित्र कोणाशी बोलतो आहे हे बघायला उर्मिलाही उठली..

" काय रे, एवढ्या रात्री कोणाचा फोन?"

" दादाचा?"

" अचानक? ताई बरी आहे ना?"

" उर्मिला, थोडा प्रॉब्लेम झाला आहे."

" पटापट बोल ना.. माझा जीव टांगणीला लागला आहे.."

सौमित्रने घडलेली घटना थोडक्यात उर्मिलाला सांगितली..

" दादा, बरे आहेत ना? ताईला त्रास होऊ नये म्हणून आईबाबा तिला भेटायला जाणार आहेत.. आणि ते तिला एकटीला इथे पाठवायचे म्हणत आहेत.. नॉट डन. मी बोलते त्यांच्याशी.."

" उर्मिला प्लीज आता तू चिडू नकोस.. दादाला मी पहिल्यांदाच एवढे चिडलेले बघितले आहे.. त्याला कोणी काही बोललेले आवडत नाही.. आणि हा जो रजत आहे त्याने अख्ख्या स्टाफसमोर वहिनीची बदनामी केली आहे.. मी त्याला तर बरोबर करतोच.. पण आपण सध्या वहिनीला इथे आणूया.. प्रकरण शांत होईपर्यंत.."

" मला हे अजिबात पटत नाही.. तिची जर चूकच नाही.. तर कोणीतरी काहीतरी बोलतो आहे म्हणून या अवस्थेत तिने का त्रास सहन करायचा? मी बोलते दादांशी.."

" दादाला नाही आवडणार.. तू त्याच्याशी बोललेले.."

" हे बघ.. तुझा भाऊ आहे म्हणून मी ऐकून घेतले आहे.. पण ती माझी मोठी बहिण आहे.. तिचा हा असा अपमान झालेला मला चालणार नाही.. ती ना जरा जास्तच चांगली आहे म्हणून तुझा भाऊ तिचा फायदा घेतो आहे. पण तो हे विसरला आहे कि तिच्या बाजूने मी आहे. आईबाबा आहेत.."

" हे बघ तू असे काहिही टोकाचे बोलू नकोस.. दादाने फक्त वहिनीला काही दिवस इथे आणायला सांगितले आहे.. आणि त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. तो काही चुकीचे नाही करणार.."

" त्याने करून पहावे.. गाठ माझ्याशी आहे म्हणावे.. या उर्मिलेशी."

" तू आता झोप.. मी उद्या आधी आईशी बोलतो.. पण इथे तुझ्या आईबाबांना लगेच काही बोलू नकोस.. उगाच त्यांना टेन्शन नको.."


" राघव, तुझा चेहरा का असा उतरलेला?"

" आई, मोठ्या पदावर असणे चुकीचे असते का ग?"

" मध्येच हे काय विचारतो आहेस? "

" सांग ना. मोठ्या पदावर असणे, एखाद्याला त्याच्या चुकीची शिक्षा देणे.. आपल्या घराण्याचा अभिमान असणे चुकीचे आहे का?"

" नाही रे बाळा.. ते चुकीचे नसते. चुकीचे असते दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेणे.. जशी तू आता स्वतःला करून घेतो आहेस.. तू आज दिवसभरात काही खाल्ले नाहीस. ते तुझ्या तोंडावरून दिसते आहे.. जा काहीतरी खाऊन घे. "

" आई मी आज गेस्टरूम मध्ये झोपतो.. माझे जेवण तिथेच पाठवून दे.."

" तू वैदेहीला भेटणार नाहीस?"

" आता नाही.." राघव विषण्णपणे म्हणाला..




राघव आणि वैदेहिच्या आयुष्यात पुढे काय होते.. पाहू पुढील भागात..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all