वैदेही

कहाणी आधुनिक सीतेची

वैदेही..



"राघव, मी आज मंदिरात जाते आहे देवीच्या.."

" आज? आज तर पावसाची शक्यता सांगितली आहे.. आणि तुझ्यासोबत कोण आहे?"

"अरे माझ्या दोन मैत्रिणींना मंदिर पाहायचे होते.. त्याही येणार होत्या पण अचानक त्यांचे कॅन्सल झाले.. आणि प्लीज भारतीय हवामान खात्यावर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलास?"

" विश्वास असे नाही.. पण पटकन डोक्यात आले.. आणि अचानक देवीला जायचे काही खास कारण?"

" हो.. तू नसताना मी देवीला नवस केला होता.. कि जेव्हा माझी ओटी खऱ्या अर्थाने भरेल.. तेव्हा दर्शनाला नक्की येईन.. तुला जमेल का माझ्यासोबत यायला?" वैदेही अपेक्षेने विचारत होती..

" मला खूप आवडले असते ग.. पण आज खूप महत्त्वाची कामे आहेत.. तू जाऊन ये आज नाव काढले आहेस तर.. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण दोघे जाऊ.."

" चालेल.. " वैदेही हिरमुसून म्हणाली..

" बरं कशी जाणार आहेस तू?"

"मी विचार करते आहे.. गाडी घेऊन जाईन.. चार तासाचे तर ड्रायव्हिंग आहे.. दोन तास जायला, दोन तास यायला.."

" अजिबात नाही.. देशमुखांची सून अशा अवस्थेत एकटी गाडी चालवत जाणार.. नाही.. तू एक काम कर.. सर्जाकाकांना घेऊन जा सोबत.."

" अरे.. ते आज येणार नाहीत.. त्यांच्या घरी थोडी अडचण आहे.. त्यांचा फोन आला होता.. त्यांनी त्यांच्या भाच्याला पाठवले आहे.. पण नकोच.. आणि मला गाडी चांगली चालवता येते.. लग्नाआधी सुद्धा चालवत होतेच कि मी.. आणि अशी अवस्था म्हणजे काय? आत्ताशी तिसरा महिना सुरू आहे.."

" पण तरिही मला माझ्या बाळांच्या बाबतीत काहीच रिस्क घ्यायची नाही. शेवटी देशमुख घराण्याचे वंशज आहेत ते.."

" म्हणजे तुला माझ्यापेक्षा तुझ्या घराण्याची प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची आहे?"

" असे नाही ग. पण आमचे एवढे मोठे घराणे.. त्याला कोणी नाव ठेवू नये असे वाटते.. जाऊ दे.. असेच बोलत राहिलो तर इथेच उशीर होईल.. आणि घाटाचा रस्ता आहे. लवकर जा आणि अंधार पडायच्या आत या.." राघव वैदेहीला मिठीत घेत म्हणाला..

    वैदेही निघाली.. सोबत नवीन ड्रायव्हर होता.. त्याला बघून राघवची एक भुवई चढली.. पण आधीच तो वैदेहीला ड्रायव्हरला घेऊन जा म्हटला होता म्हणून काही बोलताही येईना.. वैदेही देवीच्या मंदिरात पोचली.. तिने मनोभावे देवीची ओटी भरली.. नमस्कार केला.. तिथेच महाप्रसाद घेऊन ती परत निघाली.. निघताना तिची गाडी बंद पडली.. ती दुरुस्त होईपर्यंत उशीर झाला.. तिने हे कळवायला राघवला फोन केला.. पण त्याने मिटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलला नाही.. गाडी दुरुस्त करून ती परत निघाली तोच घाटात परत गाडी बंद पडली.. वैदेही थकली पण होती त्याहीपेक्षा घाबरली ही होती.. राघवला आणि त्याच्या आईला असे रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहिलेले आवडायचे नाही.. त्यात घाटात रेन्ज नसल्याने फोनही लागत नव्हता.. देवीचे हे मंदिर थोडेसे आडबाजूला होते. तिथे गर्दी फक्त रविवारी आणि यात्रेच्या दिवशी.. त्यामुळे त्या रस्त्यावर गाड्याही कमीच असायच्या.. त्यात भर म्हणून कि काय, धो धो पावसाला सुरुवात झाली. काय करावे ते तिला समजेनाच.. 

" ताई, तुम्ही आतच बसा. मी बघतो दुसरी गाडी मिळते का?"

"अरे पण या पावसात कुठे गाडी मिळणार? देवा कसे रे असे मध्येच अडकलो.. फोनही लागत नाहीये.. मला तर काहीच सुचत नाहीये.." टेन्शनमुळे आणि थंडीमुळे वैदेही चक्कर येऊन गाडीत पडली.. त्या ड्रायव्हरला सुद्धा कळले नाही काय करायचे ते.. तो पाठच्या सीटवर गेला.. वैदेहीच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात समोर एक गाडी थांबली. त्या गाडीतून राघव आणि त्याचे दोन मित्र उतरले.. वैदेहीचा फोन लागत नाही, ती घरी आली नाही हे बघून राघव खूप घाबरला होता. त्याने जेव्हा मंदिरात चौकशी केली तेव्हा वैदेही कधीची निघाली आहे हे त्याला कळले.. त्यात धो धो पडणारा पाऊस.. त्याने पावसात वैदेहीला शोधायला जायचा निर्णय घेतला.. आणि भर रस्त्यात त्याला आपली कार उभी असलेली दिसली. त्या गाडीत ड्रायव्हरच्या हातात शुद्धीवर येत असलेली वैदेही.. राघवला पाहून ड्रायव्हर पटकन बाजूला झाला.. राघव पुढे झाला.. वैदेहीने रडत त्याला मिठी मारली..

" संध्याकाळपासून मी इथे अडकले आहे.. ना तुझा फोन लागला ना दुसरी कोणती गाडी दिसली.. " वैदेहीला तेही सहन झाले नाही.. ती परत बेशुद्ध झाली.. ते बघून ड्रायव्हर म्हणाला.. 

" मगापासून त्या अश्याच बेशुद्ध होत आहेत.."

राघवने त्याच्याकडे पाहिले..

" तू गाडीत थांब. मी लगेच गाडी टो करून नेण्याची सोय करतो.." राघवने वैदेहीला उचलून दुसर्‍या गाडीत ठेवले.. तिला घरी न नेता तो थेट दवाखान्यात घेऊन गेला.. तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासले.. सगळे ठिक आहे हे समजल्यावर तो तिला घेऊन घरी आला. तोपर्यंत ती गाडीसुद्धा घरी आली होती. गाडीत खरेच मोठा प्रॉब्लेम झाला होता.. ज्यामुळे गाडी चालू होत नव्हती.. राघवची आईसुद्धा वैदेहीची वाट पहात होती.. तिला सुखरूप पाहून त्यांना बरे वाटले.. तिला खाऊपिऊ घालून तिला त्यांनी खोलीत पाठवले.. ती अजूनही थरथरत होती म्हणून राघव तिला घेऊन खोलीत आला. आत येताच वैदेहीने त्याला घट्ट मिठी मारली.. 

"मी खूप घाबरले होते.. गाडी बंद पडली.. अंधार झाला होता.. पाऊस पडत होता.. तू चिडशील असे मला वाटले.." राघवने काहीच न बोलता फक्त तिला पाठीवर थोपटले.. वैदेही कपडे बदलून झोपायला गेली.. दिवसभर झालेल्या दगदगीने ती थकली होती. एखाद्या निरागस बाळासारखी ती झोपी गेली.. पण राघव मात्र झोपू शकला नाही.. त्याच्या डोळ्यासमोर सतत ड्रायव्हरच्या हातात असलेली वैदेही येत होती. आणि ते पाहून त्याच्या मित्रांच्या चेहर्‍यावरचे भाव त्याला राहून राहून आठवत होते.. काय नव्हते त्या भावांत.. एक प्रकारची तुच्छता.. झोप येत नव्हती म्हणून राघव आरामखुर्चीत बसला.. त्या खुर्चीच्या हलण्याच्या लयीत त्याच्या डोळ्यासमोरून त्याचा जीवनपट जाऊ लागला..

        राघव देशमुख.. देशमुख घराण्याचा मोठा मुलगा.. त्याचा धाकटा भाऊ सौमित्र.. दोघांमध्येही असलेले एकाच वर्षाचे अंतर.. दोघांचे एकमेकांवर असलेले भरपूर प्रेम त्यामुळे जिथे तिथे ते रामलक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध होते.. खरेच सौमित्रही जसा राघव वागायचा तसेच वागायचा प्रयत्न करायचा.. राघव परदेशी शिकायला गेला तर त्याच्यापाठोपाठ यानेही त्याच विद्यापीठात प्रवेश मिळविला.. तिथेच यांची ओळख झाली वैदेही आणि उर्मिलाशी.. वैदेही आणि उर्मिला , अनिरुद्ध इनामदार यांच्या मुली.. अनेक वर्ष परदेशात स्थायिक झालेले. खरेतर अनेक वर्ष त्यांना मुल होत नव्हते म्हणून त्यांनी अगदी तान्ह्या वैदेहीला दत्तक घेतले होते.. पण ती घरात येताच वर्षभरातच उर्मिलाचा जन्म झाला.. तरिही वैदेहीवरचे त्यांचे प्रेम तसेच राहिले.. त्यांचा मोठेपणा असा कि त्यांनी तिला दत्तक घेतले आहे हि गोष्ट त्यांनी कधीच लपवली नाही.. वैदेहीवर असलेले त्यांचे प्रेम पाहून तिनेही हे आपले दत्तक पालक आहेत याचा कधीच इश्यू केला नाही.. दिवस जात होते.. मुली दिसायला सुंदर होत्याच.. त्यातही इनामदारांनी त्यांच्या इस्टेटीचे दोन समान वाटे होतील हे आधीच सांगितल्यामुळे दोघींनाही लग्नासाठी भरपूर स्थळे येत होती.. पण राघव आणि वैदेहीचे प्रथम दर्शनीच एकमेकांवर प्रेम जडले.. वैदेही जरी दत्तक मुलगी असली तरी तिचे रूप, वळण, संस्कार पाहून राघवच्या आईबाबांनी लग्नाला मान्यता दिली.. तोवर सौमित्र आणि उर्मिलाचे सूरही जुळले. आणि लगेचच एकाच मांडवात दोन्ही लग्ने लागली.. राघव मोठा मुलगा म्हणून देशमुखांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात परत आला. तर सौमित्र आणि उर्मिला तिथेच इनामदारांचा व्यवसाय सांभाळू लागले.. सगळे सुरळीत चालले असताना बिझनेस वाढविण्यासाठी म्हणून राघवला साधारण वर्षभरासाठी परदेशी जावे लागले. त्याच सुमारास त्याचे वडील आजारी असल्यामुळे वैदेही मात्र भारतातच राहिली.. वडिलांचे निधन झाल्यामुळे राघव परत आला होता.. सौमित्र आणि उर्मिलाही येऊन गेले होते. त्यानंतर सहाच महिन्यांनी वैदेहीने गोड बातमी दिली होती.. खूप आनंदात होते हे सगळे.. पण आता मध्येच घडलेला कालचा प्रसंग. विचार करून राघवचे डोके शिणले होते.. त्याने परत पलंगावर झोपलेल्या वैदेहीकडे पाहिले. त्याचे तिच्यावरचे प्रेम उफाळून आले.. त्याला तिला मिठीत घ्यावेसे वाटले.. पण.. पण..

         



   राघवच्या मनात नक्की काय आहे? पुढे काय होईल राघव, वैदेहीच्या संसाराचे? बघूया पुढील भागात..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

Photo credit goes to nidtoons

🎭 Series Post

View all