वहिनीचे माहेरपण (भाग ४ अंतिम)

प्रत्येक सून ही कोणाची तरी मुलगी असतेच.


राधिकाची आवराआवर सुरू होती. तेवढ्यात तिची लहान नणंद  मेघा, दारात उभी.

"काय ग तू तर रात्री उशिरा येणार होतीस ना?" सविता ताईंनी खोचकपणे लेकीला विचारले.

"आले लवकर, आता मग जाऊ का परत?"

"तू सरळ कधी सरळ बोलणारच नाहीस का माझ्यासोबत? बरं ते जाऊ दे, मुले कुठे आहेत?"

"अगं त्यांची आत्या आली आहे घरी. म्हणून मग ते यायलाच तयार नाहीत. उद्या परवा येतील हे घेवून त्यांना.

"असंच करावं, एकतर वर्षातून एकदा नाहीतर दोनदाच यायचं असं सुट्टीला आणि मुलांना घरीच ठेवून यायचं. आम्हालाही वाटतं सणाच्या निमित्ताने तरी सगळ्यांनी एकत्र यावं. आनंदाने चार दिवस राहावं. पण इथे आमच्या मनाचा कोण विचार करणार ना?"

"आई आता तू जे काही बोललीस ते फक्त आमच्यासाठीच आहे का ग? नाही म्हणजे एक आई म्हणून तुझा विचार अगदी बरोबर आहे. पण जगात तू एकटीच आई नाही ना. आपल्या लेकीने चार दोन दिवस मुलांसह माहेरी यावं. सासरी रोजच काम करते ती म्हणून मग माहेरपण मात्र आनंदात घालवावं. फक्त ह्या नियमात तुझी सून म्हणजे आमची एकुलती एक वहिनी बसत नाही का ग?
अगं तिलाही आई वडील आहेत, दोन भाऊ, दोन भावजया आहेत. असं असतानाही तिने मात्र फक्त सासरचा विचार करायचा. आणि जायचंच असेल माहेरी तर मुलांना मात्र न्यायचे नाही. का? तर तिकडे गेल्यावर तिचं लक्ष नसतं मुलांकडे. पुन्हा इकडे आल्यावर मुले आजारी पडतात. मग आमची मुले नाही का ग आजारी पडणार इकडे आल्यावर? आम्ही किंवा आमच्या सासरच्या लोकांनी तुझ्यासारखा विचार करून जर आमच्या माहेरी येण्यावर अशी बंधने घातली तर तुला ते आवडेल?"

मेघा सलग बोलत होती. सविता ताई फक्त ऐकून घेत होत्या. त्यांना मेघाचे मुद्दे जरी पटले असले तरी रुचले मात्र अजिबात नव्हते.

"तुम्ही माझ्या लेकी आहात आणि मी तुमची आई. उगीच मला अक्कल शिकवायच्या भानगडीत पडू नका. कालपासून एक लेक अक्कल शिकवत होती, तिची कमी होती म्हणून की काय आता तू आलीस."

"इथून पुढे मी काहीही बोलत नाही बायांनो. शेवटी मीच मूर्ख. कारण तुमच्या आईने उन्हात उभे राहूनच हे केस पिलकवलेत ना."

नकळतपणे सविता ताईंच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. कारण त्यांच्याशी असे कोणी वागलेले, बोललेले त्यांना अजिबात आवडायचे नाही.

प्रत्येकवेळी सण आला आणि राधिकाने माहेरी जायचे ठरवले की सविता ताईंचे हे असे वागणे ठरलेलेच असायचे. त्यांच्या ह्या अशा वागण्याला घरातील सर्वचजण आता कंटाळले होते.

थोडक्यात घरात त्यांची दहशत होती. कोणी त्यांना विरोध केलेला त्यांना पटायचे नाही. त्यामुळेच कोणी जास्त करून त्यांच्या नादी लागतच नव्हते. पण त्यामुळे त्यांना त्यांची चूकदेखील समजत नव्हती.

आज मेघाने मात्र, जे होईल ते होईल असा विचार करून एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच असे ठरवले आणि ते करून देखील दाखवले.

पण त्यामुळे सविताताई मात्र मनातून खूपच दुखावल्या गेल्या.

"ज्यांना आज लहानाचं मोठं केलं त्याच आज मला अशा उलट बोलत आहेत. ह्यांच्यापेक्षा माझी सून परवडली. कितीही राग राग करा तिचा तरी शब्दाने कधी उलट बोलत नाही."

विचार करता करता सविता ताईंच्या एक गोष्ट लक्षात आली. "खरंच मी समजते तितकी राधिका वाईट नाही. मी खूपच वाईट वागते तिच्यासोबत. पण ती मात्र तिचे कर्तव्य बजावत राहते नेहमी. ती माहेरी जाणार म्हटले की माझ्या मनात धडकीच भरते. तिची आता इतकी सवय झाली आहे ना मला की तिच्याशिवाय मी एकटी काहीच करू शकत नाही असे वाटत राहते. आणि तिच्या घरात नसण्याची मी कल्पनाच करु शकत नाही. म्हणून मग दरवेळी माझ्याकडून ह्या अशा चुका होत असतात. पण मेघामुळेच आज याची निदान जाणीव तरी झाली मला."

"सासू कधीच सुनेची आई होवू शकत नाही, हे मान्य आहे. कारण आईची जागा दुसरं कोणीच घेवू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. पण मी आता ठरवलंय मी राधिकाची आई बनण्याचा प्रयत्न जरी नाही केला तरी तिची मैत्रीण बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेल."

आज पहिल्यांदा सविताताईंनी सुनेला मनापासून माहेरी पाठवले. मनातील आनंद त्यांनी बोलून जरी दाखवला नाही तरी त्यांच्या वागणुकीतून तो प्रत्यक्ष दिसत होता.

इतक्या वर्षातून आज पहिल्यांदा राधिकाला सासूच्या वागण्यातील बदल जाणवत होता. भावासोबत आनंदाने ती माहेरी गेली. सविताताईंनी दोन्ही मुलांनाही तिच्यासोबत पाठवले. ह्यावेळी पहिल्यांदा राधिकाच्या पुन्हा सासरी येण्याचा दिवस निश्चित नव्हता. कारण सविताताईंनी जाणूनबुजून \"ह्या ह्या दिवशी हजर हो\" असे सांगितले नव्हते.

दोन्ही नंदांमुळेच आज त्यांच्या वहिनीचे माहेरपण आनंदाने सजले होते. एरव्ही माहेरी गेल्यावर फक्त सासरचा विचार करणारी राधिका ह्यावेळी मात्र माहेरवाशीण म्हणून आनंदाने मिरवत होती. एरव्ही माहेरी गेल्यानंतर देखील मनात सासूची भीती बाळगणारी राधिका आज मात्र माहेरच्या गोकुळात मनापासून रमली होती.

शेवटी लेकींशिवाय माहेर अपूर्ण जरी असले तरी सूनेशिवाय त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. कारण ती देखील कोणाची तरी लेकच असते ना.

समाप्त

वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. तसे झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all