वहिनीचे माहेरपण (भाग ३)

प्रत्येक सून ही कोणाची तरी लेक असतेच.


"आई अगं आज सण आहे, आजतरी जाऊ दे वहिनीला माहेरी." सविता ताईंचा मूड पाहून पुन्हा एकदा माधुरी बोलली.

"तुझं काय ग सुरू आहे कालपासून. जिला जायचंय तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. आणि तू आल्यापासून नुसती तिची वकिली करत आहेस. तिने दिले वाटतं तिचे वकीलपत्र तुझ्या हाती?"

"आई अगं आम्ही माहेरी आलो मग तिला जर पाठवले नाही तर लोकं उगीच नावे ठेवतील ग. बरं नाही दिसत ते म्हणून म्हटलं."

"लोकांना तेवढीच कामं असतात.\"स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून.\" हीच तर रीत असते समाजाची."

एवढं सगळं होवूनही सविता ताईंना मात्र त्यांची चूक समजतच नव्हती.

तेवढ्यात मेघाचा म्हणजेच लहान्या लेकीचा फोन आला सविता ताईंना.
"हॅलो आई, अगं मला यायला खूप उशीर होईल. तू वहिनीला जायला सांग."

"तू आधी ये मग पाहू पुढचं पुढं."

"आई अगं माझा तिकडे येण्याचा आणि तिच्या जाण्याचा काय संबंध? अगं तिलाही माहेर आहेच की. जशी तुला माझी ओढ लागली आहे तशीच तिच्या माहेरच्यांनादेखील तिची ओढ लागलीच असणार ना. थोडं तरी समजून घे अगं. वर्षातून एकदाच येतो सण. त्यासाठी लेकी याव्यात असं तुला वाटतं पण सुनेने माहेरी जावू नये, अशी कशी ग तुझी विचारसरणी.?77

सविता ताईंनी रागातच फोन कट केला.

"ये बाई आवर आणि जा माहेरी. माझ्या लेकिंना कसली भुरळ पाडलीस देवच जाणे. आईची कमी आणि भावाजयीचीच त्यांना जास्त पडलेली आहे."

"झालं....एवढं सगळं करूनही खापर शेवटी माझ्याच माथी फुटलं म्हणायचं. माहेरी जायचं म्हटलं की काय होतं यांना देवच जाणे. मी फक्त काम करत राहायचं. मी दोन दिवस जरी घर सोडून कुठे जायचं म्हटलं की म्हातारीच्या अंगात काय येतं काय माहिती?"

मनातल्या मनात राधिकाच्या विचारांनी थैमान घातले होते. आता तिलाही प्रश्न पडला, ह्या अशा परिस्थितीत माहेरी जावे का नाही ते?

परंतु, तितक्यात राधिकाचा भाऊ चारचाकी घेऊन दारात उभा.

"घ्या, आधीच सगळं ठरलंय हिचं मग नाटकं कशाला करायची उगाच.?"
सविताताई सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलल्या.

"राधिकाही विचारात पडली, मी तर रिषभला बोलावले नाही मग अचानक हा कसा आला?"
राधिका थोडी विचारांत पडली. तिने रिषभला चहा पाणी दिले. सविताताई रागातच बाहेर निघून गेल्या. 

"माझ्या माहेरचे कोणी जरी आले तरी आईंचे वागणे हे असेच असते. अजून काय केलं पाहिजे मी या घरासाठी? देवच जाणे."  आवरता आवरता राधिकाचे विचारचक्र देखील सुरूच होते.

बाहेर तोपर्यंत आजीने दोन्ही नातवंडांना बरोबर फितवले.

"आपली मेघा आत्या येणार आहे आज. सोनू आणि मोनू पण येतील. मग तुम्ही मामाकडे गेल्यावर आम्ही  त्यांचे खूप लाड करणार. मस्त मस्त खाऊ पण आणणार. तुम्ही जा तुमच्या मामासोबत."

आता यश आणि रिया दोघेही,"आम्हाला नाही यायचं आई तुझ्यासोबत म्हणत मामाच्या घरी न जाण्याचा आग्रह ते करू लागले.

"आई तू जा मामासोबत आम्ही नाही येत." दोघेही आता काही केल्या ऐकेनात.

मामाच्या गावी जाण्यासाठी आतापर्यंत आनंदाने उड्या मारणारी मुले आता आम्हाला नाही यायचे म्हणून अडून बसली होती.

सविता ताईंच्या या अशा वागण्यामुळे दोन्ही नातवंडांना मामाच्या गावची, तिकडच्या आजी आजोबांची ओढ अजिबात राहिली नव्हती. आणि हीच गोष्ट सविता ताईंसाठी खूप अभिमानास्पद वाटत होती.
दुरुनच त्या राधिकाची गंमत पाहत होत्या. मुलांनी आईला ऐनवेळी तिच्यासोबत जायला नकार दिल्यामुळे सविता ताईंच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

क्रमशः

जातील का मुले आता राधिका सोबत त्यांच्या मामाच्या घरी? होईल का सविता ताईंच्या मनासारखे? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all