वहिनीचे माहेरपण (भाग २)

प्रत्येक सून ही कोणाची तरी लेक असतेच.


"अगं माधुरी, मेघाला फोन तरी करून बघ.. कधी येणार आहे विचारुन घे तिला."

"येईल ग आई, आज नाही आली तर उद्या येईल."

"अगं आज आली असती तर मलाही बरे वाटले असते. ती नाही तर कसं चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय. दरवेळी आल्या की दोघी सोबतच येता. नातवंडांना पाहिलं तर मलाही बरं वाटतं. कधी येते ती असं झालंय."

आईच्या या बोलण्यावर उत्तर देण्यासाठी जवळपास माधुरीने ओठावर आलेले शब्द गिळून घेतले.
"आता जर मी काही बोलले तर उगीच वाद होतील. पुन्हा सगळे खापर वहिनीच्या माथी फुटेल. असे काही झाले तर तिला माहेरी जाता येईल यावर शंकाच वाटते. त्यापेक्षा ती गेल्यावर बघुयात." म्हणत माधुरीने सध्या तरी गप्प बसण्यातच शहाणपण मानले.

तरी बघुयात वहिनीच्या माहेरी जाण्यावर आईचे काय मत आहे. म्हणून मग माधुरीने जरा घाबरतच आईला प्रश्न केला.

"काय ग आई, वहिनी कधी जाणार आहे माहेरी?"

"आता मेघा नाही आली तर तिला कसलं जाता येतंय."

"म्हणजे, सणा साठी तिला पाठवायचे नाही?"

"पाठवायचे नाही, असे कुठे म्हटले मी. आता नाही गेली तर नंतर जाईल ती. आणि तसंही तिची आई आजारी होती तेव्हा गेलीच होती की आठ दिवस. इथे माझे किती हाल झाले त्या काळात, हा विचार नाही केला तिने."

"हे खरे कारण आहे तर. ती आठ दिवस माहेरी राहून आली आणि इकडे एकटीने सगळं करताना हिचे हाल झाले. याचा बदला घेत आहे तर आई."

आता कुठे माधुरीला समजले, दर वेळी वहिनी माहेरी जाणार म्हटले की असेच काही ना काही कारण सांगून आई वहिनीला माहेरी जाण्यापासून रोखत असते. पण खूप झालं आता. ती ऐकून घेते, उलट काही बोलत नाही म्हणून तिच्या चांगुलपणाचा आई फायदाच घेत आहे.

"बरं आई तू बस इथे मुलांकडे लक्ष ठेव मी वहिनीला मदत करू लागते स्वयंपाकात."

"काही नको बस इथे." माधुरीच्या हाताला धरून आईने तिला खाली बसवले.

"अगं तुमच्या घरी रोज करताच ना कामं. चार दिवस माहेरी येता तरी शांत बसवत नाही का? राधिका करतिये ना आणि ती काही बोलत नाही मग तू कशाला जातेस पुढे पुढे करायला?"

"आई अगं पण दोन माणसं वाढली तरी काम वाढतं ना. ती तरी करुन करुन किती करणार ग? आल्यापासून बघते मी, तिची किती धावपळ सुरू आहे. तेवढीच माझी मदत होईल तिला."

"असंच डोक्यावर घेवून ठेवलंय तिला. तुम्ही तिला साथ देता म्हणून तर दरवेळी तिचं फावतं. तुमच्यासमोर अशी गरीब गाई सारखी वागते. पाठीमागे दाखवायचे रूप वेगळेच आहे तिचे. नुसता माहेरी ओढा आहे तिचा. माहेरचे फोन आले तर माझ्यासमोर बोलत नाही. आणि माझ्या माघारी मात्र तासनतास फोन सुरू असतो. सांगत असेल माहेरच्यांना माझे गाऱ्हाणे. दुसरं येतच काय तिला?"

"गाऱ्हाणी सांगायला आपणच जागा नाही द्यायची ना मग."माधुरी मनातच बोलली. 

तेवढ्यात राधिकाने जेवण्यासाठी सर्वांना आवाज दिला.

अखेर आईने माधुरीला किचनपर्यंत पोहोचू दिलेच नाही. सगळा स्वयंपाक राधिकाने एकटीनेच केला.

सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर माधुरीने पुन्हा एकदा भावजयीला मदत व्हावी म्हणून जेवणाची भांडी उचलायला सुरुवात केली.

सविता ताईंनी पुन्हा हटकले, "अगं राहू दे ग घासेल ती. तू चल आपण बाहेर शतपावली करून येऊ."

"थांब ग आई, माझ्या घरी असते तर मी केलेच असते ना. मग आता केले ते कुठे बिघडलं?"

"ताई उचलते मी राहू द्या ओ. तुम्ही जा मी आवरते पटकन्." राधिकाने हळूच नजरेने इशारा केला. "खरंच जा, मी करते."

ननंदेने आपल्याला कामात मदत करावी असे राधिकाला अजिबात वाटत नव्हते. फक्त सासूकडून लेक आणि सुनेमध्ये होत असलेला भेदभाव तिच्या मनाला लागत होता.

त्यात माधुरी थोडी विचारपूर्वक वागणारी होती. उगीच आपल्या बोलण्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, यासाठीच ती सर्वांच्या मनाचा विचार करून वागत होती. त्यामुळेच आईच्या चुका दिसत असूनही ती अजूनही शांतच होती. मेघा मात्र माधुरीच्या पूर्णपणे विरुद्ध होती.

क्रमशः

सविता ताईंना खरंच त्यांची चूक समजेल का? की आहे असेच पुढेही सुरूच राहणार. माधुरीने प्रयत्न करूनही ती आईला तिची चूक दाखवून देवू शकली नाही.आता मेघाला तरी ते जमेल का?जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all