वहिनीचा मान भाग अंतिम

Vahini Ani Tichya Nanandechi Gosht

लग्नाची तारीख जवळ येत होती. आकांक्षाचे मन वळवण्याचे साधनाने बरेच प्रयत्न केले होते. मात्र आकांक्षा आपला हेका सोडायला तयार नव्हती. आता आकांक्षाकडे लक्ष द्यायचे नाही असे साधनाने मनोमन ठरवून टाकले.

आदित्यही तिला म्हणाला, "समोरच्या माणसाकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे आपल्याला त्रास कमी होतो. समोरच्या व्यक्तीचे वागणे आपल्या हातात नसते. पण आपले वागणे कसे असावे हे आपण ठरवू शकतो ना? मग झाले तर. "


लग्नाचा दिवस उजाडला. लग्न पार पडले. आकांक्षाच्या सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरच्या मंडळींचा योग्य तो मानपान केला. तसाच एकुलती एक वहिनी म्हणून साधनाचा मानपान केला आणि तिचे कौतुकही केले. हे पाहून साधनाच्या सासुबाईंना खूप बरे वाटले. 

आकांक्षा मात्र नाराज झाली. "ज्याची योग्यता जेवढी तेवढंच त्याला मिळायला हवं." हे ऐकून साधनाच्या सासुबाईंचा राग अनावर झाला. पण आपल्याच लेकीचे लग्न म्हणून त्या गप्प बसल्या. साधनाने आपल्या डोळ्यातले पाणी कसेबसे परतवले आणि ती तशीच उभी राहिली. 

नेमके हे शब्द आकांक्षाच्या सासुबाईंच्या कानावर पडले. "आकांक्षा, ज्याचा मान त्याला द्यावाच लागतो. आपल्या घरी असे चालायचे नाही बरं. माझ्या एकुलत्या एका सुनेकडून मी उत्तम रिती रिवाजाची अपेक्षा करते. हे विसरू नको." आकांक्षाच्या सासुबाई हसत हसत म्हणाल्या.

भर मांडवात, लग्नाच्या दिवशी सासुबाई बोलल्या म्हणून आकांक्षाला फार वाईट वाटले. 
'आपण वहिनीला विनाकारण खूप काही बोललो, तिचा अपमान केला. याचे तिला किती वाईट वाटले असेल?' याची आकांक्षाला चांगलीच कल्पना आली. 'खरचं चूक झाली माझी.' आता आकांक्षाला वहिनीची माफी मागायची होती.


पाठवणीची वेळ झाली. तशी आकांक्षाची आई तिच्या सासुबाईंपुढे हात जोडून उभा राहिली. "माझी पोर भलतीच अल्लड आहे. प्रसंगी आईच्या मायेने तिचा कान पकडायला विसरू नका." 

"आई, अगं मुलीला सांभाळून घ्या असं म्हणायचं ना? हे काय बोलते आहेस तू?" आकांक्षा आपल्या आईला म्हणाली. 

 सासुबाई तुझ्याकडून उत्तम रितीरिवाज पाळण्याची अपेक्षा करतात. आपल्या वहिनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आणि तसे वागण्याचा प्रयत्न कर आणि त्यातही चूक झाली, सासुबाई बोलल्या तर आपली आईच बोलली असे समज." आई आकांक्षाला जवळ घेत म्हणाली. 

आकांक्षा पुढे येऊन आपल्या वहिनी समोर उभी राहिली. तिच्याकडे पाहण्याचे धाडस आकांक्षाला होईना. खाली मान घालून ती म्हणाली, "वहिनी, मी येते." 

"हम्म्म." साधना इतकेच म्हणाली आणि आदित्यच्या जवळ जाऊन उभी राहिली.

आकांक्षाला वाटले, 'वहिनी आपल्याला जवळ घेईल. सारं विसरून आपल्या पाठवणीच्या वेळी पोटभर रडेल.' पण तसे झाले नाही. 

आकांक्षा आपल्या दादा समोर आली. "मला माफ कर दादा.." 

"केवळ माफ कर म्हटल्याने झालेला अपमान कधीच भरून निघत नसतो अशू." आदित्यने मायेने आकांक्षाच्या डोक्यावरून हात फिरवला. 

बाबांचा निरोप घेऊन आकांक्षा सजवलेल्या गाडीत जाऊन बसली. गाडी दूर गेली, तसा साधनाचा बांध फुटला. ती ओक्साबोक्षी रडू लागली. इतके दिवस मनात साचलेले दुःख त्या अश्रूंवाटे बाहेर पडत होते. 
"आई, मी माफ केलं आकांक्षाला. नाहीतर तिच्या वागण्याचा त्रास मला होत राहील." साधना आपल्या सासुबाईंना म्हणाली.  
तसे सासुबाईंनी तिला जवळ घेतले आणि बराच वेळ त्या तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिल्या..अगदी आईच्या मायेने.

समाप्त

©️®️सायली.

🎭 Series Post

View all