Login

वहिनीचा मान भाग 3

Vahini Ani Tichya Nanandechi Gosht
"बस झालं आकांक्षा. कधीचा पाहतो आहे मी, साधना तुला कशातच नको आहे. दोन महिन्यांत लग्न करून तू इथून निघून जाशील. नंतर तुझं माहेरपण सजवायला आम्हीच तर आहोत ना?" अजून अधिक न बोलता आदित्य साधनाला घेऊन तिथून निघाला. 
उगीच वादाला वाद नको म्हणून साधनाच्या सासुबाई गप्प बसल्या.

"बाबा, आकांक्षाला समजवा जरा. लग्न ठरलं म्हणून माहेरची माणसं लगेच परकी होत नाही. " आदित्य रात्री जेवताना म्हणाला.

"मी पाहतो आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आकांक्षाचे घरात लक्ष नाही. केव्हा बघावं तेव्हा तो फोन हातात असतो! दोघे इतके काय बोलतात हे देवालाच ठाऊक." बाबांनी आदित्यची री ओढली.

"हो ना.. आकांक्षा आता घरात धड कोणाशी बोलतही नाही." साधना मध्येच म्हणाली. 

"हम्म्म. आधी तर आमचं वहिनी शिवाय पानही
 हालायचं नाही आणि आता कोण कुठली वहिनी?" साधनाच्या सासुबाई आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या. 

"आई, वहिनीने कधी स्वतःला आरशात पाहिले आहे का? किती साधी राहते ती? तिचे कपडेही खूप साधे असतात. केसही बघ ना, आहेत लांब सडक. मात्र सदा काकुबाईसारखे बांधलेले असतात. कित्ती ऑड वाटतं ते. 
त्यामानाने मी आणि अमेय आम्ही दोघे किती छान राहतो! एकदम पॉश, टापटीप. तसंही वहिनीचं माहेर अगदी साधं आहे. मग तिच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? "आकांक्षा साधनाकडे न पाहताच आईला म्हणाली.

"अशू, हे आता अति होतयं. ती तुझी सख्खी आणि एकुलती एक वहिनी आहे हे विसरू नकोस अजिबात. अगं, इतके दिवस तुला काही प्रॉब्लेम नव्हता ना? मग आता अचानक असं काय बदललं? तिने कसं राहावं हा तिचा प्रश्न आहे. त्यात तुला ऑड वाटण्यासारखे काहीच नाही." साधनाच्या सासुबाई आकांक्षाला ओरडल्या.

"आकांक्षा, तू जर माहेरच्या माणसांचा मान ठेवला नाहीस तर पुढे तुझी सासरची माणसे आमचा मान ठेवणार नाहीत." बाबा समजुतीच्या स्वरात म्हणाले.

"बाबा, अहो वहिनीला काय मान द्यायचा? तुम्हीच म्हणता ना.. ती तर घरातली आहे. मग तिला फक्त गृहीतच धरायचं."
आकांक्षाचं हे बोलणं आदित्यला मुळीच आवडलं नाही. रागारागात त्याने तिच्यावर हात उचलला.

"आदित्य..नको." हे पाहून साधना रडू लागली आणि बाबाही मध्ये पडले. 

"दादा, तू वहिनीसाठी माझ्यावर हात उचललास? आई, पाहतेस काय? बोल ना त्याला." आकांक्षा रडू लागली. 

"मी म्हणते त्याच चुकलं. पण त्याने का हात उचलला हे बघ आधी. तुझं वागणं बदलत चाललं आहे आकांक्षा. ही कुठली पद्धत बोलायची? वहिनीचाही मान असतो, हे लक्षात ठेव." आई साधनाला घेऊन तिच्या खोलीत आली.

सासुबाई साधनाला काय म्हणतील? हे वाचा पुढील भागात.