Login

वहिनीचा मान भाग 2

Vahini Ani Tichya Nanandechi Gosht

लग्नाची तारीख जवळ येऊ लागली, तशा साधनाच्या सासुबाई साड्या खरेदीसाठी गडबड करू लागल्या. तारीख ठरवून त्यांनी आपल्या बहिणीला आणि नणंदेला बोलावून घेतले. साधना आणि आदित्य आवरून तयार झाले.

"आई, साड्या खरेदी करण्यासाठी इतक्या साऱ्यांची काय गरज? तू, मी, मावशी आणि आत्या इतकेच जाऊ." आकांक्षा आपल्या आईला म्हणाली.

"अगं, असं काय करतेस? साधना घरातलीच तर आहे अन् ती तर हवीच आणि आदित्य आला तर काय हरकत आहे? त्याची पसंती थोडी हटके असू शकते." मावशी आकांक्षाला म्हणाली.

मात्र आकांक्षाने मुरडलेले नाक हे साधना शिवाय इतर कोणाच्या नजरेस पडले नाही.

साड्या खरेदीसाठी आकांक्षाने अमेयलाही बोलावून घेतले आणि त्याच्या पसंतीनुसारच सगळ्या साड्या घेतल्या. साधनाला आवडलेल्या साऱ्या साड्या तिने रिजेक्ट केल्या. 

आता सासुबाईंनी साधनासाठी जास्त किमतीची साडी निवडली. 

"आई, वहिनीला इतकी महागडी साडी काय करायची?" आकांक्षा हळूच आईला म्हणाली.

"तू जशी तुझ्या घरची एकुलती एक सून आहेस ना, तशीच साधना या घरची एकुलती एक सून आहे. हे लक्षात ठेव." मावशी आकांक्षाला दटावणीच्या सुरात म्हणाली.

आदित्य आकांक्षाच्या शेजारी बसला होता. त्याने साधनाच्या साडीचे पैसे आईच्या हातावर टेकवले. हे पाहून साधनाच्या सासुबाई काहीच बोलल्या नाहीत. 'आकांक्षाला नक्की झाले तरी काय?' साधना विचारात गढून गेली.

"ताई, ही साडी तुमच्या अंगावर खूप खूलून दिसते आहे. हीच घ्या." सेल्समन आकांक्षाला म्हणाला. तिने पसंतीसाठी अमेयकडे पाहिले. 

इतक्यात आदित्य पुढे होत म्हणाला, "नको अशू, ही साडी तितकी चांगली नाही वाटत. त्याऐवजी तू दुसरी साडी ट्राय करून बघ." आदित्यने एका हिरव्या रंगाची साडी सेल्समनकडे दिली. 

"नाही रे दादा, तू जरा गप्प बस. तुला साड्यातले काही कळते तरी का?" आकांक्षाचे बोलणे ऐकून आदित्यला राग आला होता. मात्र प्रसंग पाहून त्याने गप्प राहणे पसंत केले.

"साधना, तुला हवी तर ही साडी घे." आदित्यने सेल्समनकडून ती साडी घेऊन साधनाकडे दिली. 

साधनाने उठून, ती साडी खांद्यावर टाकून स्वतःला आरशात पाहिले. खरंच खूप सुंदर दिसत होती साडी आणि साधनाही! साधनाला खूपच आवडली ती साडी.

तशा आदित्यच्या आत्या म्हणाल्या," साधनाला ही साडी मी घेईन. नाहीतरी तुम्हा साऱ्यांना आहेर करायचा आहे. नंतर काहीतरी देण्यापेक्षा आत्ताच घेऊन टाक साडी." साधनाने संमतीसाठी आदित्यकडे पाहिले. त्याने डोळ्यांनीच होकार दिला. सासुबाईंनीही दुजोरा दिला.

हे पाहून आकांक्षा चांगलीच खवळली. "अगं, मी नवरी मुलगी आहे ना? मग वहिनीसाठी काय साड्या पसंत करता आहात? तरी मी म्हणत होते इथे यायला इतक्या साऱ्यांची गरजच नव्हती." आकांक्षा तोंड वाकडं करत म्हणाली.

आकांक्षाचे वागणे पाहून आदित्य तिला काही बोलेल का? यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.