वहिनीचा मान भाग 1

Vahini Ani Tichya Nanadechi Gosht

साधना लग्न करून घरी आली आणि आकांक्षाचं म्हणजेच तिच्या नणंदेचं आपल्या वहिनी शिवाय पानही हलेना. भरलं सासर पाहून साधनाही खुश झाली. आकांक्षाच्या रूपाने तिला एक छान मैत्रीण मिळाली. दोघींत मनमोकळ्या गप्पा होत. कधी काही कुरबुरी होत. मात्र त्या जिथल्या तिथे मिटून जात असत. साधना नोकरी करत होती. ती दमून भागून घरी येई. आकांक्षा तिला नेहमी मदत करत असे. 

आदित्य, साधनाचा नवरा तोही खुश होता. सासू - सून, नणंद - भावजय या नात्याचा गुंता या घरात पाहायला देखील मिळाला नव्हता.

लवकरच आकांक्षाचं शिक्षण संपलं. तिला छानशी नोकरी लागली आणि तिच्यासाठी 'वर संशोधनही' सुरू झाले. 

अगदी सहा महिन्यातच आकांक्षाचं लग्न ठरलं. साजेस स्थळ मिळालं. साखरपुडा उरकला आणि तिला स्वर्ग जणू बोटेच उरला. 

अमेयचे स्थळ उत्तम होते. शिवाय श्रीमंत होते. त्याची हवा आकांक्षाला लागल्याविना राहिली नाही. आधी वहिनी, वहिनी करणारी आकांक्षा आता साधनाशी धड बोलत नव्हती की वागत नव्हती. अमेय सोबत सतत फोनवर बोलत असायची, नाहीतर बाहेर फिरायला जायची. 

साधनाने आपल्या एकुलत्या एका नणंदेचे लग्न ठरले म्हणून तिची चेष्टा -मस्करी करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आकांक्षा तिला टाळू लागली. आकांक्षाचे वागणे पाहून साधनाला वाईट वाटणे साहजिकच होते. 

"आदित्य, माझे काही चुकले का रे? आकांक्षा माझ्यासोबत नीट बोलत नाही आता. मी बोलायचा प्रयत्न केला, तरी सारखी टाळायला पाहते." साधना.

"नाही गं. हे सारं तू मला विचारण्यापेक्षा आकांक्षाला विचार ना. गोष्टी जिथल्या तिथेच सोल्व्ह होतील." आदित्यने या प्रश्नातून आपले अंग काढून घेतले.

निवांत वेळ पाहून साधना आकांक्षाच्या खोलीत गेली. "काय करतेस आकांक्षा? दुपारी शॉपिंगला येशील का माझ्यासोबत?" काहीतरी विषय काढायचा म्हणून साधना म्हणाली. 

"एक काम कर वहिनी, तू दादाला घेऊन जाऊन ये. माझा आणि अमेयचा संध्याकाळी मस्त फिल्मला जाण्याचा प्लान आहे." आकांक्षा थोडी उद्धटपणे म्हणाली.

"अगं, माझं काही चुकलंय का? तुझं लग्न ठरल्यापासून पाहते आहे मी, तू माझ्याशी धड बोलतही नाहीस की नेहमी सारखी मदतही करत नाहीस." साधना न राहवून म्हणाली.

"त्याचं काय आहे ना वहिनी, आता दोन महिन्यात माझे लग्न होईल आणि मी इथून निघून जाईन. सो, तुला सवय करून घ्यावीच लागेल याची आणि बोलण्याच्या बाबतीत म्हणत असशील, तर हे काय.. बोलते आहे की मी तुझ्याशी." आकांक्षाच्या या उत्तराने साधनाचे समाधान झाले नाही. डोळ्यात पाणी आलं म्हणून ती आकांक्षाच्या खोलीतून बाहेर आली. 

आकांक्षाचे हे बोलणे नेमके आदित्यच्या कानावर पडले. "साधना, तू नको काळजी करू. लग्न ठरलं म्हणून अशू थोडी हवेत आहे. थोड्याच दिवसांत नॉर्मल होईल ती." आदित्य साधनाला समजावत म्हणाला.

आकांक्षा साधनाशी नक्की कशी वागेल? हे पाहू पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all