वहिनी आणि तिची वहिनी

कथा नणंद भावजयीची

वहिनी आणि तिची वहिनी..



" ते काही नाही.. यावेळेस आपण स्नेहाताईंसोबत नाही जायचे?" चित्रा तावातावाने बोलत होती..

" सोबत जायचे म्हणजे? मी काय तिला कडेवर नाही घेणार.." सुमेध हसत म्हणाला..

" मस्करी करू नकोस.. मी सिरियसली बोलते आहे. इथे जायचे स्नेहाताई तिथे जायचे स्नेहाताई.. आजकाल तर माझ्या माहेरीसुद्धा माझ्यापेक्षा जास्त त्यांचे नाव असते. मला ना आता याचा कंटाळा आला आहे.." चित्रा वैतागली होती..

" कुठेतरी काहीतरी जळतंय बहुधा.." सुमेध अजूनही मस्करी करत होता."

" सुमेध प्लीज.."

" चित्रा मी प्लीज म्हणतो.. तू येण्याआधीपासून आम्ही सगळे एकत्र फिरतो आहोत.. आणि दोघेच जाण्यापेक्षा सगळे मिळून गेलो तर मस्त टाईमपासही होतो आणि सोबतही मिळते.. सोबत नील आणि प्रिया पण असतात.. छान गप्पा होतात."

" पण दोघेच कुठे जाणार आपण?"

" म्हणजे?"

" दरवेळेस तुझ्या ताईसोबत जातो, यावेळेस माझ्या भावासोबत जाऊ?"

" कोण प्रितेश? तो मित्रांबरोबर जाईल कि आपल्या?"

" ते मला माहित नाही.. मी त्याला विचारते. मग बघू.."

" तू म्हणशील तसे.."

      चित्रा आणि सुमेध नवविवाहित जोडपे. लग्नाला नुकतेच झालेले वर्ष. पण या वर्षभरात चित्राला स्नेहाचा वावर खटकायचा.. खरेतर स्नेहा फक्त सणासुदीला माहेरी यायची किंवा हे सगळे फिरायला एकत्र जायचे.. पण वर्षभरात हे चित्राला आवडेनासे झाले होते.. म्हणजे तिला फिरायला जायचे असायचे पण तिथे स्नेहा नको असायची.. स्नेहा जशी तिच्या माहेरच्यांसोबत वागायची तसे तिला तिच्या माहेरी वागायचे होते.. चित्राचे बदललेले वागणे स्नेहाला समजत होते. ती हि त्याकडे दुर्लक्ष करत होती. तरिही आईकडून जेव्हा सुमेध काहीच न विचारता वर्षासहलीला गेला तेव्हा कुठेतरी तिला वाईट वाटलेच.. ती उदास झाली होती..

" तुला कोणी बहिण किंवा भाऊ का नाहीये?" स्नेहा चिडून विशालशी तिच्या नवर्‍याशी बोलत होती..

" माझ्यावर का ओरडते आहेस? आईला विचार.. फोन लावून देऊ का गावाला?" विशाल हसत म्हणाला..

" मला खूप एकटं वाटतंय रे.." स्नेहा रडत म्हणाली..

" का? सुमेध दुरावेल म्हणून? असं नसतं ग.. रक्ताची नाती नाही दुरावत. नवीन लग्न झाले आहे त्याचे.. तो बायकोला महत्त्व देणारच तो.. मी नाही माझ्या बायकोला देत?" विशाल हसत म्हणाला..

" आणि तसेही आज ना उद्या हे होणारच होते.. नात्यात अंतर न येता हे झाले ते चांगलेच आहे ना?" विशालने तिची समजूत काढली खरी. पण मनातून तो ही दुखावला गेला होता.. सुमेधला तो धाकटा भाऊ मानत होता.. त्याच्यासाठी सगळे करत होता. अचानक त्याचे बदललेले रूप त्यालाही खटकले होते.. असेच दिवस जात होते.. चित्रा स्नेहाशी जेवढ्यास तेवढेच बोलत होती.. सुमेधला काय बोलावे ते कळत नव्हते.. तोच प्रितेशचे चित्राच्या भावाचे लग्न ठरल्याची बातमी आली.. चित्राचा बहुतांश मुक्काम मग माहेरीच असायचा.. लग्नात नवरीपेक्षा करवलीच उठून दिसत होतीच.. पण मिरवतही होती.. ते पाहून स्नेहाला सुमेधच्या लग्नाची आठवण झाली.. ती ही तेव्हा अशीच मिरवत होती.. तिने स्वतःशीच सुस्कारा सोडला..

      स्नेहाने माहेरी जाणे कमी केले असले तरी आईशी तिचे रोज बोलणे असायचे.. त्यातूनच तिला कळले कि चित्रा आजकाल उदास असते.. माहेरी जाणे कमी झाले आहे.. कारण समजले नाही पण.. पावसाळा सुरू झाला होता.. स्नेहाला मागच्या वर्षीची आठवण झाली.. पहिल्यांदाच फक्त ते दोघेच मुलांना घेऊन गेले होते.. यावेळेस पण बहुतेक तेच करावे लागणार अशी तिने मनाची तयारी केली होती.. तोच तिचा मोबाईल वाजला.. खूप दिवसांनी सुमेधचा फोन आला होता..

" ताई.."

" बोल सुमेध.."

"पिकनिकला जायचे ना?"

" काय? पण चित्रा?"

" तिचे सोड.." तो घुटमळत म्हणाला.

" ती थोडी नाराज आहे.. प्रितेशची बायको तिच्याशी नीट वागत नाहीये.. मला तिला या सगळ्यातून बाहेर काढायचे आहे.. चार दिवस मुलांमध्ये राहिली तर मूड चांगला होईल तिचा.."

" मी विशालशी बोलून सांगते.." स्नेहाने कडवटपणे फोन ठेवला.. तिला सुमेधचा राग येत होता.. आता तुला गरज आहे म्हणून सोबत जायचे. आणि मागच्या वर्षी आम्हाला सोडून जाताना नाही वाईट वाटले? ती विशालची वाट बघत होती.. तो आल्यावर सरळ नाही म्हणून सांगायचे असे तिने ठरवले होते..

"मुलांनो चला पिकनिकची तयारी करा.." विशालने घरी येताच सांगितले.

" अचानक पिकनिक?" स्नेहाने विचारले..

" हो अग सुमेधचा मला पण फोन आला होता.. मी हो बोललो.."

" मला न विचारता?"

" हो. "

" मला नाही पटत.. आता त्याला गरज आहे म्हणून?"

" हे बघ.. तो आपलाच आहे.. आणि आपल्या माणसांकडून चुका झाल्यावर आपणच सांभाळून घ्यायचे ना?"

विशालने समजूत काढल्यावर स्नेहा तिच्या माहेरी गेली.. तिथे चित्राला बघून तिला वाईट वाटले..

" काय ग.. अशी का दिसते आहेस? केवढी खराब झाली आहेस.."

" ताई मला माफ करा.. मी तुमच्याशी जे वागले त्याचे फळ मला पुरेपूर मिळाले आहे.."

" असं का बोलते आहेस?" स्नेहा तिला जवळ घेत बोलली..

" मला ना तुमच्यासारखे वागायचे होते.. माहेरी सासरी.. पण तिथे तुम्ही नको होता.. तेच आज माझ्यासोबत झाले.. प्रितेशच्या बायकोला मी तिथे आलेले चालत नाही.. मी तिथे गेले कि ती सगळ्यांशी भांडते.. मला मग कानकोंड्यासारखे होते.. प्रितेशने माझ्याशी बोलणेच थांबवले आहे. माझे माहेर संपल्यासारखे झाले आहे.." चित्राने रडायला सुरुवात केली..

" अग वेडी आहेस का? माहेर असेच कुठे संपते? आईबाबा आहेत ना तिथे. असेच होते ग.. आपला आपल्या भावांवर जीव असतो.. पण त्यांच्या लग्नानंतर त्यांना पण एक नवीन कुटुंब मिळते ते मात्र जाणून बुजून विसरतो.. आणि मग त्याचा त्रास मात्र खूप होतो.. पण सोड.. जशी तुला तुझी चूक कळली तशी तिला पण उमजेल.. यावर विश्वास ठेव.. आणि रक्ताला रक्ताची ओढ असतेच.. काही दिवसांनी का होईना प्रितेश बोलेल तुझ्याशी.."

चित्राने परत स्नेहाला मिठी मारली.. स्नेहाची आई हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होती..



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई