वागणूक रुपी आरसा

आपली वागणूकीने आपण मनाच प्रतिबिंब आरश्यासारखे दर्शवत असते.

   

आपल मन चंचल वृत्तीचे असते. कधी कोणती गोष्ट मनाला पटते तर कधी तीच गोष्ट पटायला तयार नसते. आपल्या मनावर आपल्या विचारांचा विशिष्ट पगडा असतो. आपल्या आजूबाजूची परीस्थिती देखील आपल्या मनावर बिंबवली जाते. लहान असताना आई-वडील, गुरुजण, आप्तेष्ट आपल्यावर सद्गुणांशी ओळख करुन देतात. त्या मार्गाचा अवलंब करुन आपण तस वागण्याचा प्रयत्न करु लागतो. पर्यायाने जीवनात यशाची प्राप्तीची मोहर उमटू लागते. आपण समाधानाने भरुन पावतो.
मनाला आनंदाच्या गर्तेतेत रममाण होण्यास कारणीभूत ठरतो. मनावर नकळतपणे संस्काराचे बीज रुजले जाते. जन्मत: आपली पाटी जशी कोरी असते. त्यावर अनुभवाची शिदोरी जगताना अनेक प्रसंगातून प्रत्येक वेळी नविन गोष्ट शिकायला मिळते. आपण जे काही नव्याने शिकतो ते प्रसंग मनावर कोरले जातात. कधी ते आनंदात तर कधी कटू आठवणींनी मनात साठून राहतात.
मन हे पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे असते. जशी परीस्थिती उद्भवेल तसे निर्णय घेण्याची क्षमता आपलं मन कोणत्या प्रकारे कौल देते यावर आधारीत असते. आपण चांगल वागल तरी वाट्याला अपमान, अवहेलना कशी वाट्याला येते. कुठे चुकतो आपण. याचा सर्वस्वी विचार मन विविध मार्गाने शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण...., वास्तवात तर कुठेच चुक नसते. कदाचित, समोरच्याला आपल मत पटलेल नसते. अशावेळी ते आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. छोट्या-छोट्या गोष्टीत आपल मत विचारणारे आता मात्र कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता न लावता पूर्णत्वाला गोष्टी पोहचल्यावर कळते. अशावेळी मन दु:ख होते. निराशेच्या अंधारात झाकळले जाते. आपण किती यातून सावरले तरी, मनात अढी मात्र कायमस्वरुपी बसली जाते.
खरतर ज्या गोष्टी मनाला त्रासदायक ठरतात अश्या गोष्टींचा विचार न करता आपल मन आवडणा-या गोष्टीत, छंदामध्ये गुंतवणे गरजेचे आहे. मन आनंदी असले की जीवनाच्या वाटेवर येणारा प्रत्येक क्षण भरभरुन जगावासा वाटतो. आपल मन हे पुस्तकाच्या धड्यांप्रमाणे आहे. त्यावर आयुष्यात घडणारे प्रसंग, अनुभव रेखाटले जातात.
आपल मन सकारात्मक ठेवणे आपल्याच हातात आहे. एखादी समस्या समोर येताच. घाबरुन न जाता...., काय केले म्हणजे ती सहज सोडवता येईल याचा सर्वाथाने विचार करणे गरजेचे आहे. आपण जसा विचार करु तसे मनातून त्या मार्गाने चालण्याची उर्जा उत्पन्न होत असते. पर्यायाने समस्येवर तोडगा निघाल्याने आपण निर्धास्त होतो. तसेच यश मिळताच ते टिकवण्याचा प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे.


आठवणींच्या हिंदोळ्यावर कडू-गोड आठवणी मनावर साठत जातात. त्या कोणाला सांगता येत नाही. केवळ आपल्या जवळ तश्याच राहतात. प्रसंगी ते सांगण्याचे आपण टाळतो.
कोणाच्या मनात क्लेश निर्माण नको म्हणून आपण शांत राहतो. अश्यावेळी मन मात्र तोच तोच विचार करण्यात गुंतत असते. ही अशांतता थांबवण्याकरता मनाला या विचार चक्रातून बाहेर काढणे आपल्या हातात आहे. ज्या गोष्टींचा उलगडाच होत नसेल तर त्या पुन्हा विचार करुन का त्रास सहन करायचा.


आपलं मन हे आपण समाजात वावरताना कशी इतरांशी वागणूक दर्शवतो याचा आरसा आहे.प्रसंगानुरुप आपली विचारक्षमता कोणते निर्णय घेते यावरुन मनाच्या संस्काराचे दर्शन घडत असते.

©®प्रज्ञा बो-हाडे