वाघीण तू...

Fight For Yours Right
वाघीण तू.....

मीडियावर चाललंय गाणं तुफान एक असं...
हरिणीने केली शिकार वाघाची दबक्या पावलानं

शब्द असुदे त्यातील प्रेमासाठी समर्पित
पण अर्थ दुजा जाणून घे त्याच्या मागील...

इथे लांडगे वळणावर असे वाघाच्या रूपात
घेतील फायदा दुर्लक्ष असता असू दे ध्यानात

नको घाबरू नको डगमगू अशा वेळी तु
आदिशक्तीची असे वाघीण तु दे दाखवून

लागता चाहूल अशुभ काही तरी होण्याची
सर्तक हो.. ढाल हो तेव्हा तुझी तुच स्वतःची

शिवबा कडे होती वाघनखं गनिमी काव्यासाठी
तु आण त्याक्षणी अंमलात शस्त्र तुझ्या कडची

साजशृंगार करताना जपले जे प्राणाहून प्रिय
तेच अस्त्र शस्त्र तुझे संरक्षण करण्यास सज्ज

शोभा म्हणून नको तर उपयोगकर्ता वाढव नखं
येता कोणी अंगावर मार तू नागिण सम डंक..

हिंमत त्यांची नसे तु स्वतःस अबला समजतेस
भले असशील शक्तिहीन पण दुर्बल तु नसतेस

घरात गुपचूप सहन करतेस नवऱ्याच जाच
रोज भोगतेस सासरी मुक्याने असा सासुरवास

मान ठेवतेस त्यांचा होऊनी तु घरंदाज गृहिणी
वेळ पडली तेव्हा होऊन जा जिजाऊंची भवानी

मग का करतेस असं अशा समोर का नमतेस
मनाचं बळ सर्वांपासून तेव्हा का तु लपवतेस...

नाही कोणी कृष्ण येणार मदतीला नाही राम
तुझं रक्षण तुलाच करायचे ते तुझंच आहे काम

हो खंबीर दे स्वतःला धीर.. करण्यास सिद्ध
दाखव तुझं कौशल्य जे असते तुझ्यात दिव्य

आता जाणार नाही बळी कोणत्याच नारीचा
घे शपथ मनात नाही घाबरणार परिस्थितीला

येऊ दे कोणती गँग किंवा येऊ दे एक कोणी
एक एकास ठेचून काढ होऊनी तु माता काली

------****-----***-----***----***----

कृतिका कांबळे!!!