वधूपिता.. बिचारा?? भाग ७

कथा सोहमची आणि ऋजुताची..


वधूपिता.. बिचारा? भाग ७


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.

मागील भागात आपण पाहिले की सोहम आणि ऋजुताचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता वेळ आली आहे लग्नाची बोलणी करायची. दोघे सांगू शकतील घरी हे सगळे?

" डॅड, मला तुमच्याशी बोलायचे आहे." ऋजुताने घरी विषय काढला.
" बोल ना बबडे."
" डॅड, मला एक मुलगा आवडतो.."
" ते माहिती आहे मला.." भाईंचा चेहरा जरा कठोर झाला होता.
" कसे?" आश्चर्याने ऋजुताने विचारले.
" ते आज मी बबडे बोलल्यावर तू चिडली नाहीस, यावरून मी अंदाज बांधला." भाई सावरून घेत म्हणाले.
" तुम्हाला माहित होते आणि मला सांगितले नाही.." उद्विग्न उषाताई बोलल्या.
" अग माहित होते म्हणजे तसे नाही.." भाई समजवू लागले.
"हे बरे आहे.. म्हणजे इथे लेक लपवणार आणि तिथे तुम्ही. माझी कोणाला तर किंमतच नाही."
" मॉम मी बोलू की तू रडणार आहेस?"
" बोल.."
" बाबा मला त्या सोहमशी लग्न करायचे आहे.."
" लग्न करू का वगैरे विचारायची पद्धत आहे की नाही?"
" मॉम.. मी सांगते आहे ना."
" उपकारच करते आहेस ना? नशीब लग्न करून नाही आलीस.. हा माझा नवरा म्हणून."
" डॅड.. तुम्ही बोला ना काहीतरी.."
" तो मुलगा कोण, कुठला? काही सांगशील की नाही?"
"मॉम त्याचे नाव सोहम.. आमच्याच कॉलेजला आहे.. म्हणजे होता.. आता त्याला नोकरी पण लागली आहे."
" त्याचे आईवडील काय करतात?"
" ते दुसरीकडे राहतात.. पण सोहमला नोकरी इथेच मिळाली आहे.. त्याची आई हाऊसवाईफ आहे आणि बाबांची गावात शेती आणि कसलातरी बिझनेस आहे."
सगळे व्यवस्थित आहे हे बघून उषाताईंचा राग निवळायला लागला होता.. पण आपली मुलगी खरेच लग्न होऊन जायचे म्हणते आहे हा विचार भाईंना हजम होत नव्हता.. खूप वेळाने त्यांनी तोंड उघडले.
" मी काय म्हणतो बबड्या, लग्नाची काय घाई आहे? करू की सावकाश.."
" डॅड.. अजून किती सावकाश? अजुन सावकाश करत बसले तर म्हातारी होईन मी."
"सलील.. आपण भेटूया त्या कुटुंबाला." कधी नव्हे ते उषाताईंनी सगळ्यांसमोर भाईला त्याच्या नावाने एकेरी हाक मारली. त्याचा अर्थ भाईला जाणवला..
" आपण जायचे त्यांच्याकडे की ती लोक येणार?" भाईने नाईलाजाने विचारले..
" रितीप्रमाणे तीच लोक येणार आपल्याकडे.. ऋजुता तू त्याच्याशी बोलून घे. आणि त्यांना कधी यायला जमेल ते विचार. नंतर त्याच्या आईवडिलांचा नंबर मला दे. मी रितसर आमंत्रण देते."
" मॉम, डॅड.. थँक यू सो मच.. लव्ह यू.. आता फोन करते.." ऋजुता तिथून गेली.
" काय झाले तुला? तू का उदास झालास?" उषाताईंनी विचारले..
" उदास नाही होणार तर मग काय? काय लग्न लग्न लावले आहे? अजून लहान तर आहे ती?"
" अरे पण ती लहान तुझ्यासाठी.. वय झाले आहे तिचे लग्नाचे. आणि जर तो चांगला मुलगा असेल तर कशाला आडकाठी घेतोस?" उषाताई समजावत होत्या. भाईला हे कळत होते पण वळत नव्हते.
"ठिक आहे. नाही आडकाठी घेत. झाले समाधान?"
" हो.. आता मी लागते तयारीला.."

सोहमने घरी फोन लावला..
" बाबा, आई आहे का तिथे?"
" तुला बोलायचे आहे का तिच्याशी?"
" नाही.. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. थोडे लांब याल का तिच्यापासून?"
" थांब हा.. अरे ऐकू येत नाही नीट.. आता येते आहे.. बोल.."
" बाबा, मला एक मुलगी आवडली आहे. तिच्याशी लग्न करायचे आहे. तुम्हाला आईला मनवायला जमेल का?" सोहमने एका दमात बोलून घेतले. तिकडे त्याच्या बाबांना ठसका लागला..
" काय? अरे असे धमाके काय करतोस?"
" बाबा, मी इथून जास्त नाही बोलू शकत. तुम्ही आईशी घ्याना बोलून. प्लीज."
" काय बोलायचे आहे माझ्याशी?"
" आई तू?"
" हो.. तो धमाका शब्द ऐकूनच मला संशय आला म्हणून घेतला फोन यांच्या हातातून.. कसले धक्के द्यायचे आहेत?"
" आई मला एक मुलगी आवडते. पण जोपर्यंत तू होकार देत नाहीस तोपर्यंत मी लग्न करणार नाही.."
" लग्न करणार नाहीस म्हणजे हिच्याशी नाही की दुसर्‍या कोणाशीच नाही?"
" आई...."
" बरं.. नाव काय मुलीचे?"
"ऋजुता..."
" व्वा.. नाव तर छान आहे.. नावासारखीच ऋजु आहे का?"
" आई, तूच ठरव ना.. तू भेटशील तिला?"
" भेटावं तर लागेलच ना.."
" आई, मग मी कळवतो तुला.. अजुन एक गोष्ट.. चिडणार नसशील तरच.."
" घ्या बोलून.."
" आई, आय लव्ह यू सो मच.." आई पुढे काही बोलायच्या आत सोहमने फोन ठेवला. कारण ऋजुताच्या बाबांविषयी काय सांगायचे हा प्रश्न होताच. आईला ऋजुताला आधी भेटू दे मग पुढचं पुढे बघता येईल. त्याने मनातून विचार झटकला..
उषाताईंनी सोहमकडून सुधाताईंचा फोननंबर घेऊन त्यांना फोन केला आणि भेटायची वेळ वगैरे ठरवली. सुधाताई आणि सुधाकरराव दोघेही मुंबईला आले.
" सोहम, कशी आहे रे ही ऋजुता?" आल्या आल्या आईने विचारले.
" सांगण्यापेक्षा तू भेटून ठरवना.. ऐक ना आलीच आहेस तर काहीतरी छान जेवायला कर ना.. मला बाहेरचे खाऊन कंटाळा आला आहे.." सोहमने विषय टाळायचा प्रयत्न केला. नंतरही काही ना काही कारणे काढून त्याने ऋजुताविषयी बोलणे टाळले. दुसर्‍या दिवशी ऋजुताकडे जायचे आहे म्हणून घाई केली. या सगळ्या गडबडीत सुधाताईंना काहीच समजले नाही. सगळे भाईच्या बंगल्याजवळ आले. तोच एक दुसरी गाडी चुकीच्या मार्गाने येऊन सोहमच्या गाडीवर आपटली. त्या गाडीवाल्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तो प्रकार सोहमची वाट बघत असणाऱ्या ऋजुताने पाहिला. ती रागाने खाली उतरून आली. सोहमला बडबड करणाऱ्याची तिने कॉलर पकडली..
" साल्ला.. आपल्या एरियात येऊन आपल्याच माणसांना बोलतो काय? एकतर तू रॉंग लेनने येणार आणि दादागिरी करणार?" ऋजुताने त्या माणसाला मारायला हात उचलला.. समोर उभ्या असलेल्या सोहमने हात जोडून आत बसलेल्या आईबाबांकडे खूण केली. तसे तिने त्याला सोडले..
" परत एरियात दिसलास ना तर पाय तोडून हातात देईन.. चल कल्टी मार." तो गाडीवाला पळून गेला.. ऋजुताने गाडीत पाहिले.. सुधाताई आणि सुधाकरराव विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडेच बघत होते..


काय वाटते, सुधाताई लग्नाला परवानगी देतील? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all