वधूपिता.. बिचारा भाग ६

कथा सोहम आणि ऋजुताच्या प्रेमाची
वधूपिता.. बिचारा भाग ६


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.

मागील भागात आपण पाहिले की ऋजुता सोहमसाठी आपली वेशभूषा बदलते. आता पाहू पुढे काय होते ते..

" बोला.. काय एवढे महत्वाचे बोलायचे आहे?" सोहमने कॅन्टीन मध्ये ऋजुताच्या समोर बसत विचारले..
" त्याचे काय आहे ना?" कोणाला न घाबरणारी ऋजुता आज चाचरत होती..
" कशी दिसते मी?"
" हे विचारायला बोलवलत का? हे मी तिथेही सांगितले असते.." सोहम आश्चर्याने म्हणाला.
" हे नाही रे भाई.. मला वेगळच बोलायचे होते. म्हणजे बघ आता मी ढांसू दिसते की नाही?"
" ढांसू??" शब्द ऐकून सोहमला हसू आले.. कसेबसे हसू आवरत तो म्हणाला.
" आता तुम्ही म्हणताय तर दिसत पण असाल.."
" आता मला सांग, मी हे सगळे कोणासाठी केले?"
" मी कसे सांगणार? मी कुठे तुम्हाला जास्त ओळखतो."
" तेच तर ना भाय.. तुला नाय वाटत का, आपण एकमेकांना थोडे ओळखले पाहिजे?" ऋजुता सोहमला डोळा मारत म्हणाली. सोहम थोडा सटपटला.
" अहो, काय बोलताय हे? बघा मी तुम्हाला कालच सांगितले ना, की आम्ही खूप साधी माणसे आहोत."
" अरे यार, तू पण ना. बघ मी कसा साध्या माणसारखा ड्रेस घालून आले आहे. मी काय बोलते, मी थोडी तुझ्यासारखी साधी होते, अभ्यासू होते मग तर चालेल काय तुला?"
" हे बघा." सोहमने बोलायचा प्रयत्न केला.
" हे बघ, मला काही बघायचे नाही तुला सोडून. तु मला सांग मी किती साधे व्हायचे. मी तेवढी होते." ऋजुता आपला हट्ट सोडायला तयार नव्हती.
" अहो, पण हे माझ्या आईला समजले तर?"
" तुझ्या आईला सोड.. विचार कर माझ्या डॅडीला तू मला नाही बोललेला समजला तर काय होईल. मी त्याच्या जिगरचा तुकडा आहे. माझ्या मनाविरुद्ध ते पण काही बोलत नाहीत.. मग तू?" ऋजुताने पुडी सोडली..
" मग तुम्हीच सांगा, काय करायचे ते." सोहम डोक्याला हात लावत म्हणाला.
" तेच तर बोलते ना मी.. आपण काय पळून जाऊन लग्न करू असे नाही म्हणत मी. पण डेटिंग करायला काय हरकत आहे? काय बोलतो?"
" मी बापडा काय बोलणार तुमच्यासमोर? पण माझ्या घरी समजले ना तर हाल होतील माझे.. आणि माझ्या करिअरचे काय?"
" अरे येडचॅप.. डेटिंग करायचे म्हणजे सतत नाही काय फिरायचे. पण तू माझा बॉयफ्रेंड आणि मी तुझी गर्लफ्रेंड. ओके?"

घाबरलेल्या आणि थोड्याश्या उत्सुक सोहमने होकार दिला. पक्याभायने न चुकता ही खबर भाईला सांगितली. भाईच्या डोक्यात काही गणिते चालली होती. ऋजुता अगदीच हाताबाहेर जायला लागली तरच मध्ये पडायचे असे त्याने ठरवले होते. पक्याभायने ऋजुतावर लक्ष ठेवायचेच होते. ऋजुता पण हुशार होती. तिने सोहमच्या अभ्यासात अजिबात दखल न देता त्याला प्रोत्साहन देत होती. त्याच्यासोबत ती ही अभ्यासाला लागली होती. बिचार्‍या सोहमची तिहेरी धडपड चालू होती. एका बाजूला अभ्यास, एकीकडे ऋजुता आणि तिसरीकडे त्याचे कुटुंब. कसेबसे त्याने हे सगळे जमवले. दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले. सोहमने नोकरीही शोधली. तोपर्यंत झाले होते असे की आधी मस्करीत सुरू झालेले ऋजुताचे प्रेम आता गंभीर झाले होते. आणि ही काय आता बोलते आहे, नंतर सोडून देईल असा विचार करणारा सोहम तिच्या प्रेमात पडला होता. आता होणार आहे आपल्या कथेला खरी सुरुवात.. म्हणजे झाले आहे असे आपल्या नायिकेने तर नायकाला पाहूनच सांगितले आहे ना, लग्न करेन तर तुझ्याशीच. कथेचे नावही आहे वधूपिता. त्याप्रमाणेच आता या दोघांनाही वेध लागले आहेत लग्नाचे.. आता मग बघू यांचे लग्न कसे होते ते..

" सोहम, आता तरी घरी सांगायचे का?" ऋजुता सोहमच्या हाताशी खेळत होती.
" एवढ्या लवकर?" सोहम थोडा घाबरला होता..
" लवकर? अरे झाली की आता सहासात वर्षे. अजून किती दिवस थांबायचे? आणि मला तर वाटते की डॅडींना तर माहित पण असेल आपल्याबद्दल."
" काय?" सोहम जोरात ओरडला..
" ओरडतोस काय? भाई आहेत ते या एरियाचे. त्यांच्यापासून काही लपून रहात नाही. आणि मी तर पक्यादादाला पण खूपवेळा इथे पाहिले आहे. तू घाबरशील , चिडशील म्हणून मी काही बोलले नाही."
" तुमच्या या बोलण्याने ना आता माझ्या किडनीत हार्ट अ‍ॅटॅक येईल." सोहमचा डायलॉग ऐकून ऋजुता हसायला लागली.
" हसताय काय? इथे माझी काय अवस्था झाली आहे मला माहित."
" सोहम, किडनीत हार्ट अ‍ॅटॅक.. तू आमची भाषा बोलायला लागलास."
" बघा.. तुमच्यामुळे माझी भाषा पण बिघडली आहे. आई तर आता नेहमीच यावरून टोकायला लागली आहे मला."
" तुला एक सांगू.."
" बोला.." सोहमच्या चेहर्‍यावर बारा वाजले होते.
" तू इतक्या वर्षांनंतरही हे जे मला अहो जाहो करतोस ना मला खूप आवडते. तू लग्नानंतर पण माझ्याशी असेच बोलणार?" ऋजुताचे बोलणे ऐकून सोहमला हसू आले.
" तुम्हाला आवडते ना? मग तसे."
" मग आता घरी सांगायचे?"
"सांगायला तर पाहिजे. सांगायचे कसे?"
" तुला नसेल जमत तर मग मी माझ्या घरी सांगते. मग मॉम आणि डॅड येतील तुझ्या घरी बोलायला. चालेल?"
" नको.. आपण असे करू. तुम्ही तुमच्या घरी सांगा मी माझ्या घरी."
" ये हुई ना बात.. मी आता जाते आणि डॅडला सांगते." ऋजुता खुश होऊन घरी गेली. सोहम तिथेच बसून विचार करत होता, आता घरी कसे सांगायचे ते. सांगितले तरी आईला पटेल?


दोघांच्याही घरचे यावर काय प्रतिक्रिया देतील.. पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all