वधूपिता.. बिचारा ? भाग २

कथा सोहम आणि ऋजुताची..


वधूपिता.. बिचारा? भाग २

राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई..

मागील भागात आपण सोहम आणि ऋजुता या दोघांच्याही कुटुंबाची ओळख करून घेतली. आता बघू पुढे काय..


" सोहम.. बाळा बॅग नीट भरली आहेस ना?" सुधाताईंनी विचारले.
" हो आई. आणि हे बघ काही राहिले तर मी घेईन की विकत तिथे."
" अरे पण तिथे मिळेल की नाही काय माहित?"
" अहो, तो मुंबईला जातो आहे. तिथे सगळे मिळते. तसाही सोहम आता मोठा झाला आहे. त्याला समजते आता."
" कितीही मोठा झाला तरी आईसाठी लहानच. हो की नाही रे कोकरा?"
" कोकरा? अहो काही वर्षांत त्याचे लग्न होईल. कोकरू कसले ते? मेंढा आहे तो आता.." सुधाकरराव स्वतःच्या विनोदावर हसत म्हणाले.
" त्याचे लग्न हे तर स्वप्न आहे माझे. माझी सून कशी शालीन, सुसंस्कृत, प्रेमळ हवी."
" बाबा.. तुम्हीपण काहिही बोलताय. आई जागी हो. आत्ताशी बारावी झाली आहे माझी. अजून माझ्या लग्नाला खूप वेळ आहे." सोहम लाजत म्हणाला.
" अरे लाजतोस काय मुलींसारखा. जरा धीट हो."
" हो रे बबड्या. आणि काय ते रॅगिंग का फॅगिंग असते ना त्यापासून दूरच रहा."
" आई, या कॉलेजमध्ये बहुतेक होत नाही. मी केले सर्च नेटवर."
" सर्च काय? शोधले म्हणावे. भाषा कशी शुद्ध हवी. काय?"
" अग, किती करशील शुद्ध भाषेचा आग्रह. तो आता जिथे चालला आहे ना तिथे बहुभाषिक लोक राहतात. साधी मराठी जरी आली तरी खूप आहे."
" का नाही करणार शुद्ध भाषेचा आग्रह? माझे बाबा खूप मोठे विद्वान होते. मराठीचे अभ्यासक होते. मराठी शुद्ध कशी बोलावी याबद्दलची त्यांची पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रम आहेत. त्यांचीच लेक आहे मी. जगातल्या नाही पण जवळपासच्या लोकांची भाषा तर नक्कीच सुधरवू शकते ना?"
" हो ग माझी आई.. कधी कधी तर असे वाटते मी तुझे लग्नाआधीचेच नाव कायम ठेवायला हवे होते.. मैत्रेयी."
" आईबाबा.. तुमचा जर नेहमीचा वादविवादाचा अंक यशस्वीरित्या पार पाडून झाला असेल तर मी प्रस्थान करू का?" हातात बॅग घेऊन ताटकळत असलेल्या सोहमने विचारले..
" हो. हो. चल.. लवकर निघालो तरच लवकर पोहचू तिथे."
इकडे सोहम निघाला आहे मुंबईच्या दिशेने. बघूया आपली ऋजुता काय करते आहे..

" पक्यादादा. नीट उभा रहा. नेम चुकला तर मला माहित नाही."
" ऋजाताई, भाईंनी किंवा मम्मींनी तुमच्या हातात हे बघितले ना तर माझी तर फुलटॉस वाट लागेल." पक्याचे हातपाय कापत होते.
" काही नाही होत. मैं हू ना?"
" म्हणून तर भिती वाटते." ऋजुताने हातातले पिस्तुल नीट धरले, एक डोळा मिटला आणि ती गोळी चालवणार इतक्यात तिच्या पाठीत एक धपका बसला..
" काय आचरट मुलगी आहेस ग. कॉलेजला जायचे सोडून इथे काय करते आहेस?" उषाताईंनी विचारले.
" ती ना रॅगिंगची प्रॅक्टिस करते आहे." पक्यादादा बोलून गेला.
" काय?" उषाताई किंचाळल्या..
" नाही ग मॉम.. हा पक्यादादा मस्करी करतो आहे.." ऋजुता पक्याच्या पायावर पाय देत बोलली.
" ऋजुता खरं बोल. तू जर कॉलेजमध्ये काही गोंधळ केलास ना तर मी अजिबात मध्ये पडणार नाही.. सांगून ठेवते." उषाताई चिडल्या होत्या..
" मॉम, मी कुठे काय करते. पण कोणी जर माझ्याशी पंगा घेतला तर मग मी काय ऐकून घ्यायचे?"
" अजिबात नाय. कोणी एक मारली ना तर तू चार मारून ये. काही झाले ना तर मी आहे सांभाळून घ्यायला." भिकूभाई आत येत म्हणाले..
" डॅडी.. तुम्हीच हो तुम्हीच.." ऋजुता वडिलांना मिठी मारत म्हणाली.
" हे असेच शिकवा पोरीला.. मागेच म्हणत होते हॉस्टेलवर पाठवा. तर नाही. माझी लेक, माझी लेक म्हणून पाठवले नाहीत. तुमच्याच लाडाने शेफारली आहे ही."
"अरे , अजब बात है यह.. तू विशालचे करतेस ते लाड आणि मी शेफारून ठेवतो? अरे कलेजाचा तुकडा आहे माझ्या तो. त्याला कोणी हात लावलेले काय, बोललेले पण नाय चालणार आपल्याला."
" बोललेलं चालणार नाय म्हणे. उद्या लग्न होऊन सासरी जाईल. तिच्या सासरचे काही बोलतील मग काय करणार?"
" आपण ना घरजावई आणू. काय डॅड?"
" कसली अगोचर मुलगी आहेस ग. तोंडाला येईल ते बोलते आहेस. मला ना तुझ्या सासरच्यांचीच दया येते आहे. देव त्यांचे रक्षण करो. तुम्हाला घालायचा तो गोंधळ घाला.. मी जाते." आई गेलेली बघून ऋजुता बाबांकडे वळली.
" डॅड, आज मी कॉलेजला जाताना हे घेऊन जाऊ.." हातातले पिस्तुल दाखवत ती म्हणाली.
" नाही हा बबडे.. भलते लाड नाही. कोणाला गोळी लागली तर.. अजिबात नाही. कोणी दिले ते तुला? पक्या?"
" भाय, ते ऋजाताईने माझे घेतले. आणि तू दिले.. तुझी अक्कल काय घास खायला गेली काय?"
" डॅड, अकलेला कोण घास भरवणार? ते काय लहान बाळ आहे?" ऋजुता हसत म्हणाली..
" ते हिंदीवाली घास.. सोड. कधी कधी मलाच कळत नाही, मी मराठी बोलतो की हिंदी."
" भाय आपुन ना बंबय्या बोलतो. डोक्याला शॉट नाय."
"डॅड काय बोलतो ते सोडा, मला घोडा द्याना तो.. रिकामाच आहे. फक्त शायनिंग मारायची आहे."
" नाय. तुझ्या मॉमला कळले तर मला मारेल. आणि जा आता कॉलेजला. तुझा दादा कसा शिकतो आहे. तशी तू ही शिक. या धंद्याचा विचार नको करू पोरी. जेवढे लांब राहता येईल ना तेवढे रहा. बघ आपल्याकडे सगळे आहे. पण इज्जतने बाहेर जाता येते का? सोड ही भाईगिरी. चांगली शिक. चांगल्या घरी सून म्हणून जा." भाईच्या डोळ्यात पाणी होते..
" तुम्ही पण ना डॅड. फालतूमध्ये स्वतःपण सेंटी होता आणि मला पण करता. चला जाते मी कॉलेजला." डोळे पुसत ऋजुता गेली.
" पक्या, आपले दोन पंटर हिच्या आजूबाजूला तिला समजणार नाय असे राहू दे. ती कॉलेजमध्ये काय करते आपल्याला समजले पायजे."
" हो भाय.. पाया पडतो.."
" हर हर भोले."
लेकीच्या काळजीने भाईने देवाला नमस्कार केला.


दोन वेगळ्या कुटुंबातले सोहम आणि ऋजुता निघाले आहेत कॉलेजला. मग त्यांची मैत्री होईल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all