वधूपिता.. बिचारा? अंतिम

कथा सोहम आणि ऋजुताची


वधूपिता.. बिचारा? भाग १३


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय: प्रेम.
जिल्हा : मुंबई..

मागील भागात आपण पाहिले की ऋजुताचे कुटुंब सोहमच्या घरी जाते. तिथे भाई त्यांचा अपमान करतो. सोहम आणि ऋजुता आता काय करतील पाहू आता.

" मलाही.."
" मग आता काय करायचे?"
" मी सांगू काय?" कुठूनतरी पक्यादादा टपकला.
" तू?"
" जाऊ का?"
" नको.. सांग काय करू ते?" ऋजुता म्हणाली.
" या कानाचे त्या कानाला समजलं नाय पाहिजे.."
" कबूल.."
" माझे नाव तर दूर दूरपर्यंत नाय आले पाहिजे.."
" एकदम कबूल.."
" कान द्या पटकन इथे.."
" आता इथे कांदे कुठून आणू मी? मला तर याच्या घरातले काहीच माहित नाही.."
" मग तुझ्या डोक्यातले कांदेबटाटे काढ.. ऋजाताई तूपण ना.." पक्यादादा वैतागला.
" कान देऊन. म्हणजे मी हळू बोलतो ते ऐका.."
" सॉरी हां दादा.." ऋजुता दात विचकत बोलली. पक्यादादाने त्याची योजना दोघांना सांगितली..
" तूच रे तूच दादा.." ऋजुताने त्याला मिठी मारली..
सगळ्यांची रात्र अस्वस्थेतच गेली. सकाळी सुधाताई सोहमला उठवायला त्याच्या खोलीत गेल्या.. तो तिथे नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. कारण घरी असला की तो कधीच झोपून न राहता स्वयंपाकघरात त्यांच्या मागे मागे फिरायचा.. त्यांनी घरभर त्याला शोधायला सुरुवात केली.. त्या अंगणात असताना उषाताई पण आल्या..
" ताई ऋजुताला पाहिले का?"
" ती वर नाही?"
" नाही ना.. खरेतर ती एवढ्या लवकर उठत नाही. ती दिसली नाही. तिचा फोन लागला नाही. म्हणून खाली आले. बघितले का तिला कुठे?"
"नाही.. मी पण सोहमला शोधते आहे. कुठे गेला सकाळी सकाळी.." बोलता बोलता सुधाताई थांबल्या.
" तुम्हीपण तोच विचार करताय का, जो मी करते आहे?" उषाताईंनी विचारले..
"म्हणजे ही मुले.." दोघींनी मिळून रडायला सुरुवात केली.. त्यांचे आवाज ऐकून बाकीचे उठले..
" रडायला काय झाले?" घाबरलेल्या सुधाकररावांनी विचारले..
" सोहम आणि ऋजुता दोघेही घरात नाहीत.." नाक ओढत सुधाताई बोलल्या.
" एक दुजे के लिए.." पक्यादादा बोलला..
" म्हणजे?"
" ते नाही का, घरातले नाही बोलतात म्हणून ते जीव देतात." हे ऐकून दोघींचा आवाज अजून वाढला.
" पक्या आधी न्यूज चॅनेलला बातमी दे, हे दोघे घरात नाही म्हणून."
" भाई.. आधीच दिली.." पक्यादादा कॉलर टाईट करत म्हणाला.
" म्हणजे?" त्या परिस्थितीतही सुधाताईंची विचारशक्ती चालू होती. "तुम्हाला माहित आहे हे दोघे कुठे गेले ते?"
" मी गेस केला.. आपलं तर्कतीर्थ केले. " पक्यादादा जीभ चावत म्हणाला..
" तर्कतीर्थ?" भाईने भुवया उंचावल्या..
" हां.. तेच म्हणतात ना गेसला? मी कुठेतरी ऐकला होता."
" तर्क म्हणतात त्याला." सुधाताईंनी दुरूस्ती केली.
" वेळ काय आणि तुमचे चालले आहे काय? त्या मुलांचा विचार करा." कधी नव्हे ते सुधाकरराव चिडले.
" हो. हो.. तेच करतो." विशाल म्हणाला..

" काय ताई.. ओळख आहे ना भावाची?" एक आवाज आला.
" अरे दादा तू? इथे? कशी विसरीन तुला? पण तू आज अचानक? अहो ओळखल ना याला? आईच्या शेजारी रहायचा.." सुधाकररावांनी मान हलवली.
" आठवण आली मला.." ती व्यक्ती सगळ्यांकडे पाहात म्हणाली.
" अण्णा, पाया पडतो.." भाई वाकत म्हणाला.
" तुम्ही यांना ओळखता?" सुधाकररावांनी आश्चर्याने विचारले..
" हो.. गुरू आहेत माझे." भाई थोडा कडवटपणे बोलला. भाईने उषाताईंना खुणावले. त्या पण त्यांच्यासमोर वाकल्या.
" ताई, तुझा मुलगा कुठे दिसत नाही ते."
" त्यालाच शोधतो आहे."
" म्हणजे?"
" अरे त्याचे यांच्या मुलीशी लग्न ठरले होते."
" होते म्हणजे?"
" काल यांनी ते मोडले." सुधाताई रागाने बघत म्हणाल्या.
" बरं झालं.." अण्णा म्हणाले.
" म्हणजे?" उषाताई आश्चर्याने म्हणाल्या.
" मी माझ्या मुलीसाठी त्याला मागणी घालायला आलो आहे."
"अजून एक बिच्चारा वधूपिता.." सुधाकरराव पुटपुटले.
" म्हणून हे नाटक चालू होते का?" उषाताईंनी भाईला हळूच विचारले. भाई गप्पच बसला.
" अरे, इथे त्याचा पत्ता नाही मी काय सांगू लग्नाचे?" सुधाताई म्हणाल्या.
" तू फक्त हो म्हण.. हवे ते करीन. जेव्हापासून माझ्या मुलीने त्याला पाहिले आहे तेव्हापासून माझा जीव खाल्ला आहे. लग्न करीन तर याच्याशीच म्हणून."
" पण तिने त्याला कधी बघितले कधी?"
" त्याचे काय झाले.. तु त्या दिवशी लग्न ठरले म्हणून मॅसेज केलास तर तिने तुझा फोटो पाहिला.. त्यात काल तुला तिने त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बघितले. तिथे तुझ्यासोबत तो मुलगा होता त्याच्यावर तिचा जीव जडला. आता आपली मुलगी म्हणजे आपला जीव आहे.. तिच्यासाठी कायपण.. तर तिने तो फोटो काढून मला पाठवला.. तर बाजूला आमचा भिकू.. मग मी त्याला फोन केला.. तो म्हणाला तुझाच मुलगा म्हणून. मग काय? तुझा पत्ता घेतला आणि त्याच्यापाठी आलो. आता त्याच्या मुलीशी लग्न मोड आणि माझ्या मुलीशी जोड.." हे ऐकून सुधाताईंना घाम फुटला. आपला जुना शेजारी पण गुंड आहे या माहितीने आणि आता आपला लेक या लग्नाला तयार होणार की नाही या भितीने.. त्यांचे हातपाय थरथरू लागले. त्या मटकन खालीच बसल्या.
" अरे, तुला तर घाम फुटला.. ए पिंकी लवकर आत ये. तुझ्या होणाऱ्या सासूला बघ काय झाले?" सुधाकरराव बिचारे स्वतःच्याच घरात कानकोंडे झाले होते.
पिंकी आत आली. अतिशय सुंदर. छानसा ड्रेस. आत येताच तिने सुधाताईंना नमस्कार केला. त्या तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. तोच विशाल बाहेर आला.
" डॅडी, सगळीकडे ते दोघे नाहीसे झाले आहेत ही न्युज दिली पक्यादादाने." पिंकीने त्याच्याकडे पाहिले.
" पपा, हा बघा तुमचा जावई.." ती लाजत म्हणाली..
" काय? " सगळेच जोरात ओरडले.
" हो.. हाच पाण्यात पडला होता. मग या आत्या सोबत होता.."
" कोणता फोटो बघू.." पिंकीने फोटो दाखवला. सुधाताईंच्या एका बाजूला विशाल तर दुसरीकडे सोहम उभा होता.
" पण हा तर माझा मुलगा आहे.." भाई म्हणाला.
" काय? मग तुझा मुलगा कुठे ताई?"
" ताईचा मुलगा इथे.." सोहम म्हणाला.
दरवाजात नुकतेच लग्न करून आलेले सोहम आणि ऋजुता उभे होते. भाई, पक्या आणि विशालने एकमेकांना अंगठा दाखवला.
" तू??"
" हो.."
" पपा.. मला तोच पसंत आहे.. हा नाही." पिंकी विशालकडे बघत बोलली.
" सॉरी मॅम.. आय ॲम ऑलरेडी मॅरीड ."
" म्हणजे?" यावेळेस उषाताईंनी विचारले.
" मॉम, मी तिथे लग्न केले आहे. तुम्ही चिडाल असे वाटले म्हणून बोललो नाही. आता खरेतर मी म्हणूनच आलो होतो. तुम्ही आजी आजोबा होणार आहात म्हणून घेऊन जायला.."
" पपा, याचे लग्न झाले आहे. हा लग्न करून आला.. आता?"
" मी आहे ना?" पक्यादादा बोलला..
" काय?"
" अरे म्हणजे मी आहे ना तुम्हाला स्थळ दाखवायला.. असे म्हणत होतो.." वैतागून पिंकी अण्णांना घेऊन निघून गेली. ते जाताच सगळ्यांनी सुस्कारा सोडला..
" विशाल.. तू लग्न केलेस आणि मला सांगितलेही नाहीस?"
" आजी आजोबा? डायरेक्ट? मला हे अजिबात आवडले नाही.." भाई वैतागला होता.
" काकू तुम्ही तुमच्या त्या भावाला सांगणार नसाल तर सांगतो.." विशाल म्हणाला.
" सांगा. जे धक्के बसायचे आहेत ते एकदाच बसू देत."
" मग मी काही लग्न वगैरे अजून केले नाही. मला काय एका नजरेत बसलेल्या प्रेमावर विश्वास ठेवून लग्न नव्हते करायचे."
" नशीब आमचे.." उषाताई म्हणाल्या. भाई सुधाताई आणि सुधाकररावांसमोर गेला..
" वहिनी, माफ करा हं.. ते काल अण्णानी फोन करून लग्न मोडायला सांगितले. मग मी काय करणार? साला त्याला दुखवता पण येत नाय.."
" असू द्या.. त्याचे काय एवढे.." सुधाताई सावरत म्हणाल्या.
" नाय म्हणजे आता ही पोरं लग्न लावून आले आहेत.. मग तुम्ही मला माफी देऊन आमच्या बबडीला सून करून घ्याल ना?"
" एका अटीवर?"
" आई आता अट कसली? आता तर आमचे लग्नपण झाले आहे. " सोहम कुरकुरला.
" त्यांच्या मुलीला इथे नांदायचे असेल तर अट पाळायलाच लागेल.." सगळे कानात प्राण घालून ऐकू लागले.
" लग्न झालेच आहे तर आता भाईंना हा धंदा सोडायचा.. आणि दुसरी अट..."
" बोलून टाका लवकर.." पक्यादादा बोलला.
" तुम्ही आणि पक्याने शुद्ध भाषा बोलायची.."
" साला याच्यापेक्षा त्या पिंकीशी विशालचे लग्न झालेले परवडले असते. " पक्यादादा बोलला.. आणि सगळे हसायला लागले..
हसता हसता भाईच्या डोळ्यातून पाणी आले आणि कोणेपुढेही हात न जोडणाऱ्या भाईने हात जोडून नजरेने मुलीला सांभाळून घ्या अशी सुधाताई आणि सुधाकररावांना विनंती केली.. त्यांनी मान हलवून त्यांना आश्वस्त केले..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all