वधूपिता.. बिचारा? भाग १२

कथा सोहम आणि ऋजुताची


वधूपिता.. बिचारा? भाग १२


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय: प्रेम.
जिल्हा : मुंबई..


मागील भागात आपण पाहिले की अण्णांचा फोन येतो आणि भाईचे वागणे पूर्णपणे बदलून जाते. नक्की काय कारण असेल यामागे? पाहू आता.


" अहो.. एवढे काय चिडताय?" उषाताईंचा आवाज चढला. त्यांनी सगळ्यांना पुढे पाठवले. भाईचा पाय धुवायला म्हणून त्या पाठी थांबल्या.
" काय चालले म्हणजे? शेणात पाय पडलेला दिसला नाय का तुला?"
" ते दिसले. पण तुझ्या चिडचिडी मागचे कारण नाही समजले. तो फोन आल्यापासून बघते आहे नुसती चिडचिड. आणि ते आपले व्याही होणार आहेत, कसे बोलतो आहेस? अरे ते ऐकून घेतात म्हणून काहिही बोलशील का?"

पुढे चालत असलेल्या सुधाताई सुधाकररावांशी तेच बोलत होत्या.
" काय हे या लोकांचे बोलणेवागणे? मुलाकडे बघून लग्नाला होकार दिला तर हे काहीतरी विपरीतच सुरू आहे. वरपक्षाचे म्हणून काही मानच नाही आपल्याला. काल पण तुम्ही पाण्यात पडल्यावर कसे फिदीफिदी हसले. मला नाही पटले ते. आज त्या ऋजुताचे बाबा पण कसे बोलत होते? काही पद्धतच नाही. माझे बाबा एवढे मोठे अभ्यासू असूनदेखील तुमच्याशी कसे बोलायचे? आणि हे.. मी असे म्हणत नाही की आधीचे वधूपिते जसे गरीब, बिचारे असायचे. तसे यांनी असावे पण.. इथेतर मला आपणच बिचारे असल्यासारखे वाटते आहे."
" असेल ग त्यांची काही अडचण.. काल सकाळी तर किती छान बोलत होते. त्यांच्या घरीही व्यवस्थित पाहुणचार केला आपला."
" तुम्ही काहिही बोललात तरी माझे समाधान होणार नाही.." नाक उडवत सुधाताई म्हणाल्या.

तिसरीकडे ऋजुता आणि सोहमही थोडे टेन्शनमध्ये आले होते.
" ऋजुता माझी आई हे जास्त सहन करू शकेल असे वाटत नाही."
" मलापण भिती वाटायला लागली आहे. माझे डॅडी असे नाहीत रे. ते तर त्यांच्या पंटरशी सुद्धा कधी असे बोलत नाहीत. ते खूपच क्यूट आहेत रे."
" हो पण आता ते अमरीश पुरीसारखे वागत आहेत, जिथे त्यांनी बलराज साहनीसारखे वागले पाहिजे.."
" तू डॅडला अमरीश पुरी म्हणालास?"
" ते सोडा.. ते नीट वागले नाहीत तर माझी आई ललिता पवार होईल हे नक्की.. मग मी काही करू शकणार नाही. तेव्हा बोलू नका मी घरात काही बोलत नाही म्हणून. "
" ते नंतरचे सोड.. आत्ताचे बघ.."
" तुम्ही ठरवा. तुमचे डॅडी अजून काही बोलले तर मग विसरा लग्न.."
" सोहम.."
" ऋजुता. "


चौथीकडे विशाल आणि पक्यादादांचे वेगळेच सुरू होते..
" पक्यादादा, मला भिती वाटते आहे."
" अरे, विशाल.. घाबरतो कशाला? भाई आहेत ना?"
" मला सवय नाही रे या असल्या राड्याची."
" होईल हळूहळू.. पण तू हे कोणाला बोलला नाहीस ना? नाहीतर तो अण्णा वाट लावेल आपली."
"नाही रे बाबा.."

हे आठही जण वेगवेगळ्या चिंतेत होते. सगळ्याचे मूळ होते तो भाई.. होणारा वधूपिता.. सगळे मंदिरात जाऊन घरी आले. सुधाताईंनी घरी जाताना ताजी वांगी, मिरच्या घेतल्या. घरी आल्यावर त्यांनी मुद्दाम चुलीवर भात शिजायला ठेवला. एका बाजूला भरली वांगी, दुसरीकडे ठेचा, पिठले चालू होते. उषाताई त्यांचा कामाचा उरक बघतच राहिल्या.. सगळे जेवायला बसायच्या आधी त्यांनी भाकर्‍या थापायला घेतल्या. सोहम वाढायचे काम करत होता. उषाताईंना खरेतर त्यांच्यासाठी जेवायला थांबायचे होते. पण कधी नव्हे ते झालेले एवढे चालणे आणि चुलीवरच्या जेवणाचा येणारा सुवास त्याही जेवायला बसल्या. सगळेच आवडीने जेवत होते.. भाईच्या चेहर्‍यावरचे समाधान दिसत होते. तो काही बोलणार तोच परत त्याचा फोन वाजला..
" हो अण्णा. तुमचेच काम करतो आहे."
" हो.. लवकरच होईल.."
फोन ठेवला आणि परत तो चिडचिडा भाई परत आला..
" हे काय जेवण आहे काय? पक्या एक काम कर तू नंतर जाऊन मस्त चायनीज घेऊन ये.." इतका वेळ कसेतरी स्वतःला सावरणार्या सुधाताई मात्र आता चिडल्या.
" आमच्या घरी मांसाहार चालत नाही. "
" अहो , असे काय करताय? तुम्हाला तर पिठलंभाकरी खूप आवडते ना? का असे चिडताय?" उषाताई भाईला समजावत म्हणाल्या.
" मला हे आता नको आहे. आणि यांच्याकडे नॉनव्हेज चालत नाही मग माझी मुलगी काय खाणार?"
" ते तिचं तिने बघावं.. आम्ही काय सांगू?" सुधाताई पण ऐकत नव्हत्या.
" बघावं म्हणजे? ती काय उपाशी राहणार का?"
" असं वाटत असेल तर नका देऊ तिचे लग्न लावून आमच्या मुलाशी.."
" आता नाहीच देणार.. आमची मुलगी काय वाटेवर पडली आहे का?"
"मग आमचा मुलगा पडला आहे का?" सुधाताई अजून काही बोलणार तोच सुधाकरराव मध्ये पडले..
" सुधा, शांत हो.. आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान नाही करत.."
" त्यांनी केलेला चालतो?"
" ताई, मी माफी मागते तुमची.. विशाल, पक्या तू यांना घेऊन बाहेर जा. लगेच.."
" ताई.. हे जे बोलले आहेत ते क्षम्य नाही. तरिही पदर पसरते. आपण नंतर बोलू.. तुम्ही आधी जेवून घ्या. आम्हाला वाढताना तुमचे राहिलेच आहे."
" मला भूक नाही.."
" असे नका करू.. सोहम पण उपाशी आहे. चला पटकन.." उषाताईंनी त्या दोघांना जेवायला वाढले.. नावापुरते जेवून ते दोघे उठले. नंतर त्या दोघी स्वयंपाकघर आवरायला गेल्या. तोवर भाई आणि विशाल आले होते. सुधाकरराव त्यांच्याशी बोलत आहेत ते बघून सोहमने ऋजुताला खूण केली. दोघे गुपचूप बाहेर गेले.
" मला नाही वाटत आपले लग्न आता होईल म्हणून.." ऋजुता रडवेली झाली होती.


काय वाटते सोहम आणि ऋजुताचे लग्न होईल? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all