वधूपिता.. बिचारा? भाग ११

कथा सोहम, ऋजुता आणि तिच्या बाबांची


वधूपिता.. बिचारा? भाग ११


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम.
जिल्हा : मुंबई.


मागील भागात आपण पाहिले की ऋजुताचा भाऊ विशाल परदेशातून आलेला आहे. तो लग्नासाठी फाईव्ह स्टार हॉटेल ठरवायला जातो. आता बघू पुढे काय होते ते..


" ऋजुता, तुला सोडणार नाही मी. " विशाल तिच्या अंगावर पाणी उडवत हसत म्हणाला.
" वाट बघ." ऋजुता त्याला चिडवत म्हणाली.. समोर उभा असलेला मॅनेजर हे बघून वैतागला..
" तुम्हाला माहित नाही का स्विमिंग पूलमध्ये कपडे,शूज घालून अलाऊड नसते?"
" तू मुंबईत नवीन आहेस काय?" पाण्यातून बाहेर आलेल्या पक्यादादाने विचारले.
" त्याच्याशी तुम्हाला काय घेणंदेणं? हा साधा नियम आहे." मॅनेजरचा आवाज चढला.
" अरे येड्या.. तू कोणासमोर उभा आहेस माहित हाय काय? हा भिकूभाय आहे. त्याने आता एक फोन केला ना तर नोकरी जाईल तुझी.औकातीत रहा जरा.." पक्यादादाने डोस दिले.. हे ऐकून त्या मॅनेजरच्या चेहर्‍यावरचे रंग उडाले. तो भाईची माफी मागू लागला..
" मी खरेच नवीन आलो आहे. माझी तक्रार करू नका. नाहीतर मला खरंच कामावरून कमी करतील. सकाळी त्या सरांनी फोनवर सांगितले असते तरी चालले असते." तो गयावया करू लागला.
" अरे.. एवढा टेन्शन नको घेऊ. आता फक्त ते भिजलेली माणसे आहेत ना, त्यांना गरम कायतरी प्यायला दे. आणि त्यांचे कपडे पटकन लॉंड्री करून दे."
" आता देतो सर.. तोपर्यंत तुम्ही आत चेंज करा.." तो मॅनेजर भिजलेल्या विशाल , पक्यादादा आणि सुधाकररावांना घेऊन आत गेला..
" वहिनी, सॉरी हां. जे झाले तेच्यासाठी. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.." भाई सुधाताईंना म्हणाला. त्या थोड्या व्यथित झाल्या होत्या.
" नाही मी ठीक आहे. "
" तुम्ही कुठे राहता, ते आम्हाला माहितच नाही. ते तर सांगा.." उषाताईंनी सुधाताईंना बोलके करण्यासाठी विचारले.
" हो.. आपण यांचे घर पाहिलेच नाही."
" मग या की एक दिवस बघायला." सुधाताईंनी आमंत्रण दिले.
" किती वेळ लागतो इथून जायला?"
" जायला चार तास, यायला चार तास.. उषाताई तुम्ही याच एकदा. तुम्हाला आवडेल असे वाटते मला. आमचे शहर अजूनही गावासारखेच आहे. तेवढेही डेव्हलप झालेले नाही. गावात छान नदी आहे , जुने मंदिर आहे." सुधाताई गुंगून गेल्या होत्या वर्णनात. भाईच्या डोळ्यासमोर त्याचे आजोळ आले. तो ही कितीतरी वर्षात गावाला गेला नव्हता. फिरणे म्हणजे तिथल्या तिथेच.
" मम्मी आपण उद्या चाललो यांच्या घरी.." भाईने निर्णय घेतला.
" अहो पण, लग्नाची तयारी?"
" मी सगळ्याचे कॉन्ट्रॅक्ट देतो. तुम्ही आज पटापट कपडे दागिने घेऊन टाका. तसेही एका दिवसाने फरक नाही पडत. पण तुम्हाला चालेल ना वहिनी?"
" हो चालेल ना.." तेवढ्यात भाईचा फोन वाजला.. तो नंबर बघून भाईचा चेहरा वाकडा झाला. उषाताईंना भाईचा बदललेला चेहरा कळला. त्यांनी खुणेनेच कोण म्हणून विचारले? भाईने काही न बोलता फोन उचलला..
" अण्णा, पाया पडतो.." उषाताईंना एकतर्फी संभाषण ऐकू येत होते.
" हो.. ऋजुताचे लग्न ठरले आहे. पंधरा दिवसात आहे.."
" मुलगा? सोहम नाव आहे त्याचे. हो हो.. तेच गाव आहे.."
" काय?? पण ऋजुता?"
" हो अण्णा.. हर हर भोले.." भाईने फोन ठेवला.. भाईचा चेहरा पडला होता. तोपर्यंत सोहम, विशाल, पक्यादादा आणि सुधाकरराव कपडे सुकवून आले होते.
" चला, आता खरेदीला जायचे ना?" उषाताईंनी विषय काढला.
" एक काम करा. तुम्ही बायका जा. हवे तर हा कोण, हा त्या सोहमला घेऊन जा. मी , पक्या आणि विशाल जरा बाहेर जातो." भाईंचा पडलेला चेहरा बघून सोहमने विचारले.
" डॅडी, काही अडचण?"
" उगाच कशाला दिमागची दही करतोस? जा म्हटले की जायचे गुपचूप." आतापर्यंत कधीच असे न बोललेल्या भाईचा हा अवतार बघून सोहम थोडा बिचकला. ते बघून उषाताई बोलायला आल्या.
" अहो, आपला होणारा जावई आहे, असे काय बोलताय?"
" होणारा ना? झाला तर नाय? तू पण फुकटची डोक्याला झिगझिग करू नको. जा आणि कर खरेदी.. आणि उद्या त्यांच्या घरी जायचे लक्षात ठेव."
उतरलेल्या चेहर्‍याने सगळे खरेदीला गेले. भाईच्या वागण्याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागले. त्याचे ते रूप बघून नेहमी चटरपटर करणारी ऋजुता पण गप्प बसली होती. कशीतरी खरेदी आटोपली. आता सोहमच्या घरी जाताना काय होणार याचीच सगळ्यांना काळजी वाटायला लागली.
सकाळी लवकरच पक्यादादा मोठी गाडी घेऊन आला. सुधाकरराव रस्ता दाखवायला म्हणून पुढे बसले. मध्ये भाई, उषाताई, सुधाताई बसल्या. पाठी सोहम, ऋजुता आणि विशाल बसले होते. विशाल हळू आवाजात त्यांना परदेशातल्या गमती सांगत होता. हे दोघेही हळूच हसत होते. भाईचा चेहरा निर्विकार होता. उषाताई काही बाही बोलून सुधाताईंचा ताण कमी करत होत्या. पूर्ण प्रवासात भाईने फक्त जेवण्यासाठीच तोंड उघडले होते.
" पक्यादादा, डॅडींना काय झाले आहे?" ऋजुताने त्याला बाजूला घेऊन विचारले.
" कुठे काय? " असे म्हणत त्याने सटकायचा प्रयत्न केला.
" तुला माहित नाय, असे होणार नाय. सांग ना त्यांना काय लग्न पसंत नाही का?"
" मला नाही माहित बाबा." यावेळेस मात्र पक्यादादा सटकण्यात यशस्वी ठरला.
शेवटी सगळे सोहमच्या घरी पोहोचले.
घर बघूनच उषाताई खुश झाल्या..
" किती सुंदर.. ही बाग तुम्ही जोपासली का?"
" हो.. आम्ही दोघे जमेल तसे लक्ष देतो. मी तुमची सोय ना वरच्या खोल्यांमध्ये करते. चालेल ना? तुमचे आवरून झाले ना की आपण नदीवर जाऊ, मंदिरात जाऊ.." भाई काही बोलेल म्हणून उषाताई त्याच्याकडे बघत होत्या. पण भाईच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नाही. मग मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.. त्यांनी स्वतःचे आवरले आणि सुधाताईंच्या मदतीला स्वयंपाकघरात गेल्या. पक्यादादा आणि विशाल पहिल्यांदाच अशा घरात आले होते.. ते दोघे तसेच इथे तिथे टिवल्याबावल्या करत राहिले. सोहम आणि ऋजुता मात्र घरातल्यांचा अंदाज घेत होते. चहापाणी झाल्यावर सगळे नदीवर चालत निघाले.. चालताना आपल्याच विचारात चालणाऱ्या भाईचा पाय खाली असलेल्या शेणात पडला.
" साला.. हा रस्ता हाय की उकिरडा?


भाईच्या अचानक बदललेल्या स्वभावामागे काय कारण असेल? त्यामुळे सोहम आणि ऋजुताचे लग्न होईल की मोडेल? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर दादर मुंबई

🎭 Series Post

View all