वधूपिता.. बिचारा? भाग १०

कथा सोहम आणि ऋजुताच्या लग्नाची


वधूपिता.. बिचारा? भाग १०


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.


मागील भागात आपण पाहिले की शेवटी सुधाताई लग्नाला मान्यता देतात. आणि लग्नासाठी ऋजुताचा भाऊ परदेशातून यायला निघाला आहे.. बघू आता पुढे काय होते ते..


" विशाल.. नशीब बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तरी तू आलास.." उषाताई विशालचे औक्षण करत म्हणाल्या.
" मॉम, कमॉन.. तूच मला तिथे पाठवलेस. आणि आता तूच हे म्हणतेस. नॉट फेअर."
" पण विशालभाय, ममी तर गोरीच हाय.." नेहमीप्रमाणे पक्याभाय मध्ये बोलला.
"फर्स्ट ऑफ ऑल.. डोन्ट कॉल मी विशाल भाय.. जस्ट कॉल मी विशाल. मी नाही तुमचा भाय.. ओके? मी फेअर म्हटले म्हणजे बरोबर नाही असे."
" हा पण साला एक वैताग आहे. जो येतो तो आपलीच शाळा घेतो. त्या सोहमची आई म्हणते मेहमान म्हणजे पाहुणे म्हणायचे का तुम्हाला? आणि तू म्हण फेअर म्हणजे बरोबर.. आम्ही पण टीव्ही बघतो. मला माहित आहे फेअर ॲन्ड लव्हली.." पक्यादादा आधी सुधाताईंची नंतर विशालची नक्कल करत बोलला.
सगळे हसायला लागले.
" प्लीज हां पक्यादादा त्यांना काही बोलायचे नाही.." ऋजुता फणकार्याने बोलली.
" ये बात.. आताशी लगीन ठरलाय, तर ऋजाताई मलाच बोलायला लागली. मम्मी बघताय ना?"
" आता तुम्ही सगळे काय दरवाजातच टाईमपास करत उभे राहणार की आत पण येणार? कधीची वाट बघतो आहे." भाईने आवाज दिला.. ते ऐकून सगळे आत गेले. विशालने भाईला नमस्कार केला. त्याला मिठीत घेताना भाईच्या डोळ्यातून पाणी आले..
" आयला.. तू तर माझ्यापेक्षापण हायटेड झालास रे.."
" डॅड.. "
विशाल फ्रेश होऊन आला. तो खूप दमला होता. पण तरिही ऋजुताच्या लग्नाची उत्सुकता आणि इतक्या वर्षांनंतर भेटलेले सगळे. त्याला झोप येत नव्हती. ऋजुताची लव्हस्टोरी त्याला ऐकून माहिती होती. आता ती त्याला तिच्या तोंडून ऐकायची होती.. अध्येमध्ये उषाताई, भाई, पक्यादादा सगळे सांगत होते. गाडी लग्नावर येऊन थांबली.
" आता हॉलची शोधाशोध सुरू आहे." उषाताई म्हणाल्या.
" हॉल कशाला पाहिजे?" विशाल बोलला.
" मग लग्न कुठे लावणार?" उषाताईंनी विचारले.
" फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले तर? म्हणजे पक्यादादाचे ऑपोझिट पार्टीवाले पण काही बोलणार नाहीत आणि त्या कोण तो सोहम का कोण, त्याच्या घरच्यांना पण ऑकवर्ड वाटणार नाही."
" दादा, तो सोहम म्हणजे कोणी पण नाही हां.." ऋजुता परत चिडली..
" मी त्याला कुठे ओळखतो. माझ्यासाठी तरी तो कोणीतरीच आहे." विशाल ऋजुताला चिडवत म्हणाला.
" तुम्हाला ना मी इथे नकोच आहे.. डॅडी तुम्हीपण त्याला काही बोलू नका. एवढा चिडवतो आहे मला. " ऋजुता रडवेली होत म्हणाली..
" विशाल, नको रे तिला आत्ताच चिडवू. तिचे लग्न झाले की हवे तेवढे चिडव." भाई हसत म्हणाला. ते ऐकून ऋजुता रागाने उठली. तिचा हात धरून तिला खाली बसवत विशाल म्हणाला ,
"चिडतेस काय अशी? एकतर किती दिवसांनी सॉरी वर्षांनी भेटणार.. त्यात पण चिडायचे?"
" मग तू हे चिडवणं बंद कर.."
" एकदम बंद.." विशाल कान पकडत म्हणाला.
" बरं.. आता तुमची चिडवाचिडवी करून झाली असेल तर. विशाल तू आराम कर आणि ऋजुता तू सोहमच्या घरच्यांना आयडिया देऊन ठेव, उद्या आपण हॉटेल बघायला जाऊ म्हणून. त्यांना विचारलेलं बरं. " उषाताईंनी विषय संपवला.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचे म्हणजे सुधाताई आणि सुधाकररावांना थोडे टेन्शनच आले होते. एकतर आधीच सोहमच्या लग्नामुळे त्यांना दोनच दिवसात घरी परत जाऊन यायला लागले होते. नातेवाईकांना त्यांनी फक्त सोहमचे लग्न ठरले आहे, एवढेच सांगितले होते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायच्या आधीच परत मुंबईत यायला लागले होते. आता ते हॉटेलमध्ये गेले नव्हते अशातला भाग नाही. पण ते म्हणजे थ्री स्टार क्वचित चोर स्टार. हे म्हणजे.. हॉलपर्यंत ठीक होते , आता थेट हॉटेल म्हटल्यावर त्यांना थोडे टेन्शनच आले होते. सोहम मात्र रिलॅक्स होता. आवरून ते तिघे निघाले. सोहमने गाडी पार्क केली. बाहेरच ऋजुता, उषाताई, भाई, विशाल आणि पक्यादादा सुद्धा उभे होते. पक्यादादा उगाचच नसलेली कॉलर सतत टाईट करत होता. ते बघून नाही म्हटले तरी सुधाताईंना हसू फुटले. कसेबसे त्यांनी ते दाबले. ऋजुताने विशालची सगळ्यांशी ओळख करून दिली. सगळे आत गेले. विशालने आधीच फोन करून काय हवे आहे ते सांगितले होते. त्यामुळेच तिकडचा मॅनेजर तयारीतच होता. त्याने सगळ्याचे एस्टिमेट विशालला दाखवले. त्याची एक कॉपी सुधाकररावांच्या हातात दिली. त्यावरच्या किमती बघून सुधाकररावांना दडपण आले. तो मॅनेजर लग्नाचे विधी कुठे कसे होईल हे दाखवायला उठला. सुधाकरराव सुद्धा यांत्रिकपणे उठले. सगळ्यांसोबत चालू लागले. ते सगळे स्विमिंग पूल जवळ आले. हातातल्या पत्रकाकडे बघताना सुधाकररावांना समोरून येणारा वेटर दिसलाच नाही. त्याचा जोरात धक्का लागून ते स्विमिंग पूल मध्ये पडले. ते बघून पक्यादादा आणि विशाल फसकन हसले. ऋजुताला थोडेसे खटकले. सुधाताई टेन्शनमध्ये आल्या. सोहम त्यांना सावरायला पुढे झाला.
" अरे अंकल, पण मला समजलेच नाही तुम्ही कसे पडलात ते.." पक्यादादा हसत म्हणाला.
" मी सांगू का?" ऋजुता पुढे येत म्हणाली.
तिने पक्यादादा आणि विशाल दोघांनाही पाण्यात ढकलले..
" हे असे पडले बाबा.." सोहम आणि सुधाताईंनी कृतज्ञतेने ऋजुताकडे पाहिले. विशाल आणि पक्यादादाला आधी थोडे अपमानित वाटले.


या सगळ्याचा लग्नावर परिणाम होईल का? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all