वधूपिता.. बिचारा? भाग ९

कथा सोहम आणि ऋजुताची
वधूपिता.. बिचारा? भाग ९


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.

मागील भागात आपण पाहिले की सोहमच्या आईबाबांना ऋजुता भाईची मुलगी आहे हे समजते. आता सगळे वाट बघत आहेत सुधाताईंच्या होकाराची..


" कळवा, मग तुमचा होकारनकार जे आहे ते." उषाताई म्हणाल्या. सोहमच्या डोळ्यात अपराधीपणा आणि अजिजी दिसत होती. ऋजुता अपेक्षेने बघत होती.
" मला हे लग्न मान्य आहे." सुधाताई म्हणाल्या.
" आई खरंच?" सोहमच्या आणि ऋजुताच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता.
" हो.. मला असे वाटते, तुमचे सगळे ठरलेले आहे मग नकार देण्यात काय अर्थ आहे? तसाही संसार तुम्हाला करायचा आहे. बरोबर ना?" सुधाताई सुधाकररावांकडे बघत म्हणाल्या.

" भाय मग आता तयारीला लागायचे ना? एकदम धूमधडाक्यात करायचे हा. मी ना बँजो, कोंबडीबाजा आणि ते पुणेरी ढोल सगळे बुक करतो.."
" पक्या ते काय गणपती विसर्जन आहे का, हे सगळे बुक करायला?"
" पण माझी एक अट आहे.." सुधाताई घाईघाईत म्हणाल्या.
" सांगा ना.."
" लग्न एकदम साध्या पद्धतीने केले तर?"
" असं कसं ताई.. अहो, ऋजाताईचे लग्न आहे , ते थाटातच झाले पाहिजे. बरोबर ना भाय. साधेपणाने लग्न केले तर अपोझिट पार्टीवाले काय म्हणतील?" पक्यादादा भाईकडे बघत म्हणाला.
" अहो पण लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा सोहळा, त्यात लोकांचा काय संबंध?"
" असं कसं? आमच्याकडे तर एरियात कोणाचेही लग्न असलं तरी भाई गेल्याशिवाय वरात निघत नाय.. आता त्या लोकांना वाईट नाही वाटणार काय?"
" ताई मी काय बोल्तो, आपण थोडा ॲडजस्ट करायला तयार आहे. आपण तुम्ही म्हणता तसे साधेपणाने लग्न लावून देऊ. एक मोठे ग्राऊंड ठरवू. तिथे जी काय जवळची दोन तीन हजार माणसे असतील त्यांना बोलवू. काय?"
" दोनतीन हजार? अहो आमची तीनशेच्या वर माणसे आली तरी खूप.." सुधाकरराव दबकून म्हणाले.
" अरे काळजी नका करू. तीनशे तर तीनशे.. आपण त्यांची फर्स्ट क्लास सोय करू. तुमचे सगळे गेस्ट खुश होऊन जातील बघा." भाई उत्साहात म्हणाला.
" पण लग्नाचा खर्च?" सुधाताई म्हणाल्या. कारण मोठे मैदान, दोनतीन हजार माणसे, बँजो हे ऐकूनच त्यांना टेन्शन आले होते.
" अरे खर्चाचा विचार सोडा.. भाय आपण ना हेलिकॉप्टर आणू. एक जबरदस्त एन्ट्री घेऊ.."
" आयडिया मस्त आहे.. तू जरा बघ मिळतंय का?"
" भाय तुम्हाला पटले ना? मग मी आणतोच.."
सोहम आईबाबांच्या चेहर्‍यावरचे बदलणारे भाव बघत होता.
" डॅडी थोडे बोलू का?"
" अरे बोल ना.. तुझेच लग्न आहे. तुझी काय डिमांड आहे ते सांग. आपण पूर्ण करू. अरे मम्मी. आपल्या विशालला पण फोन करून कळव हां. तू बोल बेटा."
" डॅडी. तुमची दोनतीन हजार माणसे नंतर बोलवली तर चालेल का? आम्हाला ना जास्त माणसांची सवय नाही. आणि बघा ना. एवढी माणसे स्टेजवर येणार, आम्हाला भेटणार. मग आम्हाला लग्न तरी अनुभवता येईल का? आपण काय करू लग्न एका हॉलमध्ये करू. तुम्ही त्याची सीडी दाखवा नंतर लोकांना.. म्हणजे ते पण खुश आणि आपण पण.."
" बातमें दम है हा तेरे.." भाई विचार करत म्हणाला.
" भाई मी काय म्हणतो, आपण हे केबलवर लाईव्ह दाखवले तर?"
" आयला.. एक नंबर आयडिया.. मला पटलं.. तुमी पण खुश आम्ही पण." भाई खुशीत आला होता.
"आता उरलेल्या गोष्टी नंतर ठरवू.. आम्ही निघू का आता? उशीर झाला आहे. उद्या आम्हाला परत जायचे आहे." सुधाताई निरोप घेत म्हणाल्या. तसे उषाताईंनी ऋजुताला खुणावले. तिने पटकन पुढे होऊन सगळ्यांना नमस्कार केला. सुधाताईंनी परत मनातल्यामनात तिला थोडे गुण दिले. सोहम निघाला खरा, पण त्याला आईच्या शांतपणाची खूप भिती वाटत होती. खूप बोलणी बसणार आहेत आपल्याला, अशी त्याची खात्री पटली होती. गाडीत कोणीच कोणाशी काही बोलले नाही. घरी आल्यावर सुधाताई थेट आत निघून गेल्या. सोहमचा अपराधीपणा वाढला.
" आई, चिडलीस का माझ्यावर?" त्याने आईचा हात हातात घेत विचारले.
" तुला फरक पडतो?" सुधाताईंचा स्वर थोडा रुक्ष झाला होता.
" हो.. खूप पडतो.."
" म्हणूनच जायच्या आधी काही बोलला नाहीस वाटते.."
" आई, मी खूप घाबरलो होतो. मला वाटत होते तुला ती नाही आवडणार. आधी सांगितले असते तर तू आली नसतीस, ते मला परवडणारे नव्हते."
" म्हणजे?"
" आई, ते इकडचे भाई आहेत. त्यांची नाही म्हटले तरी थोडी भिती आहेच ना ग?"
" तू या भितीपोटी लग्नाला होकार दिलास?" सुधाताईंनी आश्चर्याने विचारले.
" तसे म्हण हवे तर. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी.." सोहम बोलता बोलता सांगून टाकणार होता.
" काय झाले?" सुधाताईंनी बारिक डोळे करत विचारले.
" अग, ऋजुताने मला गुंडांपासून वाचवले. मग आमची मैत्री झाली. आता मला सांग, जी मुलगी मला गुंडांपासून वाचवते, तिचे मन दुखावून मला चालेल का?"
" ते ही आहेच.." सुधाताई सुस्कारा सोडत म्हणाल्या.
" पण मला ती माणसे बरी वाटली.." सुधाकरराव म्हणाले.
" बरी? माझे तर ह्रदयाचे ठोके चुकले. बाबांच्या आत्म्याला काय दुःख होईल माहित आहे.."
" ते तर आहेच ग.." नकली सहानुभूती दाखवत सुधाकरराव म्हणाले. " पण बरे झाले तू होकार दिलास. नाहीतर मला वाटत होते, माझ्या आत्म्याला शांती मिळेल.."
" तुमचे आपले काहीतरीच.."
" अग खरेच.."
" आई, बाबा, तुम्हाला खरेच ऋजुता आवडली आहे?"
" त्याचा काही फायदा आहे का?"
" हो.."
" मग ऐक.. तिचे बोलणे, वागणे बघून मी तर थोडी घाबरलेच. पण नंतर जाणवले की ती तुझ्या प्रेमापोटी तुझे संरक्षण करते आहे. तसेही आम्ही राहणार दुसरीकडे, मग का नाते खराब करायचे? आणि तुझी तयारी आहे ना? मग नको जास्त विचार करूस." सुधाताई सोहमला थोपटत म्हणाल्या. सोहमचा फोन वाजला..
"ऋजुताचा फोन आहे."
" उचल मग.."
" हां बोल ऋजुता.."
" सोहम, अरे आम्ही दादाला फोन केला होता आपले लग्न ठरलेले कळवायला.."
" मग?"
" अरे तो इथे पुढच्याच आठवड्यात येणार आहे.. त्याचे म्हणणे आहे तो पंधरा दिवस इथे आहे तर लग्न तो असतानाच व्हावे.."
" काय?? एवढ्या लवकर?"



काय वाटते, पंधरा दिवसात या दोघांचे लग्न पार पडेल?
बघूया पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all