वधूपिता.. बिचारा? भाग ८

कथा सोहम आणि ऋजुताची..
वधूपिता.. बिचारा भाग ८


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.

मागील भागात आपण पाहिले की सोहमचे आईबाबा ऋजुताला बघायला येतात. त्याचवेळेस ऋजुता एकाला धमकावते. आता पाहू पुढे काय होते ते..


" बबड्या.. काय झाले? कोणाच्या नावाने बोंबलते आहेस?" आतून भाई बाहेर आले.
" काही नाही डॅड. कोणीतरी छूं सोहमच्या अंगावर ओरडत होता. त्याच्या अंगावर धावून गेला.. मग मला जरा राग आला."
" म्हणून तू पुढे गेलीस? तो पक्या किधर मर गया? ए पक्या.." भाईचे ओरडणे बघून कधी नव्हे ते सुधाताई सुधाकररावांना चिटकून बसल्या..
" भाय बोलवलत मला.." पक्या भरपूर पिशव्या सांभाळत आला.
" कुठे गेला होतास ? इथे राडा झाला ना?"
" बस काय भाय? तुम्हीच ते कोण मेहमान येणार म्हणून मला काय काय आणायला पाठवलत ना?"
" हो काय? मग सोड. जा आत जाऊन ठेव ते.. तुझ्या मम्मीला जाऊन सांग.. गेस्ट आले आहेत. या या. वेलकम वेलकम.. या गरीबखान्यात तुमचे स्वागत आहे.." भाई गाडीचा दरवाजा उघडत सुधाकररावांना बोलला. त्याला बघून सुधाताई दुसर्‍या बाजूला सरकल्या. सुधाकररावांनी त्यांना डोळ्याने खुणावले. तेव्हा कुठे त्यांनी चेहर्‍यावर ओढूनताणून हसू आणले. त्यांची नजर सोहमला शोधत होती. ज्याने या कशाचीच काहीच कल्पना त्यांना दिली नव्हती..
" चल आत चल. नंतर बघू काय करायचे ते." त्यांच्या मनातले विचार ओळखून सुधाकरराव म्हणाले.. सगळे आत गेले. आत उषाताईंनी सगळी तयारी करून ठेवली होती..
" मम्मी गेस्ट आले.." पक्यादादाने ओरडून सांगितले.. तो गेस्ट हा शब्द सुधाताईंना खटकला. न राहवून त्या बोलल्याच.
" तुम्हाला पाहुणे म्हणायचे आहे का?"
" तेच ते.. गेस्ट म्हणा, पाहुणे म्हणा की मेहमान मतलब तोच होतो ना.." पक्या दात दाखवत हसला. कसानुसा चेहरा करत सुधाताईंनी ओठ ताणले.
" या ना बसा.." आल्यापासून पहिल्यांदाच शुद्ध भाषा ऐकून सुधाताईंच्या जीवात जीव आला.
" बसा हं.. आणि कसलाच संकोच करू नका.. घ्या पाणी घ्या." उषाताई म्हणाल्या.
"हो.. थंड पाणी पिल्यावर कसले बरे वाटते माहित हाय.." पक्या पचकला.
" पिल्यावर.." सुधाताईंच्या तोंडातून पाणी बाहेर पडता पडता वाचले.
" हो ना.. आम्ही तर फक्त ठंडाच पितो.."
भाई उगाचच काहीच्या काही बोलत होता.
" मी ओळख करून देते हं.. मी उषा ऋजुताची आई, हे तिचे बाबा सलील आणि हे आमचे कौटुंबिक मित्र प्रकाश."
" भाय हा प्रकाश कोण ?" पक्याने मागे वळून बघत विचारले..
" हे ना फार विनोदी आहेत.. त्यांना स्वतःचे पक्या हेच नाव इतके आवडते ना काय सांगू?" उषाताई परिस्थिती सांभाळत बोलल्या. त्या पक्याकडे बघत होत्या. पण पक्यादादा आता टोटल मूडमध्ये आला होता. तो सुधाताईंच्या बाजूलाच बसला होता. त्यामुळे आता उषाताईंना त्याला खुणावताही येत नव्हते.. प्रारंभीक बोलण्यानंतर उषाताईंनीच विषय काढला.
" तुम्हाला ऋजुता आवडली ना?" बाहेर चुरूचुरू बोलणारी ऋजुता या दोघांसमोर अगदी गप्प बसली होती. पण सुधाताईंच्या डोळ्यासमोरून ती त्या गाडीवाल्याला मारत असल्याचे दृश्य हटायला तयार नव्हते. त्यांनी फक्त हसल्यासारखे केले. सुधाकररावांनी भाईला विचारले.
" तुम्ही नक्की काय करता?"
" आपण ना? आपला मोठा बिझनेस आहे."
" हो का? कसला व्यवसाय बरे?"
" ते आपण ना मांडवली करतो, तोडपानी करतो.." इति पक्यादादा..
" म्हणजे?"
" सांगते ना.. तुम्ही काही घेतलच नाहीत. ही मिठाई खाऊन बघा ना.. आमच्या इकडची स्पेशालिटी आहे.." मिठाईचा तुकडा उचलताना सुधाताईंनी परत एकदा ऋजुताकडे पाहिले. आता ती अतिशय शांत, सोज्ज्वळ दिसत होती. अतिशय प्रेमाने सोहमकडे बघत होती. त्याच्या डोळ्यात सुद्धा तिच्यासाठीचे प्रेम दिसून येत होते.त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती.
" परत विचारते म्हणून जरा माफ करा हं.. लग्नाचा मुहूर्त काढायचा ना जवळचा?"
" जवळचा? काय घाई आहे? आपण बघू ना थोडा लांबचा.. काय बोल्तो?"
" अहो, असे काय करता आहात? ते मुलाकडचे आहेत ना? मग त्यांच्या मनासारखे व्हायला नको का?"
" व्हायला तर पाहिजे ना.. आपण कुठे नाय बोलतो हाय का? पण बघ ही भाईच्या मुलीची शादी आहे.. मग कशी जोरोशोरोंसे होनी चाहिये ना?" बोलता बोलता भाईच्या तोंडातून निघून गेले.
" हां भाय.. मग आम्ही सगळेच नाचू.. सपनेमें मिलती है.. बराबर ना भाय." पक्या मध्ये बोलणे सोडत नव्हता..

" भाईची मुलगी???" सुधाताईंचा संयम संपला..
" आम्हाला ना उद्या लवकर घरी जायला निघायचे आहे.. आम्ही निघू आता?"
" अरे असं काय? तुम्ही पयल्यांदाच आमच्या घरी आले. जेवल्याशिवाय कसे सोडणार?"
" अहो, खरेच नको.. आम्हाला भूकच नाही."
" हे बघा ताई.. भूक नाय तर थोडं खाऊन उठा. पण खाल्ल्याशिवाय तुम्ही इथून जाणार, पटत न्हाय.. ममी तू ताटं वाढायला घे. बबडे तू आईला मदत कर." भाईने हुकूम सोडला.. सोहम तर आईच्या नजरेला नजर देत नव्हता. नाईलाजाने हे दोघे जेवणासाठी उठले. डायनिंग टेबलवर खूप पदार्थ होते. दोन कोशिंबीरी, चार भाज्या, फुलके, पोळ्या, साधा भात, मसालेभात, गुलाबजाम, श्रीखंड.. ते बघून सुधाकररावांनी विचारले.
" अजून कोणी जेवायला येणार आहे का?"
" बस काय? चेष्टा करता काय गरिबाची? अरे तुमी लोक येणार म्हणून केला आहे. मी तर हिला सांगत होतो मस्त चिकनबिकन काहीतरी कर तर बायको कधी ऐकते काय कोणाचे?" भाई सुधाकररावांसमोर टाळीसाठी हात पुढे करत म्हणाला.. शेवटचे वाक्य पटल्यामुळे त्यांनीही पटकन टाळी दिली..
" आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. तुम्ही एकाच स्वयंपाकघरात सगळे बनवता?" सुधाताईंनी सोहमकडे रागाने बघत विचारले.
" शाकाहारी तर मी पण आहे. माझी भांडी वेगळी असतात.काळजी करू नका.." उषाताई त्यांची समजूत काढत म्हणाल्या. सुधाताईंना खरेतर सोहमचा खूप राग आला होता. पण त्यांचे संस्कार त्यांना सगळ्यांसमोर बोलण्यापासून त्यांना रोखत होते. कसेबसे जेवण झाल्यावर त्यांनी निघण्याची सूचना दिली. उषाताई त्यांना ओटी भरण्यासाठी म्हणून आत घेऊन गेल्या..
" माझी लेक थोडी अवखळ आहे पण मनाने चांगली आहे. तुम्ही जर लग्नाला मान्यता दिली तर तुमचे उपकार मी जन्मात विसरणार नाही.. बस. जास्त नाही बोलत मी.." उषाताईंनी डोळ्यातले पाणी पुसले. दरवाजात उभी असलेली ऋजुता पण त्यांना मूकपणे विनवत होती. काहीसा निश्चय करून उषाताई उठल्या..



काय असेल उषाताईंचा निर्णय? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all