वधूपिता.. बिचारा? भाग ५

कथा सोहम आणि ऋजुताची
वधूपिता.. बिचारा? भाग ५


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम.
जिल्हा : मुंबई.


मागील भागात आपण पाहिले की सोहमचा अज्ञानातून आलेला आक्रमकपणा ऋजुताला आवडतो आणि ती त्याच्याशी लग्न करण्याचा निश्चय करते. आता पाहू पुढे काय होते ते..


" मॉम, ए मॉम.. माझा ट्रेडिशनल ड्रेस कुठे आहे?" ऋजुता ओरडत होती.
" अग, काय हा पसारा? आणि कोणता ट्रेडिशनल ड्रेस म्हणते आहेस तू?" उषाताईंनी विचारले.
" मातोश्री.. बरोबर ना? हां तर तो आपण घेतलेला सलवार कुर्ता. तू खूप पाठी लागली होतीस घाल म्हणून आणि मी वापरत नव्हते तो."
" तो???" उषाताई आठवत म्हणाल्या.
" देऊन नाही ना टाकलास?" ऋजुताने संशयाने विचारले.
"नाही म्हणजे माझे कपडे तुला त्या भांडेवालीला द्यायला आवडतात ना?"
" तुझे न वापरलेले कपडे म्हणायचे आहे का तुला? पण जाऊ दे. सध्या तरी माझी बोहारीण आलेली नाहीये.."
" कोण रीण? मॉम तू आणि तो चिकना कसले कसले संस्कृत शब्द वापरता ना? पार डोक्यावरून जातात. जरा मराठीत बोलाना."
" आता हा चिकना कोण?" उषाताईंनी डोळे बारीक करत विचारले.
" अग आमचे नवीन सर. एवढं काय काय बोलतात ना, सगळं हजार फुटांवरून उडत जाते.." ऋजुता सावरत म्हणाली.
" काय ग, काय ही भाषा? सरांना कोणी चिकना म्हणते का? आणि हजार फुटांवरून काय जाते? थोडे लक्ष द्यावे म्हणजे समजेल ना."
" मातोश्री, आता मी त्याच्याकडेच पूर्ण लक्ष देईन. अगदी तुला आवडेल तसाच आहे.." ऋजुता स्वप्नात हरवत म्हणाली.
" त्याच्याकडे काय? मित्र आहे का तुझा? सरांकडे म्हणावं. तुझी ना भाषा खूपच बिघडली आहे बाई. आणि आज हे नवीन मातोश्री काय? महाभारत पाहिलेस की रामायण?"
" काही नाही पाहिले..तूच म्हणतेस ना मराठीत बोल म्हणून. ते जाऊ दे, तू मला ड्रेस शोधून देतेस की मी ती शॉर्ट घालून जाऊ?"
" अगदी बापावर गेली आहेस. तो बाहेरच्यांना ब्लॅकमेल करतो , तू मला कर. देते शोधून.."
ऋजुताने छानसा सलवार कुर्ता, त्यावर नाजूकसे दागिने, केसांची वेणी त्यावर छोटीशी टिकली असा जामानिमा केला आणि आपल्या बाबांना दाखवायला गेली.
" पिताश्री, कशी दिसते मी?"
" एक नंबर.. बोले तो. काही सवालच नाही." भाई लेकीला पाहून खुश झाला होता.
" मी दिसते संस्कारी?"
" हो ग माझी गुणाची बाय ती. संस्कारीच संस्कारी दिसतेस.."
" जाऊ मग मी कॉलेजला?"
" अशी कशी जाशील? थांब मला काजळ लावू देत. कोणाची नजर नको लागायला." उषाताई तिला काजळ लावत म्हणाल्या. नेहमी जीन्स, मिडीमध्ये वावरणारी त्यांची लेक आज वेगळीच दिसत होती.
" मोठी दिसते ना?" ऋजुता बाहेर गेलेली पाहून भाई उषाताईंना बोलले.
" मुली असतातच अशा. लहान लहान म्हणताना कधी मोठ्या होतात समजत नाही. आणि कधी लग्न होऊन घरट्यातून उडून जातील समजणार पण नाही." उषाताईंच्या डोळ्यात पाणी आले.
" पण तू आत्ताच का रडतीयेस? ती काय लगेच लग्न करून नाही चालली." भाईला काल पक्याने सांगितलेली खबर आठवली. त्याने स्वतःशीच नाही म्हणत मान हलवली. उषाताई आपल्याच नादात बोलत होत्या.
" लग्न करून चालली नाही हे माहित आहे, पण कोण लग्न करणार हिच्याशी त्याचे टेन्शन आले आहे मला. सभ्य घरातला मुलगा काय तुझ्या धंद्याकडे बघून हिच्याशी लग्न करेल असे नाही वाटत मला. आणि हेच आयुष्य तिने जगावे असेही नाही वाटत." उषाताईंच्या आवाजात काळजी जाणवत होती. सभ्य मुलगा म्हटल्याबरोबर भाईच्या डोळ्यासमोर तो न बघितलेला मुलगा उभा राहिला.
" तू नको काळजी करूस. मी आहे ना?" भाई त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत बोलले..
" तू आहेस म्हणूनच काळजी करावी लागते ना? तुझा स्वभाव चांगला आणि तू अगदीच काही वाईट वागत नाहीस म्हणून निभावून नेले मी. पण पोरीच्या नशीबात नको हे सगळे." उषाताई भाईच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होत्या. भाई या सगळ्याचा विचार करत होता.

" ओ माय गॉड.. ऋजा कसली चाबूक दिसतेस ग तू. " ईशा ऋजुताला पाहून बोलली.
" चाबूक नाही छान म्हण किंवा सुंदर म्हण.." ऋजुता तिला डोळा मारत म्हणाली.
" आता हे काय नवीन? ए बाई तुझ्या डोक्यातून त्या तेलकटचे भूत गेले नाही का अजून?" ईशाने आश्चर्याने विचारले..
" भूत नको म्हणूस. मला खरेच तो आवडला आहे.. तो म्हणाला ना आम्ही साधी माणसे आहोत.. आणि आणि.. बाणी पाणी. सो त्याच्यासाठी हे सगळे."
" कमॉन ऋजू.. माझा विश्वास नाही बसत. तू आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट.. आय कान्ट बिलिव्ह इट."
" जिंदगीमें बहुतसी चीजे पहलीबार होती है मामू.. असे आपले थोर मुन्नाभाई सांगून गेले आहेत.. चल मला जरा त्या छाव्याला नाही नाही.. काय म्हणतात ते प्रियकराला भेटू दे." दोघीही खळखळून हसल्या.
सोहम शशांक सोबत बोलत होता. त्याने तर आधी ऋजुताला ओळखलंच नाही.
" हाय.." ऋजुताने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला.
" तुम्ही?? ते ही या कपड्यांमध्ये?"
" चांगली नाही का दिसत मी?"
" चांगली???" सोहमला ती कातिल दिसत होती.. तिचा तो धीटपणा. मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी त्याला ती आवडायला लागली होती. पण आईचा विचार मनात आला आणि त्याने सगळेच विचार बाजूला सारले.
" खूप छान दिसताय तुम्ही. पण मी जाऊ का? आमचे आता लेक्चर आहे."
" जाताय? पण मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे."
" अजून काही बोलायचे आहे का? आपण कालच बोललो ना?" नाही म्हटले तरी सोहमला हे बोलताना थोडा त्रास होत होता. आयुष्यात पहिल्यांदाच समोरून कोणतीतरी मुलगी त्याच्याशी प्रेमाने बोलत होती पण तिच्याशी बोलणे म्हणजे हातपाय तोडून घेण्यासारखेच होते.. पिक्चरमध्ये दाखवतात तसे.. पण नाही तरी कसे म्हणू? त्याला काही सुचत नव्हते.
" प्लीज??" ऋजुता गयावया करत म्हणाली.
" चला.."
" पण तुझे लेक्चर?"
" तो अभ्यास मी करीन नंतर.."


काय बोलायचे असेल ऋजुताला सोहमशी? भाईंच्या मनात नक्की काय सुरू आहे बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all