वधूपिता.. बिचारा? भाग ३

कथा सोहम आणि ऋजुताची


वधूपिता.. बिचारा? भाग ३


राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय: प्रेम
जिल्हा : मुंबई.


मागील भागात आपण पाहिले की सोहम आणि ऋजुता दोघेही कॉलेजला जाण्यासाठी उत्सुक आहेत. बघू आता पुढे काय होते ते..


" सोहम, नक्की जाऊ का आम्ही? तू राहशील इथे?" सुधाताईंनी त्या खोलीकडे बघत विचारले.
" हो आई. मी करीन मॅनेज. सॉरी.. माफ कर.. मी करतो सगळे व्यवस्थित."
" हो रे बाबा.. आधीच ही टीचभर खोली. कधी सुरू होते आणि कधी संपते तेच समजत नाही. कुठे आपले मोठे घर आणि कुठे हे?" सुधाताईंना चिंता वाटत होती.
" हे बघ, आपले ठरले आहे ना शिक्षणासाठी सोहमने इथे रहायचे. तू उगाच फाटे फोडत बसू नकोस. चल आपण निघूया. जेवढ्या लवकर निघू तेवढे आपल्याला पण बरे आणि त्यालाही." सुधाकरराव सुधाताईंना म्हणाले.
आई, बाबा निघाल्यावर सोहमला थोडे वाईट वाटलेच पण त्याहीपेक्षा थोडे सुटल्यासारखे वाटले. सुधाताई तशा चांगल्या होत्या पण सतत शुद्ध मराठीचा अट्टाहास धरायचा. त्याला तो वैतागायचा. त्या शिस्तीपासून थोडे बाहेर आल्यावर त्याला आज खूप मोकळे वाटत होते. उत्साहाने तो दुसर्‍या दिवशीच्या कॉलेजची तयारी करू लागला.
" हाय.." एक आवाज आला.. सोहमने मागे वळून पाहिले.
" मी शशांक.. तुझा रूममेट आहे बहुतेक." परत एकदा कन्फर्म करून तो बोलला..
" हाय. मी सोहम. इथे नवीनच आलो आहे. बरे झाले तू आलास. मला ना समजतच नव्हते कोणाशी बोलायचे ते."
" होते असे सुरूवातीला. नंतर आपण रूळत जातो. एनी वेज फ्रेंड्स?" शशांकने हात पुढे केला.
" मग काय? एकत्र रहायचे म्हणजे मैत्री असलीच पाहिजे." सोहमही हात पुढे करत म्हणाला.
" चल, तुझे आवरून झाले असेल तर खाली जाऊन एक चक्कर मारून येऊ. थोडी पेटपूजा पण करू."
" तुझे सामान?" सोहमने आश्चर्याने विचारले.
" ते लावता येईल रे नंतर. इथे थोडीच कोणी बघायला येणार आहे.." शशांक हसत म्हणाला. सोहमला पटले. त्याने बाहेर जाण्यासाठी घालायला एक शर्ट काढला.
" तू हा शर्ट कॉलेजला घालणार?" शशांकने आश्चर्याने विचारले.
" हो. माझे आवडते कपडे आहेत हे."
" हे असे कपडे घातलेस ना तर मुले चिडवून जीव घेतील तुझा."
" पण माझ्याकडे हेच कपडे आहेत. जाऊ दे जे होईल ते होईल. " सोहम थोडा निराश होत बोलला. यावर शशांकने बोलणे टाळले. दोघे खाली जाऊन खाऊन पिऊन आले. इतका वेळ नव्हते पण आता मात्र सोहमला थोडे टेन्शन आले. उद्या कॉलेजला काय होईल याच विचारात तो तळमळत होता..

"मॉम, मी आज हा ड्रेस घालू?" ऋजुता
आरशासमोर उभी राहून विचारत होती.
" अग हा काय ड्रेस आहे का? बिनबाह्यांचा, पाठपोट सगळे उघडं. जरा बरे कपडे घाल." उषाताई ऋजुताचे कपडे बघून वैतागल्या होत्या.
" मॉम ही फॅशन आहे ग.. सगळ्याजणी अशाच कपडे घालतात."
" हो का? मग येऊन कंप्लेंटच करते तुमच्या प्रिन्सिपल सरांकडे."
" ए बाई.. नको ग. म्हणून मी तुला काही विचारायला येत नाही.. डॅडी कसे समजून घेतात. तू अजिबात नाहीस तशी."
" तुझ्या डॅडीला काय होतंय बोलायला. उद्या लग्न झाल्यावर सासरचे मलाच शिव्या देतील."
" मॉम चिल मार. मी असा एक जण शोधीन ना, जो मला घाबरून राहिल." ऋजुता नाक उडवत म्हणाली आणि तिथून निघून पण गेली. तिला जाताना पाहून उषाताईंनी डोक्याला हात मारून घेतला.
ऋजुता कॉलेजला पोहोचली. तिथे तिची गँग गेटवर तिची वाटच बघत होती. आधीची दोन्ही वर्ष इथेच काढल्यामुळे कॉलेज तिला आणि ती कॉलेजला चांगलेच ओळखत होती. तिला बघून तिची गँग खुश झाली.
" हॅलो, लेडी डॉन.."
" हे काय नवीन नाव?"
"मग काय? तू जी शूटिंगची प्रॅक्टिस करत होतीस, त्यावरून तुला हेच नाव शोभते." ईशा म्हणाली.
"बरं माझी आई.. तुम्हाला रॅगिंगसाठी कोणी बकरा सापडला का?"
" अजून तरी नाही. ए ऋजुता ते बघ समोरून शिकार चालत येते आहे." समोरून येणाऱ्या सोहमकडे बघत ईशा म्हणाली. ऋजुताने सोहमकडे पाहिले. अगदी चपचपीत नसले तरी डोक्याला लावलेले तेल. इन केलेले शर्ट. त्याला बघून तिला हसायलाच आले.
" एकदम परफेक्ट." ती म्हणाली.
" ए चिकने." ऋजुताने सोहमला हाक मारली. सोहम तसाच पुढे जात राहिला. ते बघून ऋजुता चिडली. ती पुढे झाली आणि सोहमच्या पुढे जाऊन उभी राहिली.
" ऐकायला येत नाही काय?" तिने त्याला रागाने विचारले.
" नाही बुवा.. येते की? का काही अडचण आहे का?" सोहमने निरागस चेहरा करून विचारले. यावर काय बोलावे तेच ऋजुताला समजेना. सोहमच्या निरागस चेहर्‍याकडे बघून त्याला काही बोलायचेही भान तिला उरले नाही. पण बाजूला उभा असलेल्या शशांकच्या चेहर्‍यावरचे हास्य बघून आपण काही केले नाहीतर सगळे कॉलेज आपल्याला हसेल हे तिला समजले होते.
"ऐकायला येते तर मग हाक मारल्यावर थांबायला काय झाले होते."
" मला हाक मारायला तुम्हाला माझे नाव कुठे माहीत आहे."
" ए चिकने म्हणून आता तर तुला हाक मारली."
" हे पहा, मी दिसायला सुंदर आहेच, पण म्हणून अशी हाक मारणे तुम्हाला शोभत नाही." सोहम आणि ऋजुताचा संवाद ऐकायला हळूहळू कॉलेज गोळा होऊ लागले होते. सोहम कितीही आवडला तरिही आपली मान खाली जाऊ नये म्हणून ऋजुताने लपवून आणलेले पिस्तुल काढले. सोहमच्या डोक्याला लावले.
" इथे जास्त आवाज नाही करायचा.. आपण जे सांगतो ते गुपचूप ऐकायचे." अख्ख कॉलेज श्वास रोखून काय चालले आहे ते बघत होते. आज पहिल्याच दिवशी सोहमने नको त्या मुलीशी पंगा घेतला म्हणून काहीजण हळहळत होते.
सोहमने शांतपणे ऋजुताच्या हातातले पिस्तुल घेतले. तिच्या हातात ठेवले, तिची मुठी बंद केली..
" आम्ही ना या खेळण्यांशी लहानपणी खेळायचो. याची भिती आम्हाला दाखवू नका. येतो मी." ऋजुताला काही समजायच्या आत सोहम शशांकच्या पाठीवर हात ठेवून चालायला लागला.


झालेल्या या घटनेचा परिणाम ऋजुतावर कसा होईल, पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all