वधूपिता.. बिचारा?

कथा एका डॉनच्या मुलीची आणि तिच्या सालस नवर्‍याची


कथेचे नाव : वधूपिता.. बिचारा?

राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम.
जिल्हा : मुंबई

" सोहम बाळा, खेळून आलास ना. हातपाय धू. शुभंकरोती म्हण. त्यानंतर परवचा. ते झाले की देते हो मी खायला."
" आई, आजच्या दिवस परवचा स्कीप केला तर चालेल का?"
" स्कीप? हा काय शब्द रे? आपले ठरले आहे ना घराबाहेर इंग्लिश आणि घरात मराठी."
" हो ग.. पण कधी कधी होते ना."
" ते नाहीच व्हायला पाहिजे.. आपले घर हे सुसंस्कृत, सुशिक्षित आहे. भाषा, आचारविचार हे व्यवस्थित असलेच पाहिजेत."
" हो आई." सोहमने आईच्या हो ला हो केले.
"आता तू मोठा झालास. शिकण्यासाठी काही वर्षांनी मोठ्या शहरात जाशील. आपले संस्कार विसरायचे नाहीत. "
" हो आई.."
" अहो ऐकलत का? येताय ना चहा घ्यायला." सुधाताईंनी सुधाकररावांना आवाज दिला..
सुधाताई आणि सुधाकरराव एका गावातले प्रथितयश मध्यमवर्गीय कुटुंब. त्यांचा एकुलता एक मुलगा सोहम. रीतीरिवाज, कुळाचार पाळणारे. जिलेबीसारखे सरळ.. हे आहे या कथेतले पहिले कुटुंब.. आता भेटू कथेतल्या दुसर्‍या कुटुंबाला.


" साला, बेन**., एक काम नीट करता येत नाय.. मा**** फुकटचे पैसे देतो काय मी तुम्हाला?" भाई खूपच चिडला होता..
" तसे नाय भाय.. आम्ही काम करणार इतक्यात ते दुसर्‍या गँगचे लोक आले."
"आणि तुम्ही पाय लावून पळून आलात. इज्जतच ठेवली नाय काय तुमी लोकांनी आपली."
" भाय, गलती झाली. एकबार सोडून द्या ना. पुढच्या वेळेस त्या टकल्याला नाय टपकावले ना तर नाव बदलीन."
" टपकावायला ते काय फळ आहे की मी फूल आहे?" भाईने जोक मारला म्हणजे तो शांत झाला हे पक्याने ओळखले. तो जोक जरी भंगार असला तरी अजून बोलणी खाण्यापेक्षा त्या फालतू जोकवर हसणे सोपे होते. पक्याचे सगळे पंटर खीखी करत हसले. भाईला जोक वाया न गेल्याचा आनंद मिळाला.
" मग भाई मी निघू?"
" निघ.. पण त्या टकल्याला काय करू नकोस.. बालबच्चेवाला आदमी हाय. आपल्याला कोणाची हाय नको. जास्तीत जास्त एक दोन फुलटॉस दे. आणि सांग भायचा निरोप हाय. यापुढे आपल्या एरियात परत दिसलात तर तंगडी तोडून हातात देईन.."
" भाई पाया पडतो.."
"हर हर भोले.." पक्या आणि त्याची गँग गेलेली बघून इतका वेळ दरवाजात बसून हे सगळे ऐकणारी त्याची लेक बाहेर आली..
" डॅडी.."
" बोल माझी बबडी.."
" ईई डॅड बबडी काय ? मला नाही आवडत."
" पण मला आवडते ना.. तू तर आहेसच माझी बबडी."
" माझे नाव आपण नंतर ठरवू.. आधी मला सांगा त्या दादाला तुम्ही बे***, मा**** म्हणालात त्याचा अर्थ काय?"
दहा वर्षाच्या ऋजुताने तिच्या बाबाला अर्थ विचारला.. ते ऐकून भाई विचारात पडला. पोलिसांच्या कोणत्याच प्रश्नाला वाटेल ते उत्तर देणारा तो लेकीच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे हा विचार करू लागला. पण त्यांचे हे बोलणे तिच्या आईने उषाने ऐकले होते. तिने येऊन एक जोरात रपाटा दिला तिला.
"किती वेळा सांगितले कार्टीला. इथे येऊन नको ती बोलणी ऐकू नकोस. पण ऐकेल तर शपथ.. आणि तुम्हाला दरवाजा लावून घेता येत नाही?" तोफ भाईच्या दिशेला वळली.
" अग जरा हळू बोल.. मुंबईचा भाई आहे मी. तुला असे माझ्या अंगावर ओरडताना कोणी ऐकले तर काय म्हणेल? साला आपल्या घरातच आपल्याला मान नाय.."
" मान काय गळा पण घ्या.. पण यापुढे घरी हे धंदे नकोत. मला हिला या सगळ्यापासून दूर ठेवायचे आहे.." इतका वेळ आईबाबांचे भांडण ऐकणारी ऋजुता पुढे आली.
" दुनिया की कोईभी ताकत मुझे इससे जुदा नही कर सकती.. "
" परत बोललीस तर बघ. बाप तशी बेटी. तुझा भाऊ बघ कसा गुपचूप हॉस्टेलवर राहून अभ्यास करतो आहे. तू पण लाग अभ्यासाला." आईचा चढलेला आवाज ऐकून ऋजुता तिथून पाय आपटत निघाली. भाईचा जीव खालीवर झाला.
" अग किती बोलतेस तिला. जरा तरी दयामाया ठेव."
" दयामाया आणि तिच्यावर? अगदी पावलावर पाऊल आहे तुझ्या. अभ्यास सोडून हेच धंदे आवडतात."
" मग काय वाईट आहे त्यात?"
" काही वाईट नाही ना? मग अर्थ सांगताना का टरकला होतास? किती वेळा सांगितले घरी शिव्या देत जाऊ नकोस. पण सुधारशील का? माझीच चूक झाली. कुठून मेली बुद्धी झाली आणि तुझ्याशी लग्न केले."
" तुला पश्चाताप होतो का?"
" होऊन कोणाला सांगते? पण आता या मारामारीपासून मुलांना लांब ठेव म्हणजे झाले." उषा वैतागून निघून गेली. भाई विचारात पडला.
भाई म्हणजे भिकू म्हात्रे.. या एरियाचा डॉन.. त्याचे नाव भिकू हे धंद्यातले. सत्या हा त्याचा आवडता पिक्चर. त्यात सत्यापेक्षाही भिकू त्याला आवडला म्हणून भिकू.. त्याचे खरे नाव सलिल. हा डॉन जरी असला तरी मनाने खूप चांगला होता.. तसे बघायला गेले तर या धंद्यात पण तो मजबुरीत आला होता. शिकून नोकरी नाही, घरची गरिबी. त्यातून तो इथे ओढला गेला. पोरगा म्हणून आलेला या जगाचा मुख्य कधी झाला त्यालाच कळले नाही. याचे काम फक्त खंडणी घेणे. बाकी वाईट कामांपासून हा दूरच रहायचा. त्यामुळे नाही म्हटले तरी बाकी लोक नैतिकतेच्या बाबतीत त्याला मानायची.. त्याची बायको उषा. जगात जर भाई कोणाला घाबरत असेल तर दोघांनाच. एक देवाला आणि दुसरे त्याच्या बायकोला. बाहेर शेर असलेला भाई तिच्यासमोर भिजलेला उंदीर व्हायचा. तसेच जगात सगळ्यात जास्त प्रेम जर त्याचे कोणावर असेल तर त्याच्या दोन मुलांवर.. मोठा विशाल आणि धाकटी ऋजुता. मोठा या धंद्याकडे ओढला जातो आहे हे पाहून उषाने त्याला लगेच हॉस्टेलवर ठेवले आणि पुढे परदेशी पाठवायचा विचार करत होती. धाकट्या ऋजुतावर दोघांचाही जास्तच जीव होता म्हणून तिला लांब पाठवत नव्हते. पण तिचे बदलणारे वागणे बघून पाठवावे लागेल असे उषाला वाटत होते..

या सोहम आणि ऋजुताचे काय होते पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all