वधू तू माझी होशील का? (अंतिम भाग 5)

ही कथा किमया आणि गार्थ यांच्या पुनर्विवाहावर आधारित आहे.

गार्थ मनाचा निर्धार पक्का करत घराजवळ आला. घर कसलं सर्व सुख सोयींनी युक्त असा प्रशस्त बंगला होता त्यांचा. घरात खणापिण्याची रेलचेल, दिमतीला नोकर चाकर होते.अगदी कशाचीही कमी पडणार नाही इतक्या सुसज्ज वस्तूंनी तो बंगला दिमाखात सजला होते.

गार्थ बंगल्यात शिरला.एक मोहीम फत्ते करून आला होता.पण दुसरी खूप कठीण होती.त्याच्या घरच्यांना राजी करणे अवघड होते. त्याने त्याच्या आई वडिलांना समोर बसून अगदी शांतपणे सर्वकाही सांगितले.

"अरे गार्थ तुला काही अक्कल आहे का? त्या विधवेशी लग्न करणार आहेस का तु? तुझ्या मागे मुलींची रांग लागलेली असताना अस काय पाहिलं त्या पोरीत." त्याच्या पप्पांच्या अंगाचा तिळपापड होत होता.

" तुम्ही आधी शांत व्हा पप्पा. आता खूप रागात आहात तुम्ही. मी काही जरी समजवायला गेलो तरी तुम्ही ते समजून घेणार नाहीत."

तो अगदी शांतपणे त्याच्या आई पप्पांपुढे उभा होता.

" गार्थ ऐक ना तू सांगशील त्या मुलीशी आम्ही तुझ लग्न लावून देवू पण ती मुलगी नको ना बाबा. एखादी अविवाहित मुलगी बघ. एका विधवा स्त्रीशी कसा विवाह करशील बाळा." त्याची आई अगदी प्रेमाने त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती.

" तुम्ही दोघं आधी ते विधवा म्हणणं बंद करा बर. किमया आहे तीच नाव. ती विधवा काही स्वखुशीने झालेली नाहीये. तिचा नवरा वारला त्यात तिचा काय दोष? तिला कुठे माहीत होत की तिच्या नशिबात हे अस काही लिहून ठेवलं आहे म्हणून. विधुर पुरुष दुसरं लग्न करू शकतो पण एखादी विधवा स्त्री का नाही?" गार्थ आता चढ्या आवाजात बोलला.

" हो. आता तू शिकव मला. ह्या गावचा सरपंच आहे मी. पण पोराच्या नजरेत काडीची किंमत नाही मला."

" पप्पा, आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता. मग ती समानता कुठे आहे सांगा मला. अशा घटनांमध्ये नेहमी स्त्रियांना जबाबदार का धरले जाते. समाजात नेहेमी त्यांना दुय्यम वागणूक का मिळते? ते काही नाही. मी लग्न करेल तर फक्त किमयाशी. समाज सुधारणा करायची असेल तर तिची सुरुवात मी माझ्याच पासून करतो. समाजाला एक आदर्श उदाहरण घालून देतो. पप्पा ह्यात काही तुमचं नुकसान नाहीये. उलटून गावात तुम्ही ताठ मानेने फिरू शकाल. बघा विचार करून. तुम्ही हो म्हटलात काय किंवा नाही म्हटलात काय लग्न तर मी किमयाशीच करेल. नाहीतर आजन्म अविवाहित राहील. हा माझा अंतिम निर्णय आहे." एवढे बोलून तो तावातावाने तिथून निघून गेला.

"बघा.. एका मुलिपायी तुमचे चिरंजीव आपल्या बापाशी कसे वागताय. चार मोठमोठी पुस्तके शिकून समाज सुधारणा करायला चालला आहे. अजून नीट चालायला पण नाही शिकले आणि आम्हाला समाजात कसं वावरायचं ते शिकवताय" किशोरराव संतापाने लाल झाले होते.

" हे बघा..तुम्ही थोड डोकं शांत ठेवून विचार करा. तो असाच आहे लहानपणापासून. त्याला कुणाचे दुःख बघवत नाही. सर्वांना मदत करत सुटतो. आपल्या वाट्याच पण दुसऱ्याला द्यायला मागे पुढे पाहत नाही. अतिशय मायाळू आहे हो तो. आता आहे जरा हट्टी पण त्याला माहितीये चुकीच्या गोष्टीसाठी किंवा चुकीच्या व्यक्तीसाठी तो असा हट्टाला पेटणार नाही. तुम्ही पण थोड समजून घ्या ना त्याला." राधिकाताई पण आता त्यांना मुलाची बाजू समजावत होत्या.

" म्हणजे तुला हे लग्न मान्य आहे का?" किशोरराव तिच्याकडे बघून विचारत होते.

" मी ओळखते किमयाला. तिच्या नशिबाने तिला दगा दिला. एकट्या बाईचं अस जगणं तुम्हाला नाही समजायचं. त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो. जे झाल त्यात तिला दोषी ठरवून कसे चालेल.आपण आपला मान अभिमान जरासा बाजूला ठेवून सारासार विवेकबुद्धी वापरून विचार केला तर मला तरी ह्या संबंधात काही गैर वाटत नाहीये. शिवाय गावात एक नवीन आदर्श उभा कराल ते वेगळं." राधिकाने एक बाई म्हणून दुसऱ्या बाईचा विचार केला होता.

आता किशोरराव अगदी शांत चित्ताने चौफेर बाजूने विचार करायला लागले.

दुसऱ्या दिवशी दुपारचं उन उतरल्यावर चार पाच वाजेच्या सुमारास माधवराव व नलिनीबाई ह्यांच्या दारातच चारचाकी येवून उभी राहिली.

ही तर सरपंचाची गाडी दिसतेय. एव्हढ्या मोठ्या माणसाचं आपल्या गरिबांच्या घरी काय काम. दोघंही आश्चर्य चकित होऊन दाराकडे बघतच होते की एक राजबिंडा तरुण गाडीतून खाली उतरला. त्याच्या मागोमाग किशोरराव व राधिकाबाई पण गाडीतून बाहेर आल्या.

" या या..आज आमचे भाग्य खुलले. तुम्हाला पाहून आम्हाला खूप आनंद झाला." माधवराव हात जोडून स्वागत करत म्हणाले.

" हो ना. सहपरिवार येणे केले. आम्हाला बोलावलं असतं आम्ही आलो असतो." नलिनीबाई म्हणाल्या.

नमस्कार आदान प्रदान करण्याचे सोपस्कार पार पाडत सर्व स्थानापन्न झाले. किमया सर्वांसाठी पाणी घेवून आली. तिला बघताच किशोरराव व राधिकाबाई आनंदून गेले.

"आज आम्ही तुमच्या घरी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. आम्ही तुमच्या किमयाचा हात आमच्या गार्थसाठी मागायला आलो आहोत.खर तर आम्ही तिच्या आई वडिलांकडे जायला हवे होते.पण ती तुमच्या सोबत राहते म्हणून इथे आलो." किशोररावांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.

" अहो काय बोलताय तुम्ही. एका विधवेचा पुनर्विवाह. नाही नाही हे शक्य नाही. मला मान्य नाही." नलिनीबाई एकदम आघात झाल्यासारखं म्हणाल्या.

" नलिनीताई आम्ही म्हटलं ना की आम्ही तिच्या आई वडिलांकडे जाऊ शकलो असतो आणि त्यांनी बिनविरोध ह्या लग्नाला मान्यता दिली असती. प्रत्येक आई बापाला आपल्या मुलीचं भल व्हावं असच वाटत असतं. संपूर्ण जीवन एकाकी काढण्यापेक्षा तिला जर आमच्या गार्थ सारख्या जोडीदाराची साथ लाभत असेल तर मला नाही वाटत ते नकार देतील म्हणून. तिलाही समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार आहे."

" अहो पण आमचा पण काही अधिकार आहे की नाही तिच्यावर. तुम्ही तर सरळ सरळ आम्हाला गृहीत धरल्याप्रमाणे बोलताय." नलिनीबाई आता घुश्श्यात म्हणाल्या.

" हो कारण तुमचा विरोध होणार हे आम्हाला आधीच माहीत होत. गावातल्या सरपंचाला गावातल्या सर्व खबरी असतात. किमयाला मानसिक जाच सहन करावा लागतो हे सर्व गावाला माहीत आहे.त्या विषयी आम्ही न बोललेलच बर. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या कडे ह्या उतारवयात कोण बघेल.तर तुमची जबाबदारी आम्ही घेवू.त्याविषयी तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. आमच्या मुलाला किमया पसंत आहे आणि किमयाकडून पण होकारच आहे.हवं तर विचारून बघा." सरपंच अगदी सरपंचाच्या भाषेत सर्व बोलून मोकळे झाले.

नलिनीबाईंनी तिथेच आडोश्याला उभ्या असलेल्या किमयाकडे पाहिले. किमया खाली मान घालून तशीच उभी होती.

" किमया काय आहे हे. बाहेर जाऊन हे रंग उधळत होती का? आमच्या मुलाच्या आठवणी इतक्यात पुसून टाकल्यास.लगेच दुसरा नवरा शोधून पण घेतलास." त्या डोळ्यांना पदर लावून पुसत म्हणाल्या.

" नाही आई. तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. तुम्हाला वाटत तस मी काहीच चुकीचं केलेले नाहीये. त्यांना विसरणे ह्या जन्मात शक्य नाही. तुम्ही म्हणाल तर मी ह्या लग्नाला नकार देईल. पण तुम्ही माझ्याबद्दल अशी धारणा मनात ठेवू नका." किमया काकुळतीला येवून म्हणाली.

इतका वेळ शांत बसलेले माधवराव भावनाविवश होवून बोलले.

" नाही पोरी..तुला इतकं बलिदान करायची काही गरज नाहीये. आम्ही पिकलेले पान केव्हाही गळून पडू. आमच्या नंतर तुला कोण बघेल. सरपंचाच्या घरी तू सुखाने नांदशिल.त्यांना तू आवडली म्हणून त्यांनी रीतसर घरी येवून मागणी घातली. मला खात्री आहे की तू अस काहीच केलं नसेल ज्याने आमची मान खाली जाईल."

" हे बघ किमया मला तू पसंत आहे. तुला मी पसंत आहे का ते सांग? मला तुझी नजरेची भाषा कळाली म्हणून मी ही पुढाकार घेतला. पण आता सर्वांसमोर तूझ्या मनातलं अगदी स्पष्ट सांग.तुला माझ्याशी लग्न करायच आहे का? तुझा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. तुझ्या जुन्या आठवणींना तू इतक्या लवकर विसरणे अशक्य आहे पण मी तुला वचन देतो की माझ्या सोबतच्या तूझ्या नविन आठवणी खूप सुंदर असतील.मी तुला जन्मभर सुखात ठेवेल. कसलीही कमी पडू देणार नाही." गार्थ निर्भिडपणे सर्वांसमोर तिला बोलून मोकळा झाला.

सगळ्यांचा सगळं बोलून झाल. आता निर्णय सर्वस्वी तिच्यावर अवलंबून होता. ती विचारात मग्न झाली. निर्णय घेणं फार कठीण होत. पण कुणाचं आयुष्य कुणा वाचून थांबून राहत नाही हे ही तितकंच खर होत.आताच जगणं खडतर होत.हे तिला ह्या दोन वर्षात कळून चुकले होते. गार्थच्या मागच्या भेटीनंतर तिने त्याच्या बोलण्यावर सकारात्मक नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी विचार केला होता.

तिच्या अंतिम निर्णयासाठी सर्व थांबले होते.

" मी ह्या लग्नाला तयार आहे." ती हळूच खाली मान घालून बोलली.

तिच्या उत्तराने सर्व खुश झाले.

" तुमचे हे उपकार मी कसे फेडू. सून नाही हो मुलगी आहे ती माझी. एकदाही कर्तव्य करायला चुकली नाही.तिच्याकडे बघून रोज जीव तुटत होता. आमचं काहीही होवो. पण आता माझ्या मुलीचं भविष्य अंधारात नाही राहणार. माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता कायमची मिटली.आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळा झालो." माधवरावांच्या डोळ्यात पाणी आले.

त्यांच्या ह्या बोलण्याने सर्वांच्या गलबलून आले. किशोरराव जागेवरून उठले.

" माधवराव तुमची मुलगी आजपासून आमची मुलगी झाली. शिवाय तुम्ही पण आता आमच्याच कुटुंबाचा भाग झालात. तुमचा पण विचार आम्ही आधीच करून ठेवला होता. तुमची आबाळ होऊ देणार नाही याची खात्री बाळगा."

ह्या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याला सर्वांची संमती मिळाली म्हणून आनंदाचे वातावरण पसरले होते.गार्थ व किमयाच्या कानात तर सनई चौघडे वाजायला पण लागले होते.

समाप्त.

Copyright अपर्णा परदेशी

🎭 Series Post

View all