Jan 28, 2022
प्रेम

वादळवाट 9

Read Later
वादळवाट 9

मयूर आणि मीरा दोघेही सहलीला जाण्याचे नक्की झाल्यावर जागा बुक केली. आता ते दोघेही सहलीला जाण्याची तयारी करू लागले. तिथे गेल्यावर काय काय करायचे याची स्वप्न रंगवत होते. त्या दोघांना एकांत मिळणार होता म्हणून दोघेही आनंदात होते. मित्र मैत्रिणी सोबत होतेच पण ते त्यातूनही एकत्र येणार होते.

फायनली सहलीला जाण्याचा दिवस उजाडला. सगळे जण पहाटेच काॅलेजमध्ये जमले होते. सगळे आले तरी मीरा अजून आली नव्हती. मयूरच्या मनाची हुरहुर वाढत होती. ऐनवेळी मीरा आली नाही तर, तिच्या घरचे नको म्हटले असतील तर, तिच्या सोबत कोणी नसेल तर, ती एकटी कशी येईल असा विचार तिच्या मनात चालू होता. सरांच्या सांगण्यावरून एकेक जण बसमध्ये जाऊन बसत होता पण काही केल्या मयूर बसमध्ये चढत नव्हता. त्याचे लक्ष फक्त मीराच्या वाटेकडे होते. मीरा अजून आली नव्हती. जर मीरा आली नाही तर मी सुद्धा जाणार नाही असे त्याने मनात ठाम ठरवले होते. सगळी मुले मुली बसमध्ये जाऊन बसले होते मयूर एकटाच बाहेर उभा होता. सगळे जण त्याला आत बसण्यासाठी बोलावू लागले पण तो काही केल्या आत जात नव्हता. मित्रांच्या आग्रहाखातर तो नाईलाजाने बसची पायरी चढू लागला इतक्यात गाडीच्या हाॅर्नचा आवाज ऐकू आली म्हणून त्याने वळून पाहिले तर मीरा आली होती. ती तिच्या बाबांसोबत आली होती. मीरा गाडीवरुन उतरून मयूरच्या समोरून बसमध्ये चढली. मयूर एकटक तिच्याकडे पाहत राहिला. मीरा बसमध्ये चढल्यावर तिचे बाबा लगेच निघून गेले. मयूर मात्र तसाच उभा होता.

"मयूर, आता तरी आत येतोस की नाही." असे त्याचे मित्र त्याला चिडवू लागले. एव्हाना त्याच्या मित्रांना त्या दोघांबद्दल थोडीफार कल्पना आली होती. मित्रांच्या बोलावण्यावरून मयूर भानावर आला आणि तो लगेच गाडीत जाऊन बसला. गाडीत बसल्यावर त्याचे डोळे मीराला शोधत होते. बसमध्ये गर्दी असल्याने मीरा कोठे बसली आहे हे त्याला समजले नव्हते, तो इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात गर्दीतून मीराच्या बोलण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. मयूर लगेच कावराबावरा होऊन तिच्याकडे पाहू लागला. ते पाहून मीरा थोडीशी लाजली आणि त्याच्याकडे पाहून ती गालातच हसली. मीराची ही अदा पाहून मयूर घायाळ झाला. तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला.

गणपती बाप्पा मोरया अशा गजरात बस गणपतीपुळेला जाण्यास सुरू झाली. गाडीमध्ये मुलांचा दंगा सुरू होता तसेच मुलींचा चिवचिवाट सुरू होता. गाण्याच्या भेंड्या पासून सुरूवात झाली, दोन ग्रुप करून गाणी म्हणण्यास सुरूवात झाली. एकेक करत सगळेजण गाणी गाऊ लागले. दोन्ही टीम अगदी तगडी होती. एकमेकांना साथ देत मस्त गाणी गात होते. आता बऱ्यापैकी सगळी गाणी गाऊन झाली होती. मयूरच्या टीमकडे क हे अक्षर आले होते, पण गाणं कुणालाच आठवेना. सगळे आठवण्याचा प्रयत्न करत होते, इकडे त्यांच्यावर भेंडी चढण्यास विरोधी टीम आकडे मोजत होती. सगळा नुसता राडा चालला होता. एकमेकांना गाणं आठवण्यासाठी विचारत होता. आता आपल्यावर भेंडी चढणार असे म्हणत असतानाच मयूरने राजा हिंदुस्थानी चित्रपटातील गाणं म्हणण्यास सुरूवात केली.

कितना प्यारा तुझे रबने बनाया
जी करे देखता रहूँ
हे गाणे म्हणताना मयूर फक्त मीराकडेच पाहत होता आणि मीरा खाली नजर करून लाजत होती. हे दृश्य त्या दोघांच्या मित्रांच्या नजरेतून सुटले नाही. पण मयूरचा आवाज इतका सुंदर होता की सगळेच ते गाणं ऐकण्यात बेधुंद होऊन गेले होते. त्यामुळे त्या नजरेकडे सर्वांचे आपसूकच दुर्लक्ष झाले.

दंगामस्ती करता करता मध्येच एका ठिकाणी जेवणासाठी गाडी थांबवण्यात आली. गणपतीपुळेला जाण्यासाठी अजून तास दीड तास अवधी होता पण सर्वांना खूप भूक लागल्याने मधेच शेतात मोकळी जागा पाहून गाडी थांबवण्यात आली. सगळे जण आपापले डबा घेऊन आले असल्याने प्रत्येकजण एकेक ग्रुप करून डब्यातील जेवण जेवू लागले. मयूर आणि मीरा एकाच ग्रुपमध्ये असल्याने ते सगळे गोल करून जेवण्यासाठी बसले. मीराने तिचा डबा उघडला तर त्यामध्ये वांग्याची भाजी होती अर्थातच ती मयूरच्या खूप आवडीची होती. मीरा ती भाजी मयूरला देण्यासाठी धडपडत होती पण काही केल्या ती भाजी मयूरपर्यंत पोहोचत नव्हती. मधेच त्यांचे मित्र तो डबा घेऊन त्यातील भाजी खाऊ लागले. तेव्हा मीराचा जीव वरखाली होत होता. ते मयूरला जाणवले त्याने लगेच उठून मीराचा डबा हातात घेतला आणि तो अधाशासारखा खाऊ लागला. ते पाहून त्याचे मित्र चिडवू लागले.

"अरे मया, असा बकासूरासारखा काय खातोस? थोड तिला पण ठेव." एक मित्र

"अरे, माझ्या आवडीची भाजी समोर दिसली की मी खातच सुटतो, मग तो डबा कुणाचाही असो." मयूर

"मग तुझा डबा तरी तिला दे, नाहीतर ती उपाशीच राहिल." हे ऐकून मयूरने लगेच स्वतःचा डबा मीराला दिला. मीराने मयूरचा डबा उघडून पाहिला तर त्यामध्ये सुध्दा वांग्याची भाजीच होती. ते पाहून मीरा गालातच हसली आणि मयूरच्या पुढ्यात तो डबा धरला. स्वतःच्याच डब्यात आवडीची भाजी पाहून मयूर भारावून गेला. त्याने स्वतःचा डबा मीरासोबत शेअर केला. मोकळ्या रानात गप्पा टप्पा करत सगळ्यांनी आनंदात जेवण केले. जेवण झाल्यावर गाडी आता गणपतीपुळे कडे वळली. आता फक्त दीड तास अवधी होता. गणरायाचे दर्शन तसेच समुद्र दर्शन करण्यास सगळेच आतुर होते. कधी एकदा तिथे जाऊन पोहोचतोय असे सर्वांनाच झाले होते. दोन दिवसाचीच सहल होती पण अगदी आनंदून गेले होते. मीरा मयूर घरचे सगळे विसरून त्या आनंदात सहभागी झाले होते. मयूरने बऱ्याच वर्षांनी इतका मोकळा श्वास घेतला होता. घरच्या जबाबदारीतून दोन दिवसांसाठी का होईना तो मुक्त झाला होता. दोन दिवस फक्त तो स्वतःसाठी जगत होता शिवाय तो खूप आनंदात होता. ना कशाचे भान, ना कुठले टेन्शन, ना कुठले काम फक्त मजा मस्ती आणि दंगा हा एकच त्यांचा फंडा.

मयूरची परिस्थिती कशीही असली तरी तो नेहमीच आनंदात राहत होता तसेच आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवायचा. मयूरचा स्वभाव विनोदी असल्यामुळे त्याच्या आजूबाजूचा परिसर अगदी आनंदून जात होता. मग सहलीत मजा येणार नाही असे कसे बरे होईल?

फायनली त्यांची बस गणपतीपुळेला पोहोचली. गणरायाच्या गजरात मुलामुलींनी एकच जल्लोष सुरु केला. सगळे जण आपापले सामान घेऊन गाडीतून उतरू लागले. तेथील परिसर पाहून सर्वजण सुखावून गेले. सगळे गाडीतून उतरल्यावर ज्या ठिकाणी राहण्याची सोय होती तिथे सगळे गेले. गणपतीपुळेला वस्ती करून दुसऱ्या दिवशी चिपळून मार्गे परत साताऱ्याला जाणार होते. म्हणून त्यांनी तिथेच राहण्याची व्यवस्था केली होती. सगळे जण आपापले सामान घेऊन रूममध्ये गेले. फ्रेश होऊन गणरायाच्या दर्शनासाठी सगळे येणार होते.

समुद्र किनारा आणि देवदर्शन हे सगळे छान होईल की आणखी काही घडेल? मयूर आणि मीराचे प्रेम या वातावरणात बहरेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..