Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 8

Read Later
वादळवाट 8

गणपतीपुळेला ट्रीप जाणार आहे अशी नोटीस आल्यापासून सगळ्यांचा एकच जल्लोष सुरु होता. सगळे नाव नोंदणी करण्यासाठी धडपडत होते. सहलीच्या तयारीची चर्चा छान रंगली होती. गप्पा गोष्टींना जणू उधाण आले होते. अशा वेळी मीराचे शांत बसणे मयूरला काही रूजले नाही. तो लगेच मीराशी बोलण्यासाठी मीराजवळ गेला.

"हॅलो मॅडम, काय झालं? तू अशी शांत का बसली आहेस?" मयूर

"काही नाही रे, सहजच." मीरा

"मग सगळे सहलीची इतकी चर्चा करत आहेत आणि तू इतकी शांत का बसली आहेस?" मयूर

"काही नाही. ज्या रस्त्याने जायचं नाही तिथे बघायचे तरी का?" मीरा सहज बोलून गेली.

"म्हणजे?" मयूर

"काही नाही. जाऊ दे सोड ना!" मीरा

"मला तू सहलीला यायला हवी आहेस. हे मी तुला हक्काने सांगतोय." मयूर

"अरे पण बाबा तयार होणार नाहीत. मी आजपर्यंत कधीच एकटी कुठे गेले नाही. यावेळेस कशी येऊ? तुम्ही जा, मला नाही येता येणार." मीराच्या अशा बोलण्याने मयूर नाराज झाला.

"बरं, मग मी पण जात नाही, राहू दे." मयूर थोडासा नाराज होऊन म्हणाला.

"अरे, तू जा ना. तू का थांबतोस? मी नाही आले तरी बाकीचे मित्र आहेतच ना! मग तू नक्की जा, माझ्यासाठी थांबण्याची काहीच गरज नाही." मीराचे हे बोलणे ऐकून मयूरला खूप राग आला. माझी काही किंमतच नाही का? मी इतकं सांगतोय तर ही ऐकतच नाही. काय करावे? म्हणजे ही तयार होईल, असा विचार मयूरच्या मनात चालू होता. त्या विचारातच तो उठून त्याच्या जागेवर जाऊन बसला. मयूर गेल्यावर मीराला खूप वाईट वाटले. पण ती काय करणार? घरचे परवानगी दिल्याशिवाय ती जाऊ शकत नव्हती आणि आश्वासनही देऊ शकत नव्हती. अशा व्दिधा मनःस्थितीत असतानाच ती मयूरच्या जवळ जाऊन बसली.

"काय झालं? चिडलास काय?" मीराने हळूच विचारले.

"मी तुझ्यावर चिडणारा कोण? तुझा माझा संबंध काय?" मयूर थोडासा चिडक्या सुरात म्हणाला.

"अरे, साॅरी ना! मला थोडं समजून घे ना!" मीरा

"मी का समजून घेऊ? तू घेतेस का मला समजून?" मयूर आणखीनच चिडून बोलला. मयूरचे हे बोलणे ऐकून मीराला वाईट वाटले. ती शांतच बसली. ते पाहून मयूर पुन्हा तिच्याकडे बोलण्यासाठी गेला.

"साॅरी, मी थोडं जास्तच बोललो. पण तू येणार नाहीस म्हटल्यावर माझा पाराच चढला." मयूर

"पण का?" मीरा

"का म्हणजे? तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस." मयूर

"मग वर्गातील इतर मुलेही जे तुझे खूप चांगले मित्र आहेत ते सुध्दा सहलीला जाणार आहेत. फक्त मी नाही जाणार म्हणून तू जात नाहीस, याचे कारण काय?" मीरा

"मला तू सुद्धा यायला हवी आहेस." मयूर

"पण का?" मीरा

"कारण.. तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस." हे मयूरचे बोलणे ऐकून मीरा गालातच हसली.

"बरं, मी घरी विचारून सांगते. तू तुझे नाव नोंदव. घरचे हो म्हणाले तर मी उद्या नोंदवते." मीरा

"आणि जर नाही म्हणाले तर.." मयूर

"तर मी येत नाही." मीरा

"तसे काही करू नकोस. तू त्यांना पाठवण्यासाठी तयार कर की मी येऊ त्यांना समजवायला." मयूरच्या या बोलण्याने मीरा एकदम ओरडली.
"अजिबात नको. तू घरी यायचं नाही. जे काही सांगायचं ते मी सांगेन आणि त्यांची परवानगी मिळवेन, पण तू येऊ नकोस."

"ठिक आहे, मी येत नाही. पण तू त्यांचा होकार घेऊनच यायचं. नाहीतर मी घरी येईन." मयूर

"बरं बाबा, मी परवानगी घेऊनच येईन." मीराच्या या बोलण्याने मयूरला खूप आनंद झाला. मात्र मीराला थोडेसे दडपण आले.

"बाबा तयार झाले नाहीत तर, आई रागावली तर, त्यांना काही वाटले तर, बापरे! मी काय करू आता." अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या मनात थैमान माजले होते.

काॅलेज सुटल्यावर पुन्हा एकदा मयूरने मीराला घरी सांगण्याबद्दल आठवण करून दिली. मीराने त्याला हो असे म्हटले खरे, पण तिच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. ती टेन्शनमध्ये घरी गेली. नेहमीप्रमाणे तिने हातपाय धुऊन चहा बनवला. आईबाबांसोबत ती चहा पिण्यासाठी बसली पण तिचे लक्षच लागेना. बाबा ओरडले तर, त्यांनी ट्रिपला पाठवले नाही तर मयूर रागावेल. दोन्हीकडून मीच अडचणीत आले. अशा विचारात तिची चुळबूळ सुरु होती.

मीराची चाललेली चुळबूळ पाहून तिच्या बाबांनी विचारले, "मीरा, काही अडचण आहे का? की कसलं टेन्शन आहे?"

"काही नाही बाबा." मीरा दचकतच म्हणाली.

"मग तू इतकी अस्वस्थ का दिसत आहेस? काहीतरी नक्कीच झालंय." मीराचे बाबा

"बाबा, तुमची परवानगी हवी होती." मीरा थोडी घाबरतच म्हणाली.

"परवानगी! कशासाठी?" मीराचे बाबा

"बाबा ते.. बाबा ते.." मीराला कसे सांगावे तेच समजेना.

"जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल. अशी अडखळत बोलू नकोस." बाबा थोडासा आवाज वाढवून बोलले.

"बाबा, आमच्या काॅलेजची सहल गणपतीपुळेला जाणार आहे, माझ्या सगळ्या मैत्रीणी सहलीला जाणार आहेत. मी पण जाऊ का? म्हणजे तुम्ही हो म्हणालात तरच." मीरा एकाच दमात बोलून रिकामी झाली.

"अच्छा, एवढंच होय. जा की मग. किती फी आहे सांग? मी देतो." बाबांच्या या बोलण्याने मीराला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात ती खूप काही बोलू लागली.

"बास बास.. जा आता तयारीला लाग." हे बाबांचे बोलणे ऐकून तिला खूपच आश्चर्य वाटले. ती उठून आत गेली.

"आज बाबांना झालंय तरी काय? त्यांनी चक्क मला सहलीला जाण्यास परवानगी दिली! पण हे कसं शक्य आहे? मला तर खूप आनंद झालाय. आता ही बातमी मयूरला द्यायला हवी." असे म्हणून मीराने लगेच मयूरला फोन लावला. तिला सहलीला येण्यासाठी परवानगी मिळाली हे ऐकून मयूरलाही खूप आनंद झाला. तो मनाने तिथे जाऊनही आला. ते दोघेही तिथे काय काय करायचे याचे स्वप्न रंगवत होते. त्या बोलण्यात रात्र कशी निघून गेली हे समजलेच नाही.

दोघांचेही सहलीला जाण्याचे नक्की झाले. आता बॅग भरून जायचे तितकेच बाकी होते. सहलीला जाण्याचे स्वप्न तर प्रत्येकजण पाहतच होता. पण हे दोघे जणू वेगळ्याच जगात होते.

दोघे नक्की सहलीला जातील का? की काही अडचणी येतील. तिथे काही घडेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..