Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 7

Read Later
वादळवाट 7

मयूर मीराला सोडून घरी गेला. घरी गेल्यावर त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. तो एकटक पाहत त्याच्याच विश्वात रमून गेला होता. त्याचा तो दिवस खूप सुंदर गेला होता. खूप दिवसांनी त्याच्या मनासारखे काही झाले होते. त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते की आजचा दिवस त्याच्या आयुष्यात येईल. त्याचे जेवणाकडेही लक्ष नव्हते. तो त्याचाच तंद्रीत होता.

मीरा मात्र घाबरत घाबरतच घरात गेली. तिने आत पाहिले तर आईबाबा आले होते. आई स्वयंपाक करण्यात गुंतली होती तर बाबा काही कामात व्यस्त होते. ही संधी साधून मीरा दबक्या पावलांनी आत गेली. कोणताही आवाज न करता ती फ्रेश होऊन स्वयंपाक घरात गेली. तिथे ती आईजवळ जाऊन बसली.

"हे काय मीरा तू कोठे गेली होतीस? आम्ही आलो तेव्हा तू घरात नव्हतीस. तरी बरं दुसरी किल्ली आमच्याकडे होती नाहीतर आम्हाला बाहेरच बसावे लागले असते." मीराची आई

"अगं आई, ते मी, ते मी." मीराला काय उत्तर द्यावे तेच समजेना. ती गोंधळून गेली होती.

"ते ते काय? मैत्रीणीकडे गेली होतीस का?" आईने विचारले.

"हो हो, मी मैत्रीणीकडेच गेले होते. थोडं काम होतं ना! बोलता बोलता वेळ कसा निघून गेला हे समजलेच नाही ग, म्हणून उशीर झाला." आता मीरा बोलू लागली. तिला थोडे रिलॅक्स वाटले.

"अगं पण घरात कुणीच नाही. तुझी वहिनी आणि दादा उद्या येणार आहेत. मावशीने तुझ्या ताईसाठी एक स्थळ आणलं आहे. ताईचं लग्न झालं की तुझं पण चालू करायचं आहे. तुमच्या दोघींची लग्न झाली की आम्ही मोकळे होऊ. उद्या लग्न झाल्यावर अशी बेजबाबदार वागायला लागलीस तर कसे होणार?" मीराच्या आईची बडबड सुरू होते.

"आई, मी काही आत्ताच लग्न करणार नाही. अगं अजून मला अठरा वर्ष पूर्ण झाले नाहीत. तुला कायदा माहित आहे ना! अगं मला शिकायचं आहे. मी काही आत्ताच लग्न बिग्न करणार नाही हं, सांगून ठेवते." मीरा तिचा निर्णय स्पष्टपणे सांगून मोकळी झाली.

"ताईचे लग्न होईपर्यंत तुला अठरा वर्ष पूर्ण होतील, तू त्याची चिंता करू नकोस. आम्हाला तुझी काळजी आहे." आई

"म्हणजे तुम्हाला मी जड झाली आहे का? माझ्या मनाप्रमाणे काहीच होणार नाही का?" मीरा हळवी होऊन म्हणाली.

"तुझ्या बाबांपुढे कोणाचे चालते का? पण तू काळजी करू नकोस. अजून तुझ्या ताईचे लग्न होणार आहे आणि स्थळ बघायला सुरुवात केली म्हणजे लगेच लग्न ठरले असे थोडीच होते. त्याला बराच वेळ आहे, तू सध्या फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. मग पुढचे पुढे पाहू." हे आईचे बोलणे ऐकून तिला थोडा धीर आला. ती तशीच बसून राहिली. थोड्या वेळाने मीराचे बाबा आले. तिघांनी एकत्र बसून जेवण केले. बाबांनी काहीच विचारले नाही म्हणून मीराला थोडेसे बरे वाटले. ती निश्चिंत होऊन राहिली.

मीराला त्या रात्री काही केल्या झोप लागेना, तिच्या मनामध्ये मयूरचा विचार घोळत होता, मयूरच्या घरी घालवलेला वेळ, शिवाय महाबळेश्वरला न जाता नदी किनाऱ्यावर घालवलेला तो एकांत, हे काही केल्या तिच्या नजरेसमोरून जातच नव्हते. मयूरच्या आई किती प्रेमळ आहेत ना! तिची बहीण तर अगदी चुलबुली गोड आहे, सगळं किती छान आहे, अगदी स्वप्नवत!

'पण मला हे काय होत आहे? मी सारखा सारखा मयूरचा विचार का करत आहे? प्रत्येक क्षणी माझ्या मनात फक्त त्याचाच विचार येत आहे, हे असे याआधी कधी झाले नाही. कदाचित आज संपूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवला आहे म्हणून त्याची आठवण येत असेल. जाऊ दे. आता त्याचा विचार न केलेलाच बरा, नाही तर चुकून त्याच्या प्रेमात पडेन. असा विचार मीराच्या मनात येऊन गेला. ती स्वस्थ पडून राहिली, छताकडे पाहत तिच्या मनामध्ये दिवसभरातील एक एक क्षण असे चित्रपटाप्रमाणे सरकत होते. नदीकाठच्या त्या एकांतात आपण पण किती मोहरून गेलो होतो, मयूरच्या गाडीवर बसल्यावर झालेला तो नकळत स्पर्श किती अल्हाददायक वाटला होता! आपल्या डब्यातील बनवलेले पदार्थ आवडीने खाणारा तो मयूर आणि त्याचे ते बोलणे फक्त ऐकतच बसावेसे वाटते, त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. मीराला समजेना आता काय करावे? त्याला मेसेज करून त्याच्याशी बोलावे का? असा विचारही तिच्या मनात येऊन गेला आणि तिने नेट चालू केला. तेव्हा तिला दिसले की मयूरचे दोन-तीन मेसेज येऊन गेले होते, तिने लगेच त्या मेसेजला रिप्लाय दिला. दोघेही बराच वेळ चॅटींग करत बसले होते. रात्री उशिरा ते झोपले.

दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे काॅलेजला गेले. काॅलेजमध्ये मयूर त्याच्या जागेवर गप्प बसला होता. वर्गात आता थोड्या मुलांशी त्याची ओळख झाली होती. तो त्या मुलांशी छान बोलायचा. पण आज तो शांतच बसला होता. कोणाशीही बोलायचा त्याचा मूड नव्हता, म्हणून तो पुस्तक समोर धरून तसाच बसून राहिला. मीराने एक क्षण त्याच्याकडे पाहिले. तिला मयूरचा मूड खराब दिसला. तिने त्याच्याकडे पाहून खुनेनेच काय झाले? म्हणून विचारले. तेव्हा त्याने मानेनेच काही नाही असे सांगितले.

इतक्यात वर्गात मराठी विषयाचे प्राध्यापक आले. त्यांनी येऊन लगेच शिकवण्यास सुरूवात केले. आज ते कविता शिकवत होते. ती कविता वाचून मयूरला मीराची कविता आठवली. त्याने लगेच मीराकडे पाहिले. मीरा सुध्दा त्याच्याकडेच पाहत होती. मीराने लगेच सरांकडे मान फिरवली आणि पुस्तकात तोंड घालून ती बसली. ते पाहून मयूर गालातच हसला.

थोड्या वेळाने एक नोटीस आली. ती ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होऊन पाहू लागले. सरांनी ती नोटीस हातात घेतली व मनात ती पूर्ण वाचली. नंतर त्यांनी वर्गात नोटीस वाचून दाखवण्यास सुरूवात केली.

या वर्षी आपल्या काॅलेजची सहल गणपतीपुळे येथे दोन दिवसासाठी जाणार आहे. तरी सहलीची फी दोन दिवसात जमा करून बुक करुन घ्यावे. जागा बुक झाल्यानंतर जे कोणी येतील त्यांना घेऊन जाता येणार नाही. थोडेच सीटस् असल्याने लवकर बुक करा. ही नोटीस ऐकताच वर्गात एकच जल्लोष सुरु झाला. सगळ्या वर्गाला चर्चेचे जणू उधाण आले होते. सगळे आपापसात बोलू लागले. आता ट्रीप म्हटल्यावर एन्जाॅयमेंट आलीच. मयूर सुध्दा त्या चर्चेत सहभागी झाला. काही क्षण आनंदात जातील शिवाय मीरासोबत राहता येईल या उद्देशाने तो आनंदीत झाला आणि सहलीला जायला तयार झाला. आत्ताच जाऊन पहिला बुक करून यावे असे त्याच्या मनात येत होते, पण लेक्चर संपल्याशिवाय बाहेर जाता येणार नाही म्हणून तो शांत बसला. त्याने एक कटाक्ष मीराकडे टाकला तर मीरा शांत बसली होती. सगळा वर्ग दंगा मस्ती करण्यात गुंतला असताना मीरा एकटीच शांत बसली होती. ती आनंदीत नव्हती. पण का? मयूरच्या मनात विचारचक्र चालू असतात.

सरांचा आवाज आल्यावर तो भानावर आला. त्याने पाहिले तर सगळा वर्ग शांत बसला होता आणि सर शिकवत होते. मयूर सुध्दा पुस्तकात तोंड घालून बसला. लेक्चर संपल्यानंतर सर वर्गातून बाहेर गेल्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली. मयूर लगेच मीराजवळ गेला आणि तिला म्हणाला, "तुला आनंद झाला नाही का?"

"कशाबद्दल?" मीरा

"गणपतीपुळेला ट्रीप जाणार आहे म्हणून." मयूर

"हो, झाला ना!" मीरा

"मग तो आनंद चेहऱ्यावर दिसत नाही." मयूर

"तसे काही नाही रे." मीरा

"मग आजच आपले नाव बुक करूया चल." मयूर

"तू जा, मी नंतर बघेन." मीरा

"बघेन म्हणजे? तू नक्की येणार आहेस ना!" मयूर

"नक्की असे सांगता येणार नाही. बघू." मीराच्या अशा उत्तराने मयूर गोंधळून गेला.

मीरा नक्की ट्रीपला जाईल का? ती का नाही म्हणत होती? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..