Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 6

Read Later
वादळवाट 6

"काय? तुझ्या घरी! नको नको, तुझ्या घरचे काहीतरी म्हणतील." मीरा

"कोणी काहीही म्हणणार नाही. उलट सर्वांना आनंदच होईल. तू चल तर आधी." मयूर मीराला खूपच रिक्वेस्ट करत होता.

"अरे पण अशी कशी येऊ? मला तर भीती वाटत आहे." मीरा

"अगं, त्यात काय घाबरायचं आहे? तुझ्याबद्दल मी आधीच माझ्या आईला बहिणीला सांगून ठेवले आहे, त्यामुळे तुला बघता क्षणीच ते ओळखतील, तू काही टेन्शन घेऊ नकोस, बिनधास्त चल, तुला कोणीच काहीच बोलणार नाही." मयूर तिची समजूत घालत होता.

"पण मी अशी या आधी कोणाच्या घरी गेले नाही. आता तुझ्या घरी यायचं म्हणजे थोडंसं अवघडल्यासारखं वाटत आहे." मीरा

"काही टेन्शन घेऊ नकोस. बिनधास्त चल. तुला कोणी काही बोलले तर मी आहे. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना!" असे मयूर जबरदस्ती करताना मीरा त्याच्या घरी जायला तयार झाली. मीरा मयूरच्या गाडीवर बसली. गाडी थेट मयूरच्या गावाकडे जाऊ लागली. गाडी जसजशी पुढे जाईल तसतसे मीराच्या पोटात गोळा येऊ लागला. जे होईल ते होईल असे ती स्वतःच्या मनाला समजावत होती.

गाडी आडवळाने घेऊन तो थोड्या वेळातच गावात पोहोचला. ते दोघे घराजवळ आले. मीरा गाडीवरुन खाली उतरली. ती उतरून आत जात होती तर तिच्या छातीत धडधडू लागले होते. तिला एक अनामिक भीती वाटत होती. कशाची भीती? हे तिचे तिलाही समजत नव्हते. मीरा मयूरच्या पाठीमागून आत गेली. आत गेल्यावर तिने पाहिले की त्याची आई धान्य निवडत बसली होती. ती मीराला पाहून लगेच उठली आणि

"ये ना बाळ." असे सौम्य शब्दात तिला आत बोलावले. तिचे ते बोलावणे पाहून मीरा भारावून गेली. तिला थोडे रिलॅक्स वाटले. ती आत गेली. आत गेल्यावर तिला बसायला सांगितले आणि त्याची आई लगेच पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाणी पिऊन थोडा वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या. मीराला मयूरच्या आईचा स्वभाव खूप आवडला. ती तिथे लगेच रमली. मयूरची आई नाश्ता बनवण्यासाठी आत गेली तेव्हा मयूर आणि मीरा बोलत बसले. मयूर तेव्हा खूप आनंदात होता. वसंत ॠतुमध्ये आंब्याला मोहोर आल्याप्रमाणे त्याचा चेहरा मोहरून गेला होता. त्याच्या मनातील भाव चेहऱ्यावर दिसत होते.

मीरा लगेच उठून स्वयंपाक घरात गेली. तिथे मयूरची आई काहीतरी बनवत होती, ते पाहून मीरा लगेच मदतीसाठी पुढे सरसावली. ती मयूरच्या आईला मदत करू लागली. ते पाहून मयूर सुखावला. दोघींना एकत्र पाहून त्याला खूप बरे वाटले. तो तसाच त्यांच्याकडे पाहत उभा राहिला. त्याचे भान हरपले. मयूरची आई नाश्ता घेऊन टेबलावर ठेवण्यासाठी आली तेव्हा तिने मयूरला त्या अवस्थेत पाहिले आणि तिला जे समजायचे ते समजून गेले. ती गालातच हसली आणि मयूरजवळ येऊन हळूच म्हणाली,
"छान दिसतेय ना!"

"हो ना." मयूर त्याच्याही नकळत बोलून गेला. तेव्हा त्याच्या आईला खूप आनंद झाला. परमेश्वराच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊ दे असे ती मनातच म्हणाली.

मीरा मयूरच्या घरात रमून गेली होती. मयूर, मीरा आणि मयूरची आई असे तिघांनी बसून नाष्टा केला. मयूरच्या आईने चहा गेला आणि चहा पिऊन मीरा थोडा वेळ गप्पा मारत बसली. आता मीरा घरी जायला निघणार इतक्यात मयूरची बहिण मनीषा आली. तिला दारातच पाहून मीरा तिथेच थबकली.

"हे काय? तू लगेच चाललीस, आत्ता तर मी आले आहे, थांब ना थोडा वेळ, माझ्याशी गप्पा मार, लगेच जाऊ नकोस ना! प्लीज प्लीज." मनीषाचे हे बोलणे ऐकून मीराला खूपच आश्चर्य वाटले. ती आश्चर्याने एकटक तिच्याकडेच पाहत राहिली. 'मी तर या मुलीला आत्ताच बघत आहे आणि ही तर अगदी बालमैत्रीण असल्यासारखी बोलत आहे. असे कसे?' मीरा मनातच म्हणाली.

"अगं, कसला विचार करत आहेस? दादाकडून मी तुझ्याबद्दल खूप ऐकलंय आणि तुझा फोटो सुध्दा पाहिला आहे, म्हणून तुला बरोबर ओळखले." असे म्हणून मनीषा हसू लागली. ते पाहून मीराला हायसं वाटले. ती सुध्दा गालातच हसली.

"चल ना आत, गप्पा मारू. तुझ्याशी खूप बोलायचं आहे." मनीषाचे हे वाक्य ऐकून मीराला काय करावे? ते सुचेना.

ती म्हणाली, "मला घरी जायला उशीर होईल ग, आई-बाबा गावाहून येणार आहेत, ते येण्याआधी मला घरी जावं लागेल, नाहीतर ते खूप ओरडतील. मी पुन्हा नक्की येईन, तेव्हा तुझ्याशी खूप खूप गप्पा मारेन. ओके." मीरा मनीषाला समजावून सांगत होती.

"पुन्हा नको ना! तू येणार आहेस त्या वेळेस परत नवीन गप्पा चालू होतील. पण प्लीज आता थांब ना! माझ्या दादूने तुझ्याबद्दल खूप काही सांगितले आहे, तू तशीच आहेस का? हे मला पाहायचे आहे. फक्त थोडाच वेळ, मी तुला जास्त वेळ थांबून घेणार नाही. प्लीज." मनीषाच्या या हट्टापुढे मीराचे काहीच चालले नाही. शेवटी ती थांबायला तयार झाली.

"पण थोडाच वेळ हं, मी काही जास्त वेळ थांबणार नाही." मीरा

"हो हो, थोडा वेळच, तुला जास्त वेळ थांबून घेत नाही." असे मनीषा म्हणून ती फ्रेश होण्यासाठी गेली. मनीषाने मीराला थांबवून घेतल्यावर मयूरला खूप बरे वाटले. तो मनातून खूप आनंदित झाला.

"मनीषा फ्रेश होऊन येईपर्यंत थोडा वेळ बस." असे मयूर मीराला म्हणत होता तेव्हा त्याचा चेहरा अगदी उजळून निघाला होता तो मीराच्या नजरेतून सुटला नाही. ती गालातच हसली. मनीषा फ्रेश होऊन आल्यावर दोघीही गप्पा मारत बसल्या. त्या बोलताना जणू जुन्या सख्याच आहेत की काय? असे भासत होते. मयूर मात्र त्या दोघींकडे एकटक पाहत बसला होता.

त्या दोघींना बोलता बोलता वेळ कसा निघून गेला हे समजलेच नाही. संध्याकाळ होऊन गेली आता बाहेर अंधार पडत होता. ते पाहून मीराने घड्याळाकडे पाहिले तर सात वाजले होते. ते पाहून मीराला धडकीच भरली. इतका वेळ आपण बोलत बसलोय, आता खूप उशीर होईल. लगेच निघायला हवं, असा विचार मीरा करत होती.

"चल, मी निघते आता. खूपच उशीर झालाय. घरी आईबाबा आले असतील." असे म्हणत मीरा उठून उभा राहिली.

"अगं, पण थोडा वेळ थांबली असतीस ना!" मनीषा

"नको ग, परत बोलू निवांत. मी नक्की येईन." असे म्हणून मीरा जाऊ लागली.

"थांब. मी येतो तुला सोडायला." असे म्हणून मयूर जाऊ लागला.

"नको नको. मी बसने जाईन." म्हणून मीरा जाऊ लागली.

"अगं मीरा, मयूर सोडायला येऊ दे. अंधार पडत आहे तेव्हा एकटी कुठे जातेस? तुला सोबत होईल, त्याला घेऊन जा." मयूरच्या आईचे हे बोलणे ऐकून मीरा त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

मयूर मीराला सोडायला तिच्या घरी गेला. तिला घराजवळ सोडणार होता पण मीराच्या सांगण्यावरून त्याने तिला गावाबाहेर सोडले. मीरा भराभर पावले टाकत घरी चालली. मयूरने घराजवळ सोडले असते तर गावात उगाचच चर्चेला उधाण येईल म्हणून तिने मयूरला गावाबाहेर सोडण्यास सांगितले.

मीरा घराजवळ गेली तर पाहते काय? आईबाबा घरी आले होते. आता ओरडा खायला लागणार म्हणून मीरा खूप घाबरली होती. आईबाबा काही म्हणतील का? कुठे गेली होतीस म्हणून विचारले तर काय सांगू? असे एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या मनात थैमान घातले होते. ती घाबरतच आत गेली.

काय होईल? मीरा कुठे गेले होते म्हणून सांगेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..