Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 5

Read Later
वादळवाट 5

मीरा नेहमीप्रमाणे काॅलेजला गेली. ती आज लवकरच गेली होती. घरी कुणीच नसल्याने तिला करमत नव्हते तसेच मयूरला कधी एकदा भेटतोय असे झाले होते. तिने घरातून निघताना मयूरला मेसेज केला होता. मीरा काॅलेजच्या ग्राउण्डवर आली आणि पाहतेय तर काय? समोर मयूर गाॅगल घालून गाडीवर बसला होता. तो आज टी शर्ट घालून आला होता. या वेगळ्या लूकमध्ये तो खूपच हॅण्डसम दिसत होता. मीरा काही क्षण त्याच्याकडे पाहत होती. त्याचा तो लूक पाहून तिचे भान हरपले होते. या क्षणी काय करावे? तिला समजलेना. ती देहभान हरपून त्याच्याकडे पाहत होती. त्या ग्राउण्डवर तिला त्याच्याशिवाय कोणी दिसलेच नाही. मीराची ही अवस्था पाहून मयूरला हसू आले. तो हलकीसी स्माईल देत तिच्याकडे पाहत होता.

"अरे, काय हे? इतका बदल कसा झाला? किती हॅण्डसम दिसतोयस माहित आहे का?" मीरा बोलण्याच्या ओघात बोलून गेली.

"मला कसे माहित असणार? पण तुला आवडला ना!" असे मयूरने विचारल्यावर ती गालातच हसली

"चल, बस गाडीवर." मयूर

"अरे, पण आत्ताच काॅलेजमध्ये आले ना! आत्ता कुठे घेऊन चाललास?" मीरा

"बस तर. तुला तिथे गेल्यावर कळेलच." मयूर

"नाही हं. मला आधीच सांग, आपण कुठे जाणार आहोत?" मीरा

"महाबळेश्वरला जायची माझी खूप इच्छा आहे आणि सोबत तू हवी आहेस. येशील ना माझ्यासोबत महाबळेश्वरला." मयूर

"अरे, पण आत्ता जाणार कधी आणि येणार कधी? काॅलेज सुटायच्या आत यायला हवं. माझ्या घरी कुणीच नाही. ते यायच्या आधी मला घरी जायला हवं." मीरा

"अगं हो, आपण वेळेत येऊ. हे बघ आता साडेदहा वाजलेत म्हणजे दीड तासात बारा पर्यंत आपण पोहोचतो. तिथून तीन वाजता निघालो की पाच पर्यंत येऊ. दोन तीन तास फिरून येऊ. परत निवांत गेलो की जास्त वेळ फिरूया. खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती. आता तुझ्या सोबतीने ती पूर्ण होईल." मयूर

मयूरच्या आग्रहाखातर मीरा जायला तयार झाली. ती लगेच त्याच्या गाडीवर पाठीमागे बसली. मीरा पाठीमागे बसल्यावर मयूरने गाडी सुरू केली. गाडी सुरू होताच मीराचा हात तिच्याही नकळत मयूरच्या खांद्यावर गेला. मीराचा हात खांद्यावर येताच मयूर मात्र शहारून गेला. पहिल्यांदाच एक मुलगी त्याच्या पाठीमागे बसली होती. त्यामुळे तो गाडी चालवताना थोडासा गोंधळत होता. बराच वेळ त्याला गाडी चालवताना त्रास होत होता. थोड्या वेळाने तो व्यवस्थित गाडी चालवू लागला. त्याची ती अवस्था मीराला समजत होती म्हणून ती थोडीशी मागे सरकून बसली. रस्ता थोडा कच्चा थोडा पक्का असल्यामुळे त्यांना थोडे जपूनच जावे लागले. थोड्या वेळाने मयूनेच बोलायला सुरुवात केली.

"एक सांगू." मयूर

"सांग ना!" मीरा

"आज पहिल्यांदा माझ्या गाडीवर एक मुलगी बसली आहे. आई आणि बहिण यांच्या व्यतिरिक्त तिसरं कुणीच गाडीवर बसले नाही. तूच पहिली आहेस जी माझ्यासोबत आज फिरायला येत आहेस." मयूरचे हे बोलणे ऐकून मीरा फक्त हमम म्हणाली. ती पुढे काहीच बोलली नाही. तिला फक्त एकच चिंता होती, जे आपण करतोय ते योग्य की अयोग्य? एका मुलासोबत इतक्या रोमँटीक ठिकाणी जात आहोत ते सुध्दा आईबाबांना काहीच कल्पना न देता जात आहोत हे खरंतर चुकीचे आहे. आमची आत्ताची ओळख. अजून अठरा वर्ष पूर्ण झाले नाही. मयूरचे लायसन्स देखील नसेल. याचा अर्थ आपण जे करतोय ते अयोग्यच आहे. मयूरला थाबवू का? असा विचार तिच्या मनात चालू होता.

"थांब थांब." असे म्हणून तिने अखेर मयूरला थांबवले. तेव्हा ते दोघे एका धरणापाशी गेले होते. तेथूनच पुढे महाबळेश्वरला जायचा रस्ता होता. मीराच्या सांगण्यावरून मयूरने गाडी थांबवली.

"काय झालं? काही अडचण आहे का?" मयूर

"अरे, आपण जायला नको. इतक्या लांब आईबाबांना न सांगता जायचं म्हणजे मला खूप भीती वाटत आहे. चल परत जाऊया." मीरा

"अगं थांब ना! असे काय करतेस? थोड्या वेळाने महाबळेश्वर येईलच. अजून एकच तास लागेल. चल ना मस्त फिरून येऊ." मयूर कळवळून बोलत होता.

"नको रे, परत कधीतरी जाऊ, आज मला खूप भीती वाटत आहे. चल परत जाऊ." मीराचे हे बोलणे ऐकून मयूरचा चेहरा कोमेजला. आपण काय ठरवले त्याप्रमाणे होतच नाही असे त्याला वाटत होते. तो थोडा वेळ शांतच बसला. मग विचार करून तिला म्हणाला,
"मग इथेच नदी किनारी थोडा वेळ शांत बसून मग जाऊया. सध्या मला गाडी चालवून कंटाळा आला आहे. थोडी विश्रांती घेऊन मग परत जाऊ. हे तरी तुला मान्य आहे का?" मयूरचे हे बोलणे ऐकून मीराने शरमेने होकरार्थी मान हलवली.

दोघेही नदी किनारी शांत बसून राहिले. आजूबाजूला निरव शांतता होती. तिथे फक्त ते दोघेच होते. बराच वेळ शांत बसल्यावर मयूर हसत म्हणाला, "शांत बसून काय पोट भरणार आहे? डबा काढ लवकर मला खूप भूक लागली आहे." हे ऐकून मीराला हसू आले. तिने लगेच डबा काढला आणि मयूरच्या हातात दिला.

"माझा डबा आहे. तरीही तुझा उघडून पाहतो थांब." असे म्हणून त्याने मीराचा डबा उघडला तर त्यात वांगीची भाजी अर्थातच भरली वांगी, मिरचीचा ठेचा आणि चपाती होती.

"अहाहा! माझ्या आवडीचे जेवण." असे म्हणत तो जेवणावर ताव मारू लागला. जेवता जेवता त्याला जाणवले की, आपण एकटेच खात आहोत, मीरा मात्र तशीच बसून होती. त्याने डबा पुढे केला आणि "तू पण जेव ना!" असे म्हणाला.

मीरा फक्त त्याच्याकडे पाहून हसली. तेव्हा मयूरने स्वतःचा डबा तिला दिला. मीराने त्याचा डबा उघडून पाहिला तर त्यामध्ये सुद्धा भरली वांगीच होती. ते पाहून ती गालातच हसली आणि तिने तो डबा मयूरच्या पुढे केला.

" अरे वा! आईने सुद्धा वांगीच केली आहे." असे म्हणून तो परत जेवू लागला पण मीरा मात्र तशीच बसून राहिली. ते पाहून मयूरने त्याच्या डब्यातील एक घास घेऊन तिच्या तोंडासमोर धरला. मीराने देखील आनंदाने तो घास खाल्ला. मग दोघेही जेवण करू लागले.

"आज भाजी तू केली आहेस का?" मयूर

"हो." मीरा

"तरीच जास्त गोड झाली आहे. तुझ्या हाताला चव आहे." मयूर बोलून गेला. मीरा मात्र त्याच्याकडेच पाहत होती.

दोघांचेही जेवण झाल्यावर ते परत थोडा वेळ तिथेच बसून राहिले. मयूर तिथेच झोपला. ते पाहून मीरा म्हणाली, "अरे, असा काय तू? मातीत कुठे झोपतोस?"

"आम्ही शेतकरी माणसं. माती म्हणजेच आमची काळी आई. आईच्या कुशीत झोपायला काय लाजायचं?" मयूर स्पष्टपणे बोलला.

बराच वेळ बसल्यानंतर ते परत जायला निघाले. "महाबळेश्वरला गेलो नाही तरी आजचा दिवस मात्र खूप छान गेला. परत एकदा निवांत कुठेतरी भेटू. तुझ्या सहवासात आल्यावर मन एकदम फ्रेश होते, मन शांत होते. तूच माझी खरी मैत्रीण आहेस." मयूर मीरापुढे मनातले बोलून मोकळा झाला. मीरा मात्र त्याच्याकडेच पाहत होती.

ते दोघे काॅलेजच्या समोर आले. काॅलेज सुटायला अजून थोडा वेळ होता. आता काॅलेजमध्ये कसे जायचे? हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता.
"थोड्या वेळाने काॅलेज सुटेल मग आपण आता आत कसे जायचे?" मीरा

"राहू दे चल. उद्या काॅलेजला येऊ. आत्ता घरी जाऊया." मयूर

"हो. पण आत्ता माझी बस नाही. बस यायला अजून एक तास लागेल, मग मला कसे जाता येईल?" मीरा

"एक काम करू, तू माझ्या घरी चल. आईला भेट. आमच्या गावच्या बस स्टॅण्डवर जेव्हा बस येईल त्या बसमधून तू घरी जा." मयूरच्या बोलण्याने मीरा काही समजेना. त्याच्या घरी जायचे कसे? आई काय म्हणेल? कुणी पाहिले तर? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात खळबळ माजली होती.

मीरा खरंच मयूरच्या घरी जाईल का? मयूरची आई मीराला बघून काही बोलेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..