Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 4

Read Later
वादळवाट 4

मयूरचे लक्ष त्या स्पर्श करणाऱ्या मुलाकडे गेल्यानंतर त्याने मीराचा हात पकडला आणि तिला बाजूला केले, तसेच तो त्या मुलाच्या शेजारी जाऊन उभा राहिला. तेव्हा मयूरला पाहून तो मुलगा शांत झाला. मयूरने मीराचा हात धरल्यावर ती शहारून गेली, मोहरून गेली. तिला काय रिएक्ट व्हावे हेच समजेना. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. तितक्यात एका बस स्टाॅपवर एक जागा रिकामी झाली. मयूरने पटकन तेथे जाऊन जागा पकडली आणि त्याने मीराला जोरात हाक मारली.

"मीरा इथे ये, जागा आहे बघ, बस." असे मयूर म्हणताच मीरा तिथे जाऊन बसली आणि तिच्या शेजारी मयूर उभा राहिला. ते पाहून तिच्या मनामध्ये मयूर विषयी आपुलकी वाटू लागली. एका मुलीला आदराने वागवणारा, मित्रत्वाचे नाते ठेवणारा हा मुलगा काहीसा वेगळा आहे, हे तिला जाणवले. ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. बघता बघता त्याचे गाव आले, तो आता उतरणार होता.

"चल घरी येतेस का?" मयूर

"नाही नको. तुझ्या घरी चालले नाही तर." मीरा

"चालणार कसे नाही? माझ्या आई-बाबांना सगळे चालते. त्यांना भेटून ये, हवं तर मी तुला घरी सोडतो." मयूर

"आत्ता नको. उशीर झाला आहे. परत कधीतरी येईन." असे मीराने म्हटल्यावर मयूर बसमधून खाली उतरला आणि तो घरी जाऊ लागला. मीरा सुद्धा तिच्या घरी जाऊ लागली. आता बस मधील गर्दी थोडी कमी झाली होती, त्यामुळे ती निवांत खिडकीच्या बाजूला बसली होती. खिडकीतून आत मंद वारा येत होता. तिला वाऱ्यासोबत मयूरच्या आठवणी येत होत्या. त्याने आज तिची मदत केली होती, शिवाय तो एक मुलगा म्हणून खूप चांगला होता. ती त्याच्या आठवणीत रमत घरी गेली. घरी गेल्यावर मात्र ती तिच्या कामात व्यस्त झाली.

इकडे मयूरची अवस्था काही वेगळी नव्हती. तो सुध्दा तिच्या आठवणीत रमला होता. काल परवाची त्यांची भेट पण खूप आधीपासूनचे मित्र आहेत असे वाटत होते. खूप जुनी ओळख आहे असे भासत होते. तसेच ते एकमेकांकडे ओढले जात होते. सगळे काम आवरून जेवण वगैरे करून मयूर शांत बसला होता. तेव्हा त्याला मीराची आठवण आली. तो तिच्या आठवणीत असतानाच त्याच्या लक्षात आले की आपण तर तिच्याकडून नंबर घेतला होता. आता तिला मेसेज करूया की नको अशी त्याची व्दिधा मनःस्थिती झाली होती. शेवटी न राहवून त्याने मीराला मेसेज केला.

तुझ्या आठवणीने
मन बेचैन झाले..
काही कळण्या आधी
नकळत सारे घडले..

मी मयूर. हा माझा नंबर आहे. असा मेसेज मयूरने केला आणि त्या दोन रेषा निळ्या होण्याची वाट तो पाहू लागला. बराच वेळ झाला तरी त्या रेषा काही निळ्या झाल्या नाहीत, म्हणून तो बेचैन झाला. मीरा हा मेसेज पाहिलं का? ती का पाहत नाही? इतका का वेळ लागत आहे? काही कामात असेल का? की मी तिला कॉल करू! कॉल केले तर योग्य होईल की अयोग्य? दुसरे कोणीतरी उचलले तर? अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत तो अडकला होता. बराच वेळ काहीही न करता तो स्वस्थ बसून राहिला होता. इतक्यात त्याला तिथे दोन निळ्या रेषा दिसल्या. तो एकदम खूश झाला. मीराने मेसेज पाहिला याचे त्याला समाधान वाटले, पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही म्हणून तो परत नाराज झाला.

नक्की हा मेसेज मीराने पाहिला असेल ना! की घरातील आणखी दुसऱ्या व्यक्तीने पाहिला असेल. मीरा अडचणीत तर आली नसेल ना! तिच्या घरचे समजून घेतील ना! की मीरानेच मेसेज पाहिला असेल आणि ती उत्तर देत नसेल. पण ती उत्तर का देत नसेल? असे एक ना अनेक प्रश्नांच्या गर्तेत मयूर होता. इतक्यात मेसेज टाईप होऊ लागला. मयूर आशेने त्याकडे पाहू लागला.

तू चारोळी खूप छान करतोस. थोडी कविता देखील केलास तर छान होईल, तुला नक्की जमेल. एकदा प्रयत्न करून बघ. असा मेसेज मीराने केला. ते पाहून मयूरला खूप आनंद झाला. काही झाले तरी त्यांचे फोनवरून बोलण्यास सुरुवात झाली.

रोज गुड मॉर्निंग या मेसेजने त्यांची सुरुवात होई, तर रात्री गुड नाईट या मेसेजने शेवट होई. मयूर आता रोज कॉलेजला जात होता. मीराला भेटण्यासाठी तो आतुर असायचा. शेतीतील कामे लवकर आटोपून तो कॉलेजला वेळेत पोहोचायचा. सगळे लेक्चर तो पूर्ण करायचा आणि कॉलेज सुटल्यानंतर घरी यायचा. यामध्ये रोज बोलता-बोलता त्या दोघांची मैत्री आणखीनच खुलत गेली. मेसेजवर रात्री बारा एक वाजेपर्यंत बोलत बसायचे, कधी अभ्यासाच्या गप्पा तर कधी कविता आणि चारोळीच्या. बोलता-बोलता वेळ कसा निघून जायचा? हे त्या दोघांना कधी समजलेच नाही.

त्या दोघांची मैत्री इतकी खुलत गेली की त्यांना एकमेकांशिवाय करमेनासे झाले. एके दिवशी मयूर काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता त्यामुळे आपसूकच त्याला कॉलेजला वेळेत जाता आले नाही, तर इकडे कॉलेजमध्ये मीराचा जीव कासावीस झाला होता. नेहमी वेळेत येणारा मयूर आज इतका उशीर का करतोय? असे तिच्या मनात विचार येऊन गेले. मयूरला पाहण्यासाठी ती धडपडत होती. तिने कितीही फोन कॉल, मेसेजेस केले तरीही त्याला प्रत्युत्तर येत नव्हते म्हणून ती बैचेन झाली होती. तिचे कशातच लक्ष लागेनासे झाले होते. मीरा निराश होऊन डोके बॅन्चवर ठेवून बसली होती. समोर लेक्चर सुरू होते पण त्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. ती फक्त आणि फक्त मयूरचा विचार करत होती. त्याच्यामध्ये तिचा जीव गुंतला होता हे तिला समजत नव्हते, पण आपण इतके अस्वस्थ का आहोत? असे तिला सारखे वाटत होते. कितीही प्रयत्न केला तरी लक्ष लेक्चरमध्ये लागत नव्हते.

बराच वेळ झाला तरी ती तशीच बॅन्चवर डोके ठेवून बसली होती. इतक्यात "सर, आत येऊ का?" असा ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला म्हणून तिने वर पाहिले तर समोर मयूर. त्याला पाहून तिचा कोमेजलेला चेहरा प्रफुल्लित झाला. बरेच दिवस एखाद्या रोपट्याला पाणी मिळाले नाही आणि अचानक मुसळधार पाऊस पडल्यानंतर ते रोपटे अगदी ताजे टवटवीत दिसते त्याप्रमाणे तिचा चेहरा टवटवीत झाला होता. आपण क्षणात इतके उदास होतो आणि आता क्षणात आनंदी आहोत याचा अर्थ मी कोणावर तरी अवलंबून आहे. माझे सुख कोणावर अवलंबून का असावे? हे मला नक्की काय होतंय? असे आधी कधीच घडले नाही. मग आत्ताच का? असा विचार तिच्या मनात चालू होता.

मीराने पाहिले तर मयूर त्याच्या जागेवर जाऊन बसला होता. तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने तिला पाहून स्मित हास्य केले. ते पाहून मीराने देखील हलकेसेच स्मित केले. लेक्चर संपल्यानंतर ब्रेकमध्ये ती त्याच्याजवळ जाऊन बसली.

"आज इतका का उशीर झाला?" मीरा

"अगं, महत्त्वाच्या कामासाठी गावाला गेलो होतो." मयूर

"तू आला नव्हतास तर मला करमतच नव्हते." मीरा बोलण्याच्या ओघात बोलून गेली. मीराच्या तोंडून हे वाक्य ऐकताच मयूर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला.

"म्हणजे तुझी तब्बेत बरी नाही का? असे वाटले." मीराने परत खुलासा केला.

दुसऱ्या दिवशी मीराच्या घरचे गावी गेले, मीरा एकटीच घरात होती. ती नेहमीप्रमाणे काॅलेजला जाणार होती. घरचे गावी गेलेत हे मीराने मयूरला बोलता बोलता सांगितले होते. इकडे मयूरने महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. तो आणि मीरा असे दोघेच महाबळेश्वरला जायचे तो एकटाच ठरवतो. मीराला ऐनवेळी विचारायचे म्हणजे ती नाही म्हणणार नाही असे त्याला वाटत होते.

ऐनवेळी विचारल्यावर मीरा महाबळेश्वरला जायला तयार होईल का? ती एकटीच त्याच्यासोबत जाईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..