Jan 23, 2022
प्रेम

वादळवाट 3

Read Later
वादळवाट 3

डबा खात असताना दोघेही गप्पा मारू लागले. त्यांचा डबा लगेच संपला. ती मुलगी लगेच उठून जाऊ लागली. तेव्हा मयूरच्या लक्षात आले की आपण तर तिचे नावही विचारले नाही. आता तर ती जात आहे. बोलावू का? असे म्हणत शेवटी त्याने तिला हाक मारलीच.

"एक्सक्युज मी." मयूरने बोलावताच ती मुलगी लगेच वळली.

"काय झालं? काही काम होत का?" ती मुलगी

"तुझं नाव काय आहे? इतका वेळ एकत्र बसलो पण नाव विचारायचेच राहून गेले." मयूर

"मी मीरा. मीरा देशमुख." असे त्या मुलीने म्हणजेच मीराने उत्तर दिले.

"आणि गाव?" मयूर दबक्या आवाजातच म्हणाला.

"वडगाव." मीराने हसतच उत्तर दिले.

"अरे म्हणजे आमच्या शेजारचे गाव. मी कडेगावचा." मयूर एकदम उत्साहाने म्हणाला.

"अच्छा." म्हणून मीरा जाऊ लागली.

"ऐक ना, मीरा." मयूरच्या तोंडून पहिल्यांदा मीरा हे नाव ऐकून ती शहारली. तिला दोन मिनिटं काहीच कळेना. ती स्तब्ध राहिली. मग ती वळली.

"बोल ना." मीरा

"माझे एक महिन्याचे नोट्स लिहायचे राहिले आहेत. तुझ्या वह्या मला देशील का? मी त्या पूर्ण करून तुला परत आणून देईन." मयूर

"हो चालेल ना! तू माझ्या वह्या घेऊन जाऊ शकतोस. माझ्या सगळ्या नोट्स पूर्ण आहेत. पण तू रोज कॉलेजला येणार ना! मला परत वह्या लागतीलच ना! रोजच्या नोट्स काॅलेजमध्ये लिहून घेतले तर बरे पडेल, एखाद्या दिवसाचा भाग जरी अपूर्ण राहिला तरी परत मला ते पूर्ण करावे लागतील. त्यापेक्षा त्या त्या दिवशी पूर्ण केले तर बरे पडेल." मीरा

"हो हो. आता तर रोजच काॅलेजला यावे लागेल." मयूर नकळत बोलून गेला.

"म्हणजे?" मीरा

"अगं म्हणजे नोट्स तरी पूर्ण होतील ना! नाहीतर नंतर लिखाण करत बसावे लागेल." मयूर च्या या बोलण्याने मीरा गालातच हसली.

"हो. पण रोज एकाच विषयाची वही देईन हं. म्हणजे तू ते लिखाण करून मला दे आणि मला सुद्धा अभ्यास करायला बरे होईल." मीरा

"बरं." मयूर.

मीराने तिची एक वही मयूरला आणून दिली आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसली. मयूरने मीराची वही उघडून पाहिली. 'वाह! काय सुंदर अक्षर आहेत. अगदी मोत्यासारखे.' मयूर मीराचे अक्षर पाहून म्हणाला. मीराचे अक्षर अगदी रेखीव होते. तसे ती लहानपणापासूनच सुंदर अक्षर काढायची. हस्ताक्षर स्पर्धेत तिचा नेहमी पहिला नंबर असायचा. मयूर एक एक पान पलटून पाहू लागला. तिच्या अक्षरांकडे पाहतच बसावे असे त्याला वाटत होते. मग त्याने शेवटचे पान पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला.

कधीतरी वेड्यागत
मन उगाच हसत..
तुझ्या आठवणीने
हळूच गालात लाजत..

कधीतरी वेड्यागत
मन हळव होतं..
तुझ्या आठवणीने
डोळ्यात आसव येतं..

कधीतरी वेड्यागत
मन उगाच जातं
हळूच तुझ्या कुशीत
बिलगून तुला राहतं..

कधी तरी वेड्यागत
मन तुझ्यावर भाळतं..
तुझ्या सौंदर्याने
अधिकच मोहरून जातं..

कधी तरी वेड्यागत
मन चिंब भिजतं..
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
बेधुंद होऊन जातं..

कधी तरी वेड्यागत
मन हळूच लाजतं..
तुझ्या स्पर्शाची जाणीव
अलगद होऊन जातं..

"अरे वा! इतकी सुंदर कविता. मीराने केली आहे. बापरे!" मयूर आश्चर्याने म्हणाला.

मयूर ला सुद्धा कविता करण्याचा छंद होता. तो सुद्धा खूप सुंदर सुंदर कविता करायचा. पण मीराच्या कवितेने तो अगदी तिच्या प्रेमातच पडला.

पुढचे लेक्चर सुरू झाले. सगळेजण आपापल्या अभ्यासात मग्न होते. मयूर मात्र तिचाच विचार करण्यात मग्न झाला होता. लेक्चर संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊ लागले. मीरा सुद्धा तिची बॅग घेऊन बाहेर जात होती. इतक्यात मयूर ने तिला हाक मारली. मयूर ने हाक मारल्यावर मीरा लगेच थांबली.

"बोल ना! काही काम होत का?" मीरा

"काम असे काही नाही. सहजच." मयूर

"अच्छा. चल मग स्टॅण्डपर्यंत सोबत जाऊ." मीरा

"हो चालेल की." मयूर

दोघे मिळून स्टॅण्डकडे बोलत जाऊ लागले. काॅलेजच्या बाहेर गेल्यावर मयुरने विषय काढला.
"तू किती सुंदर कविता बनवतेस! मला त्याची रचना खूप आवडली. अगदी सुरेख." मयूर मीराच्या कवितेचे कौतुक करत होता.

"कुठे रे? मी अजून शिकत आहे. जमेल तसं तोडक मोडक बनवते. त्यासाठी शब्दसंग्रह खूप लागतो मगच कविता सुंदर बनते." मीरा

"मला चारोळ्या जमतात पण कविता अजून तितकी जमतं नाही. तू मला शिकवशील का?" मयूर

"अरे, मी तितकी मोठी नाही आणि हुशार तर मुळीच नाही. मी तुला काय शिकवणार?" मीरा

"तुला जसे जमेल तसे शिकव. म्हणजे मी कविता करतो तू त्यात सुधारणा करून सांग. मग मी तो बदल करत जाईन. त्यातूनच मला शिकता येईल." मयूर

"अच्छा, ठीक आहे. मी जमेल तसे सांगत जाईन." मीरा

मीरा आणि मयूर दोघे बोलत स्टॅण्डपाशी आले. दोघांना वेगवेगळी बस पकडायची होती. मीरा तिची बस जिथे थांबते तिथे जाऊ लागली. तोच मयूर पुन्हा तिच्याशी बोलू लागला.
"तुझा नंबर देतेस का? म्हणजे मला कविता पाठवता येतील." मयूर ने नंबर मागितल्या बरोबर मीराने लगेच त्याला नंबर दिला. दोघेही बस स्टॅण्डवर बसची वाट पाहत उभे होते. बराच वेळ झाला तरी अजून बस आली नव्हती.

बऱ्याच वेळाने एक बस आली. ती बस वडगाव आणि कडेगाव या दोन्ही गावाला जाणारी होती. ते पाहून मीरा आणि मयूर दोघेही त्या बसमध्ये चढू लागले. बस दोन्ही गावाला जाणारी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी जमली होती. त्यातून वाट काढत मयूर बसमध्ये चढला आणि वर चढण्यासाठी मीराला हात समोर केला. लगेच आजूबाजूचे लोक ओरडू लागले. ते पाहून मीरा घाबरली. तू जा मी आले असे ती म्हणाली. तेव्हा मयूर पुढे चढून गेला. तो चढल्यावर त्याने पाहिले तर सगळी जागा भरली होती. एकही शीट शिल्लक नव्हती. म्हणून तो मीराची वाट पाहत तसाच उभा राहिला. थोड्या वेळाने मीरा सुध्दा बसमध्ये चढली.

बसमध्ये प्रचंड गर्दी होती त्याला मयूर कुठेच दिसेना ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली तेव्हा मयूरने मीरा म्हणून जोरात हाक मारली, तेव्हा तिला तो दिसला. मीरा वाट काढत काढत त्याच्याजवळ पोहाचली आणि तिथे जाऊन उभी राहिली.

त्या बसमध्ये बरीच काॅलेजची मुले मुली होते. बसमध्ये इकडे तिकडे बघायला सुध्दा जागा नव्हती, इतकी गच्च बस भरली होती. त्यात मीराला कुणाचा तरी धक्का लागला आणि ती मयूर जवळ येऊन एकदम बिलगली. तेव्हा ते दोघेही शहारून गेले. एकमेकांना झालेला तो पहिला स्पर्श अगदी मोहरून गेले. मीराला तर काय रिएक्ट व्हावे हेच समजेना. ती लगेच मागे सरकली, पण प्रचंड गर्दी असल्याने तिथेच उभा राहिली.

थोड्या वेळाने एक मुलगा तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तो तिला डिवचू लागला, सारखे स्पर्श करू लागला. मीरा अंग चोरून उभा राहिली. पण ती कुठे जाणार? आजूबाजूला जागा सुध्दा नव्हती. ती अवघडून तशीच उभी राहिली. त्या गर्दीत तिला मागेपुढे होता येत नव्हते. नाईलाजाने ती तशीच उभा राहिली.

आता पुढे काय होईल? कुणी तिची छेड काढेल की मयूर काही तरी करेल. हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

नमस्कार,
वादळवाट ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत फ्री मध्ये वाचायला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की वाचून अभिप्राय द्या..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..