Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 2

Read Later
वादळवाट 2

मयूर आणि ती मुलगी रस्त्यावरून चालत काॅलेजकडे चालले होते. वरून पाऊस कोसळत होता तर खाली पावसाचे पाणी साचले होते. त्यातून वाट काढत काढत ते दोघेही कॉलेज पाशी गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिने छत्री बंद केली. मयूर कपडे झटकून बॅग झटकू लागला. बॅग झटकून त्याने वर पाहिले तर ती मुलगी गायब. कुठे गेली ती मुलगी? तिचे आभार मानायचे राहूनच गेले. असे त्याने मनातच म्हटले पण त्याचे डोळे तिलाच शोधत होते. मयूर त्या मुलीला शोधत शोधत त्याच्या वर्गात जाऊन बसला.

वर्गात सर आले. ते नेहमीप्रमाणे शिकवू लागले. पण मयूरला काहीच समजेना. एक महिना तो काॅलेजला गेला नसल्यामुळे त्याला ते समजायला थोडा वेळ लागत होता, त्यात अधून मधून त्या मुलीचा विचार येत असल्यामुळे तर त्याला खूपच त्रास होत होता.

"मला सांगा, तुम्ही काॅमर्स हीच फॅकल्टी का निवडली? तुम्ही इतर कोर्सेसही करू शकला असता. पण काॅमर्स च का? सीए किंवा सीएस हा ऑप्शन सोडून सांगा." सरांनी विचारलेल्या या प्रश्नाने सगळे जण भारावून गेले. काय उत्तर द्यावे ते समजेना. कुणी बँकेत नोकरी करणार म्हणाले, तर कुणी एम बी ए करणार म्हणाले, कुणी अकाऊंटंट होणार म्हणाले. सगळ्यांची उत्तरे सांगून झाली. आता मयूरची वेळ आली. तो उभा राहिला.

"सर, रोजच्या जीवनात बँकेचे व्यवहार, नफा तोटा, तसेच खरेदी विक्री व्यवहार, ई काॅमर्स हे सगळे शिकता येण्यासाठी मी काॅमर्स ही फॅकल्टी निवडली आहे." मयूरच्या या उत्तराने सर

अगदी योग्य आणि अचूक उत्तर दिलेस. कुणी सांगितले म्हणून, मित्र किंवा मैत्रिणी हीच फॅकल्टी निवडली म्हणून जर तुम्ही इथे आला असाल तर काहीच उपयोग नाही. आपण जी फॅकल्टी निवडतो ती अगदी विचारपूर्वक निवडायला हवी. या मुलाने अगदी योग्य उत्तर दिले आहे." असे सर म्हणताच मयूर खाली बसला. तो बसत असतानाच त्याला ती मुलगी दिसली, जिने बस स्टॅण्ड वर त्याच्या डोक्यावर छत्री धरली होती. त्या मुलीकडे तो एकटक पाहू लागला आणि ती मुलगी सुद्धा त्याच्याकडे एकटक पाहू लागली. दोघांची नजरा नजर झाली. सरांच्या बोलण्याने ते दोघेही भानावर आले. त्या मुलीने मयुर कडे पाहून एक स्माईल दिली. मयूर सुद्धा तिच्याकडे पाहून गालातच हसला.

"अरे, ही मुलगी तर माझ्याच वर्गात आहे! हे तर सोने पे सुहागा झाले." असे तो मनातच म्हणून खूप खूश झाला. तो दिवस त्याच्या आयुष्यातील खूप चांगला गेला. कुणीतरी आवडीची व्यक्ती त्याला आज भेटली होती.

त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा असे कोणी आले होते की ज्याच्यामुळे आज तो आनंदात होता. खरंच कॉलेजमध्ये असे कोणीतरी भेटेल असे त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांची नजरा नजर होत होती. ते दोघेही एकमेकांकडे चोरून बघत होते. सरांचे लेक्चर संपले आणि प्रत्येक जण एकमेकांशी बोलत बसले. कॉलेज सुरू होऊन महिना झाला होता, त्यामुळे एकमेकांची चांगलीच ओळख झाली होती, पण मयूरच्या ओळखीचे तेथे कोणीच नव्हते. तो तसाच एकटाच बसला होता. त्याचे सगळे मित्र एकतर सायन्स नाहीतर आर्ट्स घेतले होते. तो एकटाच कॉमर्स घेतला होता.

मधला ब्रेक झाल्यानंतर काहीजण डबे खाऊ लागले तर काहीजण कॅन्टीनमध्ये गेले. मयूर मात्र तसाच बसून राहिला. त्याने डबा आणला नव्हता आणि कॅन्टीनमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची त्याची इच्छा नव्हती. म्हणून तो तसाच बसला होता. इतक्यात ती मुलगी त्याच्या जवळ आली आणि तिने मयूरच्या समोर डबा धरला. ते पाहून मयूर भारावून गेला. इतकी काळजी, इतकं प्रेम तो पहिल्यांदाच अनुभवत होता. हे सगळे त्याच्या आयुष्यात घडेल असे त्याला वाटले सुद्धा नव्हते.

"तू डबा आणला नाहीस ना! हे घे डब्बा. खाऊन घे." असे म्हणून त्या मुलीने स्वतः चा डब्बा पुढे केला.

"नको नको. मला काही भूक नाही. मी येतानाच जेवण करून आलोय. तसेही मला सकाळी लवकरच जेवायची सवय आहे. मी दुपारी काहीच खात नाही." असे म्हणून मयूरने तो डबा खाण्यास नकार दिला.

"ठीक आहे. माझ्या डब्यातील चालत नसेल तर राहू दे." असे म्हणून ती मुलगी जाऊ लागली. ते पाहून मयूरला कसेतरीच वाटले. तो मनात म्हणाला, 'इतक्या आपुलकीने तिने डबा आणला होता, पण मी नाही म्हणालो, हे माझे थोडे चुकलेच.' असे म्हणून ती जात असताना तिला मयूरने हाक मारली. मयूर ने हाक मारल्या बरोबर ती लगेच परतली.

"आता काय झाले?" ती मुलगी

"साॅरी" मयूर

"अरे राहू दे. तुला खायचं नसेल तर तू खाऊ नकोस. एखाद्याला दुसऱ्याच्या डब्यातील खायला आवडत नाही. ठीक आहे. इट्स ओके." ती मुलगी

"तसे काही नाही, मी इतरांच्या डब्यातील खातो." मयूर

"अरे राहू दे ना, मी समजू शकते. तू बस मी जाते." असे म्हणून ती परत जाऊ लागली.

"मला खूप भूक लागली आहे, तरीही मला देणार नाही का डबा?" हे मयूर चे वाक्य ऐकताच त्या मुलीने मयूर समोर डबा आणला आणि तो उघडला. मयूर ने पाहिले तर त्यामध्ये वांग्याची भाजी आणि चपाती होती. वांग्याची भाजी त्याची ऑल टाईम फेवरेट भाजी होती, त्यामुळे तो त्या डब्यावर तुटून पडला. अर्धा डब्बा संपल्यावर त्याच्या लक्षात आले की तिचा डबा हाच खात आहे, तिला त्याने साधे विचारले देखील नाही. त्याला शरमल्यासारखे वाटले.

"सॉरी, मी तुला विचारायचे सोडून एकटाच खात बसलो. वांग्याची भाजी माझी वीक पॉईंट आहे ना! त्यामुळे त्याच्यावर तुटून पडलो. पण तू जेवणार आहेस की नाहीस हे विचारायचे राहूनच गेले. ये ना तू पण बस." असे मयूर म्हणाला

"नाही राहू दे. तू जेव. तुला भूक लागली असेल ना!" असे ती मुलगी म्हणताच मयुरच्या मनात तिच्याविषयी आपुलकी वाटू लागली. 'कोण कुठली ही मुलगी, पण इतक्या आपुलकीने ती माझ्याशी वागत आहे. माझी काळजी घेत आहे. नक्कीच आमचे काहीतरी नाते असणार!' असे तो मनातच म्हणाला.

"तरीही तू दोन घास खाऊन घे ना! नाहीतर मला कसेतरीच वाटेल. तुला सोडून मी एकटाच तो ही तुझा डब्बा खात आहे म्हणून वाईट वाटेल. बस ना तू पण." असे म्हणून त्याने डबा पुढे केला.

"नको नको. तू खा, मी फक्त बसेन, तसेही मला अजिबात भूक नाही." ती मुलगी

"ओह् सॉरी, मी सुद्धा किती बावळट आहे बघ. आता डब्यातील जेवण उष्टे झाले आहे. मी अर्धा संपवला आहे आणि तुला त्यातच खा म्हणतोय. ठीक आहे. राहू दे. तुला काही हवे असेल तर आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. मी तुला हवे ते घेऊन देईन." मयूर चे हे बोलणे ऐकून त्या मुलीला कसेतरी वाटले. ती त्याच्या पुढील बेंचवर बसली आणि त्यातील एक घास मोडून तिने देखील खायला सुरुवात केली. ते पाहून मयूरच्या मनामध्ये ती घर करून गेली.

आता तरी त्यांची मैत्री होईल? ती मुलगी कोण असेल? तिचे नाव काय असेल? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

क्रमशः

नमस्कार,
वादळवाट ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत फ्री मध्ये वाचायला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की वाचून अभिप्राय द्या..ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..