वादळवाट 20

mayur chi katha marathi katha


मयूर तातडीने प्रणालीला घेऊन दवाखान्यात गेला. त्याची स्वतःची चार चाकी गाडी नव्हती, तरीही तो भाड्याची गाडी ठरवून प्रणालीला पुण्याच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेला. दवाखाना खूप मोठा असल्यामुळे दवाखान्यात खूप गर्दी होती. मयूरने प्रणालीचे केसपेपर काढले. नंबर येण्यास अजून बराच अवधी होता म्हणून दोघेही तिथेच बसले. बराच वेळ बसल्यामुळे प्रणालीला अस्वस्थ वाटू लागले. अशक्तपणामुळे तिला जास्त वेळ बसता येत नव्हते. मयूरची आता पंचाईत झाली. तिला कोठे झोपवायचे? असा प्रश्न त्याला पडला होता. इतक्यात त्यांचा नंबर आला आणि ते दोघे आत गेले. आत गेल्यावर मयूरने प्रणालीला काय काय होतंय? ते सगळे डिटेलमध्ये डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले. त्यानुसार प्रणाली आणि मयूर टेस्ट करण्यासाठी गेले. टेस्ट करून सगळे रिपोर्ट्स् पुन्हा डॉक्टरांना दाखवण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट पाहिले.

"मी सगळे रिपोर्ट पाहिले. यांना एक आजार आहे. शक्यतो हजारात एक असे पेशंट असतात. घाबरण्याचे काही कारण नाही. पण योग्य ती काळजी घ्यायला हवी." डाॅक्टर

"आजार? हा कोणता आजार आहे सर. फुफ्फुसातील कफ कमीच होत नाही, पण हा न्युमोनियासारखा आजार नाही. त्याचे सगळे टेस्ट झालेत. हा नवीन आजार आहे का?" मयूरने काळजीने डाॅक्टरांना विचारले.

"नवीन नाही, तसा हा आजार जुनाच आहे. पण बऱ्याच लोकांना याबद्दल काहीच कल्पना नाही. त्यामुळे योग्य तो इलाज होत नाही आणि शेवटी पेशंट हाताबाहेर जातो." डाॅक्टर

"हो सर, आम्हालाही याबद्दल काहीच कल्पना नव्हती. इथे आल्यावर तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहे." मयूर

"हो. हा आजारच असा आहे. पल्मोनरी हायपरटेन्शन या आजाराचे नाव आहे. शक्यतो हा आजार अनुवंशिक असतो. यांच्या घरात वडीलधाऱ्यांपैकी कोणाला असा आजार होता का?" डाॅक्टर

"हो. हिच्या आजोबांना असा त्रास व्हायचा असे एकदा हिची आजी बोलली होती. तो त्रास हिला म्हणजे नातीला आला असेल का?" मयूर

"करेक्ट. हा आनुवंशिक आजार आलेला आहे. आपण यावर लगेच ट्रिटमेंट सुरू करू शकतो." डाॅक्टर

"सर, ही लवकर बरी होईल ना?" मयूर

"हो नक्कीच. या लवकर बऱ्या होतील. त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देणार असल्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील होईल." डाॅक्टर

"ही पूर्णपणे बरी होईल ना? की हा आजार परत वाढू शकेल." मयूर

"आजार समूळ नष्ट होऊ शकत नाही. हो पण बऱ्याच अंशी फरक जाणवतो. यांच्या फुफ्फुसातील कफ बाहेर काढल्यावर यांना बरे वाटेल. ते झाल्यानंतर गोळ्या मात्र आपण चालू करू शकतो. गोळ्या चालू असताना त्यांना काही त्रास होणार नाही याची मात्र नक्की खात्री आहे. तब्बेतीमध्ये बरीच सुधारणा होईल." डाॅक्टर

"ठिक आहे सर. ट्रिटमेंट सुरू करा." मयूर

मयूरने परवानगी दिल्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा प्रणालीच्या फुफ्फुसातील पूर्ण कफ बाहेर काढला. ही ट्रिटमेंट पूर्ण होण्यासाठी साधारण एक दीड महिन्याचा कालावधी गेला. मयूर डॉक्टर जेव्हा अपॉइंटमेंट देतील तेव्हा तेव्हा प्रणालीला घेऊन दवाखान्यात जाई. ट्रिटमेंट पूर्ण झाल्यानंतर तिला घरी आणत होता. सगळा कफ निघून गेल्यानंतर प्रणालीच्या तब्येतीमध्ये थोडा फरक जाणवू लागला. प्रणाली आता सासरी आली होती. तिची तब्येत थोडीफार पुर्ववत झाली होती. औषधे चालू असल्यामुळे तिला सध्या तरी कोणताही त्रास नव्हता.

प्रणालीच्या तब्येतीमध्ये बराच फरक पडला असला, ती आता बरी झाली असली, तिला सध्या कोणताही त्रास जाणवत नसला, तरीही ती स्वतःच्या मुलांकडे नवऱ्याकडे तेव्हा कुटुंबाकडे लक्ष देत नव्हती. कोणतेही काम ती मनापासून करत नव्हती. मुळात तिचे लक्ष कशातच नव्हते. सतत कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये ती असायची. कोणतेही कारण घेऊन ती विचार करत बसायची. विचार करण्यात एकदा तिची तंद्री लागली, की कोणीही हाक मारले तरी तिचे लक्ष नसायचे. आजारी होती तेव्हा एक आणि आता बरी झाली असली तरी ही दुसरी तऱ्हा असे सर्वांना वाटत होते.

मयूर तर या सर्व गोष्टींमुळे कंटाळला होता. प्रणालीचे आपल्याकडे, कुटुंबाकडे थोडेसेही लक्ष नाही हे पाहून त्याला खूप वाईट वाटत होते. प्रणाली त्याच्यासाठी वेळ देत नव्हती, त्यामुळे तो बाहेर आपला वेळ घालवत होता. त्याला आता सतत मीराची आठवण येत होती. प्रणालीच्या सततच्या आजारपणामुळे तो त्रासला होता. तीन चार वर्षे ती आजारीच होती. मयूरने तिचे सारे काही केले होते, पण आता जेव्हा ती बरी झाली होती तेव्हा मात्र तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते.

तसेही ती मुद्दाम करत नव्हती. तो आजारच तसा होता. सर्वांना वाटत होते की, ती मुद्दामून करत आहे म्हणून सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले. प्रणाली साधे स्वयंपाकही करत नव्हती, बसून मुलांचे अभ्यास घेणे सुद्धा तिला जड जात होते. पण यात तिचा काहीच दोष नव्हता. त्या आजारामुळे तिला तसे होत होते. पण या वेळेस तिच्या भावना कोणी जाणून घेत नव्हते. इतके दिवस तिला साथ दिलेले आता तिच्यापासून दूर जात होते.

एके दिवशी पुण्याहून हाॅस्पिटलमधून बाहेर पडताना मयूरला मीरा दिसली. तिचेही लग्न झाले होते, अर्थातच हे तिने घातलेल्या मंगळसुत्रावरून त्याला समजले. मीराने मयूरकडे पाहिले आणि ती लगेच त्याच्याजवळ आली. ती भावनेच्या भरात बोलणार इतक्यात त्याच्या शेजारी उभी असलेली प्रणाली तिच्या नजरेस पडली. तिला पाहून मीराने तिच्या भावना आवरल्या. ते दोघेही मोजकेच बोलले आणि आपापल्या घरी गेले. तेव्हापासून मयूर प्रणालीमध्ये मीराला शोधण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले, त्यामध्ये त्याला मीराचा विसर पडला होता. पण आता पुन्हा त्याला मीराची आठवण सतावत होती रोजचे कामाचे टेन्शन, शेतामध्ये पिक पिकवण्याचे टेन्शन, त्यात पाऊस वारा झेलत रात्रंदिवस काम करायचे, घरात आले की आईला होत नाही म्हणून तिला कामात मदत करायचा, कधी कधी सगळा स्वयंपाक त्याला करावा लागत होता, त्यानंतर मुलांना भरवायचे, त्यांचा अभ्यास देखील त्यालाच घ्यावा लागत होता. या सगळ्या गोष्टींमुळे तो वैतागून गेला होता.

सगळ्या गोष्टी करता करता एक दिवस तो खूप त्रासून गेला होता. त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. स्वतःचा जीव त्याला नकोसा होता. अगदी कंटाळून, वैतागून विचार करता करता तो घराबाहेर पडला. विचारचक्रात चालता चालता तो नदीच्या तीरावर येऊन बसला. तिथे बसल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांनी कल्लोळ माजला होता. एकटक त्या संथ वाहणाऱ्या पाण्याकडे तो पाहत बसला होता. त्याला त्याचा जीव नकोसा झाला होता. मयूर तीरावर बसून "या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यावी का?" अशा विचारात गुंतला होता. सारा संसारचं त्याला नकोसा झाला होता, त्यामुळे सारे काही संपवून निघून जाण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. जर या जगण्याला काही अर्थ नाही तर जगून काय उपयोग? असे त्याला वाटत होते. आजूबाजूचे शांत वातावरणात, सूर्य मावळतानाचा तो निसर्ग याकडे त्याचे मुळीच लक्ष नव्हते. तो खिन्न मुद्रेने एकटक पाण्यात पाहत होता.

आता मयूर काय करेल? जीवन संपवून हे वादळ शमवेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः

तुम्हाला ही कथा आवडत असल्यास नक्की कमेंट आणि लाईक करा.. तुमचा अभिप्राय खूप मोलाचा आहे..

🎭 Series Post

View all