Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 1

Read Later
वादळवाट 1

संध्याकाळची वेळ. नयनरम्य वातावरण. पक्ष्यांचा चिवचिवाट जणू ते आपल्या घरट्यात जाण्यासाठी निघत होते. गाई गुरे रानातून चरून गोठ्याकडे जात होती. सगळीकडे शांतता पसरली होती, माणसांची वर्दळ खूपच कमी झाली होती, सूर्य मावळत होता, जणू तो लाल गोळा नदीत बुडत आहे असे भासत होते. थंड वाहणारा तो वारा, संथ वाहणारी नदी, जणू निसर्गाचा नजारा खुलून दिसत होता. सगळे काही आपापल्या पद्धतीने सुरळीत सुरु होते.

परमेश्वराने निर्माण केलेला तो निसर्ग, तो देखावा अगदी नयनरम्य होता. पण तिथे आणखी कुणीतरी होतं. अगदी या जगातून अलिप्त. अफाट संसाराच्या महासागरातून प्रवास करताना थकून जाऊन मनाला कायमची शांती मिळावी या उद्देशाने नदीच्या तीरावर पाण्यात पाय सोडून बसलेला. संसाराच्या त्रासातून त्रस्त होऊन मन पिळवटून टाकलेल्या या देहाला अखेरचा निरोप देण्यासाठी तो तेथे बसला होता. ना घरच्यांचा विचार ना मनाचा अगदी निर्धास्त होऊन तो बसला होता, कारण अखेरचा श्वास त्याला मनमोकळा घ्यायचा होता.

मयूर आईबाबांचा एकुलता एक मुलगा. चांगले घर, शेतीवाडी सारं काही होतं. पण आज तो जीवनमरणाच्या कचाट्यात अडकला होता. 35 वर्षाचा मयूर जेव्हा हा विचार करत नदीच्या तीरावर बसला होता तेव्हा त्याचा जीवनपट अगदी चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यासमोरुन सरकत होता. तो मंद वारा त्याला घरची ऊब जाणवून देत होता, तर थंड पाणी संसाराची स्वप्न. तो त्या पाण्यात उडी मारून स्वतःला संपवणार होता, त्यासाठीच तर तिथे बसला होता.

"बस झाले. किती ही वेदना! किती हे दुःख! या सगळ्या मधून मुक्ती हवी आहे. जर मुक्ती हवी असेल तर संपवावेच लागेल." असा विचार करत तो भूतकाळात रमून गेला.

किती सुंदर कुटुंब होते आमचे! आई, बाबा, बहीण आणि मी असे चौकोनी कुटुंब. आम्ही अगदी गुण्यागोविंदाने राहत होतो. आईबाबा खूप लाड करायचे. जे हवे ते सगळे आणून देत होते. पण त्या आमच्या संसाराला कुणाची तरी दृष्टच लागली. मयूर नववीत असताना त्याचे बाबा हे जग सोडून गेले. त्यांच्यावर डोंगराएवढे दुःख कोसळले. म्हणतात ना सुख जवां एवढे दुःख पर्वताएवढे, त्याप्रमाणे सुख संपून दुःख वाट्याला आले. घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या अंगावर पडली. आईचा आणि बहिणीचा सांभाळ त्यालाच करायचा होता. त्याने सगळी दुःखे मनात ठेवून आई आणि बहिणीला आधार दिला. त्या दोघी तर पूर्ण कोलमडून गेल्या होत्या. आता जगण्यात काय अर्थ? असे त्यांना वाटत होते. पण मयूरने त्यांचे सांत्वन केले. त्याने त्यांना आधार दिला. मयूरकडे बघून त्या दोघी सावरल्या.

त्याने पाहिलेली सगळी स्वप्ने एका क्षणात नाहीशी झाली. बाबांचा आधार होता त्यामुळे तो ताठ मानेने जगत होता. आता आयुष्यातून आधारच गेला म्हटल्यावर कसे जगायचे? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. खरंच बापाची किंमत तो असताना समजत नाही तर तो गेल्यानंतर समजते. बाप हा स्वतः ठिगळे लावलेले कपडे वापरतो पण आपल्या मुलांसाठी कपडे नवीनच घेतो. तो स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. कारण बाप हा बाप असतो.

मयूर आता काहीतरी करण्यासाठी धडपडत होता, कारण त्याच्यावरच तर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. तोच त्या कुटुंबाचा आधार होता. त्यामुळे त्याला स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगायचे होते.

या लहान वयातच त्याच्यावर जबाबदारी पडली असल्यामुळे त्याला आता काय करावे? हेच सुचेना. त्याचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले नाही मग तो काय करणार? काहीतरी हात-पाय हलवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही अशी परिस्थिती असताना तो शेती करण्याचे ठरवतो.

"आई, मी शेती करायचा विचार करतोय, आपल्या शेतीतील पीक आता जाईलच, ते गेले की थोडाफार पैसा येईल, मग पुढचे पीक घेऊ त्यासाठी मला राबावे तर लागणारच. आपले रामू काका माझ्यासोबत मदतीला असतीलच, ते जसे सांगतील तसे मी करेन. पण आता शेती वाचून पर्याय नाही." हे मयूर असे वाक्य ऐकताच त्याच्या आईला भरून आले. आपला मुलगा इतक्या लहान वयातच किती जबाबदार बनला आहे याची तिला जाणीव झाली.

"बाळा, तू शेती तर करच, पण त्यासोबत शिक्षण देखील घे. शिक्षण न घेता असाच अडाणी राहिलास तर मला ते आवडणार नाही. शिवाय सगळेजण अडाणी म्हणून तुला चिडवत राहतील, त्यापेक्षा रामू काका शेती करतील त्यांच्यासोबत तू जा. पण शिक्षण सुद्धा घे." मयूरच्या आईने मयूरला समजावले.

"आई, आपल्या सोनूला सुद्धा चांगले शिक्षण द्यायचे आहे ना! तिचा शिक्षणाचा खर्च तर भरून निघायला हवा, त्यात माझा खर्च आणखी कशाला? त्यापेक्षा राहू दे. मी शिक्षण बंद करतो." मयूर

"नको बाळा, तू साधं काहीतरी शिक, पण आडाणी तरी राहू नकोस, अशी माझी इच्छा आहे." आईने सांगितलेल्या इच्छेपुढे मयूरला काही बोलता आले नाही. त्याने किमान ग्रॅज्युएट व्हावे असे आईला वाटत होते आणि त्यासाठी त्याने ग्रज्युएट होण्याचा निर्णय घेतला.

शेती करताना सुरुवातीला रडत कुडत का होईना त्याने प्रयत्न केला, जोडीला शिक्षणही तो घेत होता, असे करत करत त्याचा चांगला जम बसायला साधारण एक दोन वर्षे लागली. आता त्याची दहावी झाली होती. चांगले मार्क नाही पण बर्‍यापैकी मार्काने तो पास झाला होता. यातच त्याला आनंद झाला होता, कारण एक तर जबाबदारी पेलताना आलेल्या अनंत अडचणी, त्यात हे शिक्षण या दोन्हीचा ताळमेळ घालता घालता त्याला नाकीनऊ येत असे, तरीही त्यातून तो बऱ्यापैकी मार्कांनी पास झाला. आता पुढचे शिक्षण घेण्यासाठी तो जवळच्या शहरात म्हणजेच सातारा येथील काॅमर्स काॅलेजमध्ये त्याने अॅडमिशन घेतले.

शेतीच्या कामांमुळे काॅलेज सुरू झाले तरी तो काॅलेजला जात नव्हता.पावसाळ्याची कामे आटोपल्यावर त्याने काॅलेजला जाण्याचा विचार केला. ठरल्याप्रमाणे तो नेहमीप्रमाणे सकाळी आवरून तयार झाला.

आज त्याच्या काॅलेजचा पहिलाच दिवस. मयूर बसस्टाॅपवर येऊन थांबला. सातारा ची बस आल्यावर तो बसमध्ये चढून सातारा स्टॅंडवर गेला. स्टॅण्डपासून त्याचे काॅलेज जवळच होते, अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते, म्हणून तो चालत काॅलेजकडे जाणार इतक्यात पाऊस सुरू झाला. पाऊस पडू लागल्यामुळे तो थोडा वेळ तेथेच उभा राहिला. बराच वेळ झाला तरी पाऊस थांबायचे नावच घेईना, म्हणून तो तसाच पावसात भिजत काॅलेजला जाऊ लागला. कारण पहिल्याच दिवशी उशीर झाला तर बरे दिसणार नाही असे त्याला वाटत होते.

मयूर पावसातून भिजत जात असतानाच अचानक त्याच्या डोक्यावर पाऊस पडेनासा झाला. आजूबाजूला पाऊस पडतोय आणि डोक्यावर का पडेना? म्हणून त्याने वर पाहिले तर वर त्याला छत्री दिसली. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. रानात काम करताना बरेच वेळा तो पावसात भिजला होता, तेव्हा त्याची इतकी काळजी कोणी केली नव्हती आणि आज पहिल्यांदा कुणीतरी त्याच्या डोक्यावर छत्री धरली होती. कोण छत्री धरली आहे? हे पाहण्यासाठी त्याने बाजूला पाहिले, तर एका सुंदर मुलीने छत्री धरली होती. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो तिच्याकडे तसेच एकटक पाहत उभा राहिला. कोण आहे ही मुलगी? आणि हिने माझ्यासाठी छत्री का धरली असेल? असा विचार त्याच्या मनात सुरू होता.

"काॅलेजला जात आहेस ना!" त्या मुलीच्या बोलण्याने तो भानावर आला. त्याने मानेनेच होकार दिला. ते दोघेही पावसातून एकाच छत्रीतून जात होते.

तू आयुष्यात येताना
पाऊस घेऊन आलीस..
तुझ्याच या रूपाने
सावली बनून गेलीस..

असे मयूरला त्या मुलीविषयी वाटत होते.
कोण होती मुलगी? त्याच्या आयुष्यात का आली होती? त्याची प्रेयसी की त्याची पत्नी बनेल? की फक्त मैत्रीण असेल? तिचा काय हेतू असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

क्रमशः

नमस्कार,
वादळवाट ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत फ्री मध्ये वाचायला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की वाचून अभिप्राय द्या..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..