वादळवाट 15

Ek premkahani. Mayur chi katha Marathi katha

आईने समजावून सांगितल्यावर मयूरला आता पटले की आपल्या आयुष्यात जे काही होते ते सर्व विधिलिखित असते. आता तो हळूहळू सावरू लागला, मीराच्या आठवणीतून बाहेर पडू लागला होता. त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून घेतले होते. आता तो लक्षपूर्वक शेती करू लागला आणि बाहेरून परीक्षा देऊन शिक्षण घेऊ लागला. अशाप्रकारे दोन्हीचा बॅलन्स साधत तो जगत होता. हे सर्व पाहून मयूरच्या आईला देखील समाधान वाटले. दिवसामागून दिवस जात होते. मयूरचे काॅलेजचे शिक्षण संपत आले होते. तो आधुनिक पद्धतीने शेती करत होता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो पूर्ण वेळ शेती करण्यात घालवू लागला. वेगवेगळे भाजीपाला, फळभाजी इत्यादींची तो शेती करत होता. तो यातून बरेच पैसे मिळवत होता. एक दिवस तो निवांत बसला असता त्याची आई त्याच्याजवळ जाऊन बसली आणि त्याच्याशी बोलू लागली.

"मयूर, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." मयूरची आई

"अगं आई, बोल ना. तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस." मयूर

"अरे, म्हणजे तसे नाही. तू अलिकडे एकटा एकटा राहतोस ना, तुझ्याशी निवांत अशी बरेच दिवस बोलले देखील नाही. म्हणून म्हटले आज बोलूया." मयूरची आई

"बोल ग आई, मी आहे. ते कामाच्या गडबडीत निवांत बोलायला वेळ कुठे होता? आज मी निवांत आहे, जे काही बोलायचं आहे ते बिनधास्त बोल." मयूर

"हे बघ मयूर, तुझं शिक्षण आत्ताच पूर्ण झालंय आणि तू नोकरी न करता शेती करायचं म्हणतोस." मयूरची आई

"हो. माझा निर्णय झालाय. तुला काही हरकत आहे का?" मयूर

"अजिबात नाही. मला तुझा निर्णय मान्यच आहे. पण आता माझं वय झालंय रे." मयूरची आई

"अगं, मग मी कुठे तुला शेतात घेऊन चाललोय. मी एकटाच सगळी शेती बघेन. तू फक्त आराम कर." मयूर

"अरे, पण आता माझ्याने घरातील कामे होईनात. थोडे जरी काम केले तरी गुडघे दुखत आहेत. उशीर पर्यंत उभा राहता येत नाही आणि मी अजून किती वर्ष काम करायचं सांग ना?" मयूरची आई

"आपली मनीषा आहे ना, ती करेल की सगळं, तू का टेन्शन घेतेस?" मयूर

"म्हणजे तू लेकीला घरातच ठेवून घेणार आहेस की काय?" मयूरची आई

"म्हणजे? तुला जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल." मयूर

"अरे, म्हणजे ती लग्न करून गेल्यावर परत मलाच करायला लागणार." मयूरची आई

"मग तुझे म्हणणे काय आहे?" मयूर

"मला असे वाटते की आपण तुझे लग्न करूयात. म्हणजे घरात मला सोबतही होईल आणि थोडी मदतही होईल." मयूरची आई

"आई, तुला तर सगळं माहित आहे ना. मग तू असा हट्ट का करतेस?" मयूर

"अरे बाळा, हा जीवनप्रवाह जसा वाहतो तसे जायचे असते. इथे कुणीच कोणासाठी थांबत नाही. ना ती थांबली ना तिचे आयुष्य. मग तू असा राहून काय होणार? तुझी काही हरकत आहे का? तू सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे जाव असे मला वाटते. तू तिच्यासाठी तुझे आयुष्य थांबवू नकोस." मयूरची आई

"आई, मी थांबलोय कुठे? मी तर चालतंच आहे. आयुष्यात खूप काही करण्यासाठी धडपडत आहे. शेतीमध्ये प्रगती करत आहे. पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे काही कमी आहे का? मग मला सांग, आयुष्यात पुढे जाण्यासाठी लग्नच करायला हवे का?" मयूर आईला समजावत म्हणाला.

"तू सगळं काही करत आहेस बाळा, पण हे सगळं करताना मायेने, प्रेमाने, आपुलकीने बोलणारे, करणारे, आपलं हक्काचं माणूस असायला लागतंय. मग बघ आयुष्य किती सुंदर होतंय ते?" मयूरची आई

"आई, तुला तर माहितच आहे की मी इतर कोणत्याही मुलीवर प्रेम करू शकणार नाही, कारण माझ्या मनात मीरा आहे, माझ्या हृदयात मीरा आहे, अजूनही मी वेड्यासारखं तिची वाट बघत आहे." मयूर

"बाळा, प्रेम हे असंच असतं. पण आयुष्यात सुखदुःखात जवळची व्यक्ती हवीच ना." मयूरची आई

"मग तू आहेस ना. तूच माझी सोबती आणि तूच माझी मैत्रीण. जे काही असेल ते सर्व तूच आहेस." मयूर

"मी किती दिवसांची आहे. आज आहे तर उद्या नाही. अगदी पाण्यावरचा बुडबुडाच. माझ्यानंतर तुझं काय? तेव्हा तुझी सोबत कोण करेल? एकट्याने जीवन जगणे खूप कठीण असतंय रे, मी माझ्या अनुभवाने बोलतेय. एकटं आयुष्य जगणं खूप कठीण असतं. म्हणून म्हणतेय तू लग्न कर." मयूरची आई

"पण आई, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. मी लगेच सांगू शकत नाही आणि मीराला विसरू शकत नाही." मयूर

"तुला हवा तितका वेळ घे. शांत बसून विचार कर. मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचाही विचार कर आणि मग मला सांग. आता झालं ना. पण एक लक्षात ठेव. ज्या त्या गोष्टी वेळच्यावेळी झाल्या म्हणजे बरं असतं. उगीच वेळ निघून गेली तर काय उपयोग? म्हणून जे काही सांगायचं ते लवकर सांग." असे म्हणून मयूरची आई तिथून निघून गेली. आई गेल्यावर मयूर मात्र विचारांच्या गर्तेत गेला.

मयूर विचारचक्रात होता. त्याच्याभोवती मीरा आणि त्याचे भविष्य एका वलयात फिरत होते. भावी आयुष्याच्या विचारात त्याच्या डोळ्यासमोर फक्त मीरा दिसत होती. मीराशिवाय त्याचे आयुष्य शून्य होते की ज्याला काही अर्थ नव्हता. पण मीरा तर त्याच्या आयुष्यातून कायमचीच निघून गेली होती कधीही परत न येण्यासाठी. मग फक्त तिच्या आठवणीत रडतकुडत आयुष्य जगायचे की आयुष्यात नवे वळण घेऊन पुढे जायचे या विचारचक्रात मयूर अडकला होता. त्याला योग्य तो निर्णय घेता येत नव्हता.

मला विसरून जा, इतके बोलून मीरा निघून गेली होती. पण मयूरला मात्र काही केल्या तिचा सहवास विसरता येत नव्हता. तिचे ते बोलणे, तिचे हास्य, तिचा तो स्पर्श सारे काही जणू कालच घडले होते की काय? असे मयूरला भासत होते. आयुष्यात पुढे जावे तर तशी समजून घेणारी मीरासारखी जीवनसाथी मिळणे कदापि अशक्य. अशा विचारांच्या चक्रात तो दिवसभर होता. पण काही केल्या त्याला योग्य तो निर्णय घेता येत नव्हता.

आई जे काही बोलली ते योग्यच होतं. आता तिचेही वय झाले. अजून किती दिवस ती काम करेल? तिचेही मन आहेच ना. आईचे बोलणे मयूरला पूर्णपणे पटले होते. पण तरीही त्याचे अंतर्मन ते मान्य करत नव्हते. खरंच प्रेम ही भावना खूप वेगळी असते. तो अनुभव खूपच निराळा. पण एकतर्फी प्रेमाला काय अर्थ? इथे मीराचे देखील प्रेम होतेच पण ती शेवटपर्यंत साथ द्यायला तयार नव्हती. मग याला अर्थ काय?

मयूरला निर्णय घेण्यास खूप कठीण जात होते.

मयूर नक्की कोणता निर्णय घेईल? आईच्या सांगण्यावरून पुढे जाईल की मीराच्या आठवणीत अडकून बसेल. हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः

ही कथा तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.

🎭 Series Post

View all