वादळवाट 12

Mire Mayur chi premkahani Marathi katha

चिपळूण पाहून झाल्यावर सगळे परतीच्या प्रवासाला लागले. आता सगळे खूप दमले होते. घरची ओढ लागल्यामुळे जो तो शांत बसले होते. ही सहल सर्वांच्या स्मरणात राहणारी होती. तसेच यामध्ये मीराचे पाण्यात पडणे हे तर कायमस्वरूपी लक्षातच राहिलं. पण यामध्ये आणखी एक लक्षात राहण्यासारखे आहे ते म्हणजे मीरा आणि मयूरला झालेली प्रेमभावना. या सहलीमुळे ते दोघेही मनाने अगदी जवळ आले होते, पण कोणीही ते बोलून दाखवले नाही.

फायनली रात्री आठ वाजता त्यांची बस सातारामध्ये येऊन पोहोचली. सगळे बसमधून उतरून आपापल्या घरी जाऊ लागले. मीरासुध्दा बसमधून उतरली. तिला घेऊन जायला तिचे बाबा आले होते. ती लगेच बाबांच्या गाडीवर जाऊन बसली. मयूरही मित्राच्या गाडीवरून जाऊ लागला. दोघेही जड अंतःकरणाने घरी जाऊ लागले.

दुसरा दिवस उजाडला. आज काॅलेजला सुट्टी होती. मयूरला काहीच करमेना. त्याने मीराला मेसेज केला तरी तिचा रिप्लाय आला नाही, म्हणून मयूर खूप नाराज झाला. तो दिवस त्याचा नाराजीतच गेला असल्याने त्याने स्वतःला कामात झोकून घेतले. रात्री उशीरा "एका कार्यक्रमाला गेले होते म्हणून तुला रिप्लाय देता आले नाही." असा मीराचा मेसेज आलेला पाहून मयूरचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्या दिवशी मयूर नेहमीप्रमाणे काॅलेजला गेला. मीरा त्याची वाट पाहतच उभी होती. मीराला समोर पाहून मयूरला खूप आनंद झाला. तो लगेच तिच्या जवळ जाऊन बोलू लागला. आता त्यांचे नाते मैत्रीच्या पलिकडे गेले होते, की जे दोघेही व्यक्त झालेले नव्हते.

"साॅरी अरे, काल तुझा मेसेज पाहिलाच नाही." मीरा

"इट्स ओके. त्यात काय एवढं? तू कार्यक्रमात होतीस ना! नाहीतर तू दुर्लक्ष थोडीच केले असतेस." मयूर

"हो अरे, आत्याच्या मुलीच लग्न होतं ना! म्हणून गेले होते." मीरा

"बरं." मयूर

बेल वाजल्यावर दोघेही वर्गात जाऊन लेक्चरला बसले. इतक्यात बारावीच्या परीक्षेची फी भरण्याविषयी नोटिस आली. शिवाय परिक्षेची तारीख फायनल झाली. परीक्षा जवळ आली म्हटल्यावर सगळेच अभ्यासाच्या तयारीला लागले. नोट्स पूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या वह्या घेऊ लागले. अपूर्ण गृहपाठ पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले. आता परिक्षा म्हटल्यावर टेन्शन तर असणारच म्हणून कोणीच कोणाशी बोलत नव्हते. मीरा आणि मयूर देखील तितके बोलत नव्हते. त्यांचा अभ्यास चालू होता.

बघता बघता परीक्षा सुरू झाल्या. एक एक पेपर होऊ लागले. काॅमर्स शाखा असल्याने सहा विषयाचे पेपर सहा दिवसात संपले. परीक्षा कशी संपली कोणालाच कळले नाही. आता ते कनिष्ठ विभागातून वरिष्ठ विभागात जाणार होते. शेवटचा पेपर संपल्यावर सगळ्यांनी पार्टी करायचे ठरवले होते, त्यामुळे पेपर संपल्यावर सगळे एका हाॅटेलमध्ये जमले होते. तिथे सर्वांनी दंगा मस्ती करण्यास सुरुवात केली. परीक्षेच्या दिवसातील जे शांत वातावरण होते ते अगदी मुलांच्या दंग्यात भग्न झाले होते.

दुपारी दोन वाजता पेपर संपल्यावर सगळ्यांनी पार्टी सुरू केली ती संपायला संध्याकाळ झाली. ती त्या सर्वांची शेवटची भेट असणार होती. कारण आता काॅलेजला सुट्टी लागणार होती. सुट्टी म्हटल्यावर साधारण दोन अडीच महिने तरी भेटता येणार नव्हते. पण फोनवर बोलता येणार असल्याचे तेवढेच समाधान होते.

पार्टी संपल्यावर सगळे जड अंतःकरणाने घरी जाऊ लागले. मीरा आणि मयूर सुध्दा जड अंतःकरणाने घरी जाऊ लागले. ते दोघेही आता लवकर भेटणार नव्हते. पण मयूरला राहून राहून वाटत होते की जर आपण मनातील भाव बोलून दाखवले असते तर कदाचित ही सुट्टी आणखी मजेशीर गेली असती, फोनवर बोलण्यात मजा आली असती. आता काॅलेज सुरू होईपर्यंत मनाची हुरहुर वाढत जाणार, अशी त्याच्या मनाची घालमेल होत होती. शेवटी जड अंतःकरणाने दोघेही घरी गेले.

घरी आल्यापासून मयूरचे मन कशातच लागेना. तो मीराला मेसेज करू लागला पण मीराचा मेसेज मात्र लगेच येत नसे. जेव्हा मयूरला बोलायचे असे तेव्हा मीरा तिच्या कामात व्यस्त असायची आणि तो जेव्हा कामात असायचा तेव्हा ती बोलायला यायची त्यामुळे त्यांच्या वेळेचे गणितच चुकायचे. अशातच एक एक दिवस जात होता.

अधून मधून बोलता बोलता एक दिवस अचानक मीराचा मेसेज यायचा बंद झाला. मयूरने बरेच मेसेज केले तरी तिचा काही रिप्लाय आला नाही. मयूर खूप नाराज झाला. कदाचित कामात असेल नंतर नक्की रिप्लाय देईल अशी त्याने मनाची समजून घालून घेतली.

बरेच दिवस झाले तरी मीराचा एकही मेसेज आला नव्हता की फोन आला नव्हता. आता मयूरला मात्र तिची काळजी वाटू लागली. मीराला काही झाले नसेल ना! काही अडचण तर नसेल ना! असे एक नाही अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू होते. काही केल्या त्याचे मन कामात लागत नव्हते. सतत मीराची काळजी त्याला सतावत होती. त्याने तिला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा फोनही लागत नव्हता.

एक दिवस मयूरने तिच्या घरी जायचे ठरवले. म्हणून तो गाडी घेऊन तिच्या घरी जाऊ लागली. मीराच्या घरी जातानाही त्याच्या मनात बरेच विचार घोळत होते. कोणी पाहिले तर, कोणाला शंका आली तर अशा अनेक प्रश्नांनी तो तिच्या घराजवळ गेला. त्याने बाहेरूनच पाहिले तर तिच्या घराला एक मोठे कुलूप होते. ते पाहून मयूरच्या मनात परत संवाद सुरू झाला. सगळं ठिक असेल ना! हे सगळे अचानक कोठे गेले असतील? मीरा तर काहीच बोलली नाही, मग काय झाले असेल? इथे कोणाला काही विचारू का? असे मनात म्हणतच तो समोरील एका पानपट्टीवर गेला. तिथे जाऊन मयूर थांबला.

"काय ओ भाऊ, एक मसाला पान बनवू काय?" पानपट्टी वरील ती व्यक्ती म्हणाली.

"एक बनवा भाऊ, पण तंबाखू वगैरे काही घालू नका. प्लेन बनवा." मयूर

"बरं. तुम्ही निर्व्यसनी दिसताय. कोणच्या गावचं तुम्ही?" ती व्यक्ती.

"होय. मी पलिकडच्या गावचा." इतकं बोलून मयूर शांत बसला. पान बनवून तयार झाल्यावर त्या व्यक्तीने मयूरला पान दिले. पान हातात घेऊन मयूर बराच वेळ उभा राहिला. त्या व्यक्तीशी इकडचे तिकडचे बरेच काही बोलू लागला. बोलता बोलता हळूच त्याने मूळ विषयाला हात घातला.

"भाऊ, त्या समोरच्या घरातील सगळे जण कोठे देवाला गेले आहेत काय?" मयूर

"कोणत्या भाऊ? ते मोठं अंगण असलेल्या काय?" ती व्यक्ती

"हो हो, त्याच घरातले." मयूर

"भाऊ, त्या घरातले सगळे जण पुण्याला गेलेत की." ती व्यक्ती

"काही कार्यक्रम आहे का?" मयूर

"कार्यक्रम काही नाही ओ, त्यांचा मुलगा तेथे असतो ना! त्याच्याजवळ गेलेत." ती व्यक्ती

"मग कधीपर्यंत येतील? तुम्हाला काही माहित आहे का?" मयूर

"अहो भाऊ, ते सगळे कायमचेच गेले आहेत. कधीही परत न येण्यासाठी." हे वाक्य त्या व्यक्तीच्या तोंडून ऐकताच मयूरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला बराच वेळ काहीच समजेना. त्याच्या हातातील पान गळून जमिनीवर पडला आणि तो तिथे टेकून उभा राहिला. त्याची तशी झालेली स्थिती पाहून त्या व्यक्तीला काही समजेना. तो मयूरला हाका मारत होता पण मयूर काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

आता मीरा आणि मयूर कसे एकत्र येतील? ते एकमेकांना भेटतील का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

🎭 Series Post

View all