वादळवाट 11

Mayur Meera chi premkahani Marathi katha

गणपतीपुळेच्या ट्रीपमध्ये सगळे समुद्राच्या पाण्यात मनसोक्त खेळत असतानाच मीराचा तोल जाऊन ती पाण्यात पडली आणि समुद्राच्या लाटेसोबत आत वाहत जाऊ लागली. ते पाहून मयूरने मागचा पुढचा काहीच विचार न करता पाण्यात गेला आणि तिला शोधू लागला. सगळे नको म्हणत असतानाही त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मीराला वाचवण्यासाठी गेला. तो गेल्यावर प्रत्येक जण जीवाच्या आकांताने हाक मारू लागले पण त्यांची ती हाक मात्र त्याला ऐकू जात नव्हती. मयूरला फक्त आणि फक्त मीरा दिसत होती.

मयूर गावाकडील असल्याने त्याला खूप चांगल्या प्रकारे पोहता येत होते. तसा तो पोहण्यात तरबेज होता. पण त्याला फक्त नदी आणि विहिरीचीच माहिती होती, समुद्रात त्याने पहिल्यांदाच उडी घेतली होती. पहिल्यांदा त्याला समुद्राच्या पाण्याचा अंदाजच आला नाही पण मीराच्या प्रेमामुळे तो तिच्याकडे ओढला गेला. पुढे तो व्यवस्थित पोहू लागला. त्याला फक्त एकच दिसत होते की काहीही झाले तरी मीरा वाचली पाहिजे. तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करू लागला. तिला वाचवण्यासाठी धडपडू लागला. बाकीचे मित्र सुध्दा तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते.

अखेर मयूरच्या प्रयत्नांना यश आलेच. त्याला मीरा सापडली. ती बेशुद्ध पडली होती. खरंतर पाण्याचे ते अफाट रूप पाहूनच तिला भीती वाटू लागली आणि त्या भीतीनेच ती बेशुद्ध झाली होती. मयूर तिच्याजवळ गेला आणि तिला अलगद उचलून घेऊन तो समुद्र किनाऱ्यावर आला. इकडे सगळेच त्यांची वाट पाहत होते. मयूरने मीराला हळूच जमिनीवर झोपवले, मग तिच्या एका मैत्रिणीने येऊन तिच्या पोटावर दाब देऊन पोटातील पाणी काढले. तरीही मीराला शुध्द आली नाही, म्हणून मीराला घेऊन दवाखान्यात गेले. तेथे डाॅक्टरांनी एक इंजेक्शन दिल्यावर मीरा शुध्दीवर आली. तिने पाहिले तर समोर मित्रमंडळी होते. पण त्या गराड्यात तिला मयूर दिसला नाही. ती इकडे तिकडे मयूरला शोधू लागली.

"अरे, ही शुध्दीवर आली." एकजण ओरडताच मयूर धावतच तिथे आला आणि मीराकडे एकटक पाहू लागला. त्याचे डोळे भरून आले होते. ते मीराच्या नजरेतून सुटले नाही. त्या क्षणी त्या दोघांना खूप काही बोलायचे होते पण सगळ्यांच्या पुढे त्यांना बोलता आले नाही. ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून जणू नजरेतूनच बोलत होते. त्या नजरेत प्रेम, आपुलकी जणू ओथंबून वाहत होती. बराच वेळ सगळे तिथेच उभे होते.

"मीरा, मयूरने तुला वाचवलं. तो होता म्हणूनच तू वाचलीस. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. तसे सगळे जण तुला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते पण मयूर मात्र वेड्यासारखा तुला वाचवण्यासाठी धडपडत होता, ते पाहून आम्हाला खूपच नवल वाटले." हे मैत्रीणीच्या तोंडून ऐकताच मीराने मयूरकडे पाहिले तर मयूरच्या डोळ्यात तिला प्रेमभावना दिसून आल्या. ते पाहून ती मनोमन सुखावली.

आता मीरा व्यवस्थित होती. डाॅक्टरांच्या सांगण्यावरून ती पुन्हा सगळ्यांमध्ये जाॅईन झाली, पण यावेळी मात्र ते सगळे पाण्यात न जाता रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ लागले. मीरा फ्रेश होऊन बाहेरच्या बागेत जाऊन उभी राहिली तर तिथे तिला मयूर एका बाकड्यावर बसलेला दिसला. ते पाहून ती त्याच्या जवळ जाऊन बसली. तिला पाहून मयूरने एक हलकीशी स्माईल दिली, मीरा सुध्दा गालातच हसली. बराच वेळ दोघेही शांत होते. मग मीरानेच बोलायला सुरुवात केली.

"तू मला वाचवण्यासाठी पाण्यात का उतरलास?" मीरा

"तू बुडत होतीस ते मी पाहतच बसायचं का? आणि मी एकटाच नाही तर बरेच जण तुला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते." मयूर

"पण तू जीवाच्या आकांताने खूपच धडपडत होतास." मीरा

"तसे काही नाही." मयूर

"मग कसे?" मीरा

"तू उगीच काहीतरी विचारत बसतीस. मला वाटलं ते मी केलो आता पुन्हा पुन्हा तोच प्रश्न नको ना विचारू, कारण त्याच उत्तर माझ्याकडे नाही." मयूर

"त्याचं उत्तर नक्कीच तुझ्याकडे आहे, पण तुला ते सांगायचं नाही." मीरा

"नाही म्हटलय ना!" मयूर मीराच्या दंडाला पकडून म्हणाला.

"तू खोटं बोलतोयस." मीरा

"तुला नक्की काय ऐकायचं आहे?" मयूर

"जे तुला सांगायचं आहे ते." मीरा

"मला काहीच सांगायचे नाही." मयूर

"तुझ्या मनाला विचार." मीराचे हे बोलणे ऐकून मयूर एकदम शांत झाला. तो काही बोलणार इतक्यात त्यांचे काही मित्र मैत्रिणी तिथे आले. ते पाहून तो शांत बसला.

"कशी आहेस मीरा? मया इथे का बसलाय? आम्ही बसलो तर चालेल ना!" एक मित्र

"अरे, असे काय बोलताय? बसा ना! मी ठिक आहे आता." मीरा

सगळे बराच वेळ गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने सर्वांनी जेवण करून झोपी गेले. सगळेच खूप दमले असल्यामुळे जास्त जागरण करत कुणीच बसले नाही. सकाळी परत लवकर उठून आवरायचे असल्याने सगळे लवकर झोपी गेले.

सकाळी लवकरच उठून सर्वांनी आपापले आवरले. सगळ्यांचे आवरून झाल्यावर पुन्हा एकदा त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि आपल्या मार्गस्थ रवाना झाले. थोड्या वेळाने चहा नाश्ता करण्यासाठी गाडी थांबवली. चहा नाश्ता झाल्यावर गाडी सुरू झाली ते चिपळूणलाच जाऊन थांबली. तिथे गेल्यावर सर्वजण जेवण करून सावित्री नदी पहायला गेले. तेथील नजारा मनमोहक होता. तेथे बोटींगची वगैरे सारं काही होतं, पण मीरा आधीचं घाबरली असल्याने ती काही पाहण्यासाठी गेली नाही. ती बाहेरच बसून राहिली. मीरा नाही म्हटल्यावर मयूर कसा जाईल? ते दोघेही बाहेर बसून राहिले.

"तू का थांबलास? तू जा ना!" मीरा

"तू पण चल." मयूर

"मी नाही बाबा, मला खूप भीती वाटतेय." मीरा

"अगं, घाबरायचं काय आहे त्यात? मी आहे ना सोबत, चल तुला काही होणार नाही." मयूर

"नको रे प्लीज. परत काहीतरी घडले तर, माझा पाय परत घसरला तर. नको रे मला भीती वाटते." मीरा

"अगं, एकदा झालं तर पुन्हा होईल असे काही नसते ग. तू आधी मनातील भीती काढून टाक. मग बघ तू स्वतः बोटींगमध्ये बसशील." मयूर

"नको रे, तू जा ना! तू का थांबलायस?" मीरा

"तू नाहीस तर मी सुद्धा नाही जाणार." मयूर

"पण का?" मीरा

"कारण तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस." मयूर

"आता तुला जे बोलावत आहेत ते सुध्दा तुझे खूप चांगले मित्र मैत्रिणी आहेत ना! मग त्यांच्यासाठी जा." मीरा

"नाही. " मयूर

"का? मी काही खास आहे का?" मीरा

"हो. खूप खास." मयूर बोलण्याच्या ओघात बोलून गेला.

"म्हणजे?" मीरा

"काही नाही ग, असंच." मयूर

"मनातील भावना नेहमी बोलून मोकळे व्हावे. नाहीतर मनाला चिंता लागून राहते. जे होईल ते होईल, पण मनातील भाव ओठावर यायला हवेत. बोल तुझ्या मनात जी तगमग चालू आहे ती बाहेर काढ." मीरा मयूरला बोलत करण्यासाठी प्रयत्न करत होती.

"हो. पण तसे काही नाही ग." मयूर

मयूर त्याच्या मनात मीराबद्दल जे प्रेम आहे ते व्यक्त करेल का? तो व्यक्त झाला तरी मीरा होकार देईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

🎭 Series Post

View all