Jan 26, 2022
प्रेम

वादळवाट 10

Read Later
वादळवाट 10

गणपतीपुळेला गेल्यावर सगळे रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ लागले. फ्रेश झाल्यावर सगळे लगेच गणरायाच्या दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी बरीच गर्दी जमली असल्यामुळे सगळे जण एका रांगेत उभे राहून हळूहळू दर्शनाचा लाभ घेत होते. मुले मुली मिळून एकाच रांगेत उभे असल्याने मयूर आणि मीरा एकापाठोपाठ रांगेत उभे होते ते सुध्दा योगायोगानेच. मयूर मात्र खूप आनंदात होता. त्याला जोडीने गणरायाचे दर्शन घ्यायचे होते तसेच नवस देखील करायचा होता. नारळ, हार, दुर्वा वगैरे साहित्य घेऊन तो उभा होता. रांग बरीच मोठी असल्याने सगळे गप्पा मारत उभे होते. थोड्या वेळाने यांचा नंबर आला तसे दोघेही एकदम आत गेले. पुजेचे साहित्य देऊन मनःपूर्वक नमस्कार केला. अगदी जोडीने डोके टेकल्याप्रमाणे नमस्कार करत होते. पाहणाऱ्याला जणू नवीन जोडपे असल्याप्रमाणे भासत होते. गणरायाच्या दर्शनाने सर्वांचे मन प्रसन्न झाले होते. जणू या दर्शनाने संसाराच्या रहाटगाडग्यातून जाताना त्रासलेल्या मनाला एक नवी उमेद मिळाली. एका नव्या उर्जेने मयूर मंदिरातून बाहेर पडला. परिस्थितीशी दोन हात करून लढण्यासाठी तो नव्या जोमाने सज्ज झाला.

गणरायाचे दर्शन घेऊन सगळे बाहेर आले. समोर खळखळता निळाशार समुद्र दिसत होता. सगळे समुद्र किनाऱ्यावर जाऊन उभा राहिले. एवढा मोठा समुद्र मयूरने पहिल्यांदाच पाहिला होता. गावाकडे नदीकिनाऱ्यावर तासन् तास तो बसून राहायचा पण एवढ्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यावर तो पहिल्यांदाच उभा होता. तो खळखळणारा समुद्र पाहून त्याचे मन शांत झाले. आजूबाजूला प्रचंड गर्दी होती पण त्या विशाल समुद्रापुढे त्याला आजूबाजूचे काही दिसलेच नाही. तो निर्विकार होऊन एकटक समुद्राकडे पाहत उभा राहिला. त्याचे मित्र आजूबाजूला पळत होते, काही फिरत होते, काही त्या पाण्यामध्ये जाऊन आनंद लुटत होते पण मयूर मात्र तसाच किनाऱ्यावर उभा होता.

"असा एकटाच काय उभा आहेस?" मीरा

"बघ ना! इतका अथांग खोल समुद्र, त्याच्यामध्ये इतके विशाल सामर्थ्य असते, पण त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. निसर्गाची किमया कशी आहे ना?" मयूर

"हं." मीरा

"आयुष्याचेही तसेच आहे, माणूस किती मोठा आहे त्यापेक्षा तो किती उपयोगी पडतो याला जास्त महत्त्व आहे." मयूर

"ते कसे काय?" मीरा

"बघ ना, नदीपेक्षा समुद्र मोठा पण सगळे नदीचे पाणी पिण्यासाठी त्याच्यापुढे झुकतात. समुद्र इतका विशाल असूनही त्याचे पाणी पीता येत नाही तसेच माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो दानशूर हवा, उदार हवा, त्याचा पैसा सत्कारणी लागावा. तरचं त्याच्या पैशाची योग्य किंमत होईल, नाहीतर इतके मिळवून काडीमोलच होणार." मयूरने मीराला सविस्तर सांगितले.

"छोट्या छोट्या गोष्टीतून किती अर्थ काढतोस रे तू. खरंच तुझा हाच स्वभाव मला खूप भावतो. म्हणूनच मी तुझ्या..." इतकं बोलून मीरा शांत बसली.

"मी तुझ्या काय? बोल ना पुढे." मयूर

"काही नाही." मीरा

"सांग ना!" मयूर

"मी तुझ्या मैत्रीच्या धाग्यात गुंफली आहे." मीराने काहीतरी बोलून विषय संपवला. पण या बोलण्याने मयूरचे समाधान झाले नाही. तो तसाच एकटक तिच्याकडे पाहत राहिला. बराच वेळ बोलून झाल्यानंतर मीराने मयूरचा हात हातात घेतला आणि ती त्याला घेऊन त्या गर्दीपासून खूप दूर गेली. तिथे कोणीही नव्हते अशा एकांतात ते दोघेही जाऊन बसले. रम्य अशा निसर्गाच्या सान्निध्यात फक्त ते दोघेच एकमेकांचा हात हातात घेऊन डोक्याला डोके लावून बसले होते. त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते ते दोघे एकटक समुद्राकडे पाहत बसले होते.

"मीरा, हा समुद्र अगदी तुझ्यासारखाच खूप सुंदर आहे." मयूर

"अजिबात नाही, हा समुद्र तुझ्या विशाल हृदयाप्रमाणे आहे. ज्यामध्ये खूप काही सामावून घेण्याचे सामर्थ्य आहे." मीरा

"नाही ग. माझे हृदय कुठे विशाल आहे? उगीच मला मोठं बनवू नकोस." मयूर

"अरे खरंच, तू खूप चांगला मुलगा आहेस." मीरा मयूरचे कौतुक करत होती.

"आमच्या शेतात हरभऱ्याची झाडे लावली नाहीत." मयूर

"म्हणजे? मला काही समजले नाही." मीरा

"अगं, तू इतके कौतुक करत आहेस. मग मला हरभऱ्याच्या झाडावर चढायला नको का?" मयूर हसतच म्हणाला. ते पाहून मीरा थोडीशी नाराज होऊन बाजूला झाली.

"अगं वेडे, मी तुझी मस्करी करतोय. साॅरी." मयूरने असे म्हटल्यावर मीराने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि ती गालातच हसली.

"पण मी खरंच बोलतेय." मीरा

"बरं, ठिक आहे. झालं समाधान की आता इतक्या रम्य ठिकाणी येऊन भांडत बसायचं." मयूर

"नाही रे, मी फक्त माझ्या मनातलं बोलतेय." मीरा आणि मयूरच्या गप्पा सुरू असतानाच एक थंड वाऱ्याची एक झुळूक आली आणि दोघेही एकदम शहारून गेले.

त्यांचे मित्र जे समुद्राच्या पाण्यात खेळत होते ते त्यांचा शोध घेत त्यांच्याजवळ येऊन पोहोचले. त्या मित्रांना बघून मीरा आणि मयूर गोंधळून गेले. त्यांना काय करावे नि काय बोलावे तेच समजेना. ते दोघे फक्त एकमेकांकडे पाहू लागले तसेच त्या मित्रांकडेही एकटक पाहू लागले.

"अरे, तुम्ही दोघे इकडे आहात होय. आम्ही तुम्हाला सगळीकडे शोधलो पण कुठे दिसलाच नाही. फायनली तुम्ही सापडलात." एक मित्र

"अरे, ते म्हणजे ते असे की..." मयूर चाचरत बोलू लागला. त्याला काय बोलावे तेच कळेना.

"अरे मया, जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल आणि चला बघू दोघेही तिकडे. आम्ही पाण्यात किती छान खेळतोय. खेळायचे सोडून तुम्ही इकडे बसलाय. अरे, गप्पा काय गावाकडे पण मारता येतात, समुद्र काही तिकडे मिळणार नाही. चला बघू सगळे मस्त पाण्यात डुबकी घेऊयात." दुसरा मित्र

"ठिक आहे, चला." असे म्हणून सगळेजण तेथून निघून समुद्राकडे जाऊ लागले. एकापाठोपाठ एक पळत पाण्यात उड्या मारू लागले. सगळे पाण्यात डुबकी घेण्यात दंग होते, एकमेकांवर पाण्याचे शिंतोडे मारत होते, थोडेजण पाण्यात पोहत होते, तर काहीजण बाजूला उभे होते. खरंतर त्या निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येकजण आनंदीत होता. कुणालाच कशाचीच फिकीर नव्हती ना कशाची चिंता नव्हती. सगळे एका आनंदाच्या डोहात बुडाले होते, त्यांचे मन प्रसन्न झाले होते. जणू तो काळ काही क्षणासाठी तसाच स्तब्ध रहावा, पुढे सरकू नये असे प्रत्येकालाच वाटत होते.

प्रत्येकजण आपापल्या धुंदीत असतानाच मीराचा तोल अचानक गेला आणि ती पाण्यात पडली. समुद्राच्या लाटेसोबत ती आत जाऊ लागली. प्रत्येकजण तिला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते, पण लाटेचा प्रवाह इतका प्रचंड होता त्यात वाऱ्याचा वेग खूप असल्याने कितीही प्रयत्न केला तरी तो व्यर्थ जात होता. ते पाहून मयूरने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. त्याच्या मित्रांनी त्याला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याने काहीही ऐकून न घेता फक्त मीरासाठी पाण्यात उडी मारली.

मयूर आणि मीरा या संकटातून वाचतील का? की कोणी एक वाचेल? पुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..