वड- वटसावित्री

तेवढ्यात निशा तेथे आली. तिने छान काठापदराचे साडी घातली होती. केसांचा जुडा पाडून त्यावर गजरा लावला होता. नाकामध्ये मोत्यांची नथ घातली होती. महाराष्ट्रीयन वेशा मध्ये ती खूप सुंदर दिसत होती,


      वड

सई आणि रमाची लवकरच चांगली मैत्री झाली. रमा लग्न होऊन पतीसोबत नोकरीच्या गावी आली. सईचे पती पण त्याच्या ऑफिसला कामाला असल्यामुळे त्या दोघांची पण छान मैत्री होती. तेथूनच सई आणि रमा ची ओळख झाली.

ऑफिस च्या मैत्रीमुळे कुटुंबात पण छान एकोपा निर्माण झाला. दोन्ही कुटुंब कधी सहलीचा बेत करायचे तर कधी नाटक बघायला जायचे. एखादा रविवार सई कडे जेवनाचा बेत असायचा. तर कधी रमा कडे मस्त भज्जांची ची पार्टी व्हायची.

   दोन्ही कुटुंबांनी ठरवून मग एकत्रच प्लॉट घेऊन त्यावर दोन घरे बांधली. रमाला झाडांची खूप आवड होती.सई पण त्यांना बागकामात मदत करायची. दोघींनी मिळून खूप सारी झाडे लावली होती. घर जरी दोन असली तरी, अंगणाचा परिसर एकाच भिंतीमध्ये बंद होता. मधली भिंत घालण्याची कधी गरजच पडली नाही. तेथेही त्यांनी अनेक प्रकारच्या झाडांची लावगड केली होती. बघता बघता ती छोटी झाडं आता डेरेदार वृक्ष झाली होती. झाडां सोबतच घरातील मुलं बाळ आता मोठी होऊन नोकरीसाठी निघून गेले होते.

     एकदा बाजारातून येताना सई आणि तिच्या पतीच्या मोटर सायकल समोर एक कुत्रा आला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे मोटर सायकल वरील नियंत्रण सुटले ते दोघेही जोरदार रस्त्यावर पडले.सई ला जरा कमी मार लागला परंतु तिच्या पतींना भरपूर मार लागला. त्यांचा पायाला दुखापत झाली होती. छातीला पण बराच मार लागला. ते साधारण एखादा महिना दवाखान्यात होते. रमा आणि तिच्या पतीने त्यांना खूप मदत केली. परंतु छातीतील मार वाढत जाऊन त्यामध्ये पाणी झाले. नंतर उपचारासाठी त्यांचा मुलगा त्यांना आपल्या सोबत शहरात घेऊन गेला. नंतर त्याने त्यांना घरी पाठवलेच नाही आणि ते घर विक्रीस काढले.

    सई आणि तिचे पती शहरात गेल्यामुळे रमाला खूप एकटे एकटे वाटत होते. आता त्या झाडां सोबतच आपला वेळ घालवत होत्या त्यांच्यासोबतच हितगुज करत होत्या. झाडावर येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. संध्याकाळी ते दोघे बाहेर झाडांखाली बसूनच चहा घेत होते.

 सई चे घर खरेदी करण्यासाठी बरेच जण येऊन बघून जायचे, नंतर एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याने ते घर खरेदी केले. त्याचे नाव जय असल्याचे सईच्या मुलाने रमा ला सांगितले होते. त्याच्या पत्नीचे नाव निशा होते.निशा आणि जय यांनी रमा आणि त्यांच्या पतीसोबत ओळख केली.त्यांना काका काकू म्हणू लागले. इथे राहायला यायच्या आधी काही काम करायचे आहे असे तिने रमा काकूंना सांगितले.

 घरातील काम आणि रंग देऊन छान नवीनच करण्यात आले. घराचा काही प्रश्न नव्हता पण अंगणामध्ये दोन घरांच्या मध्ये कुंपण किंवा भिंत नसल्यामुळे त्यांनी त्या जागेची मोजणी केली, आणि तिथे निशान तयार करून ठेवले. बघता बघता अंगणातील छोटी फुलझाड त्यांनी पूर्ण काढून टाकले आणि दोन घरांच्या मध्ये भिंत घालण्यासाठी मध्ये येणारी मोठी झाडं पण कापण्याचे ठरवले. रमा काकूंना ते झाड कापणार म्हणून खूप वाईट वाटत होते. सई आणि त्यांनी किती प्रेमाने त्या झाडाचे संगोपन केले होते. त्या झाडांनी त्यांना छान फुलं दिली होती. तर काही झाडांनी फळ पण दिलेले होते. रमा काकूंचे त्या झाडांवर खूप प्रेम होते. पण आता काही इलाज नव्हता. ते आता निशा आणि जय च्या मालकीचे होते. रमा काकूंनी त्यांना खूप समजावून सांगितले .झाडांचे, निसर्गाचे, महत्त्व सांगितले. पण त्याचा काहीएक फायदा झाला नाही. जय ने अंगणातील छोट्या झाडांच्या जागी फरशी लावली. काही मोठी झाडे काढून दोन घरांच्या मध्ये उंच अशी भिंत घालण्यात आली. निशा आणि जय चे घर खूप सुंदर झाले होते, पण तिथे एकही झाड किंवा फुल झाड शिल्लक नव्हते. निशा नवीन मुलगी असली तरी तिला पूजेची, सण वार करण्याची आवड होती शेजारी राहत असल्यामुळे रमाकाकू कडे त्यांचे येणे-जाणे असायचे. रोज सकाळी ती रमाकाकू कडे येऊन पूजेसाठी फुलं घेऊन जायची. कधी कधी तर गरजेपेक्षा जास्त फुल घेऊन जायची. तर कधी न उमललेल्या कळ्या पण काढून घ्यायची. रमाकाकू तिला बऱ्याचदा प्रेमाने समजावून सांगायच्या अग झाडांना असं ओरबाडून घेण ठीक नाही. उद्या याच कळ्यांची फुले झाली असती. काकू झाडांना खुप जपायचा एक-दोन फुला व्यतिरिक्त त्या कधी फुलं काढत नसत. झाडांवर मस्त डोलणारी फुलं बघून त्यांना प्रसन्ना वाटायचं.

  आपल्या बर्याच सणांचा संबध झाडनिगडित आहे. सणाला लागणारे पान त्यांना अंगणातूनच मिळत. पोळ्याला लागणारा पळस. गणपती साठी लागणाऱ्या दूर्वा बऱ्याच महिला रमाकाकू कडून नेत असत. शिवाय तोरणा साठी लागणारे आंब्याची पानं घेण्यासाठी बरेच जण रमा काकूंकडे यायचे.त्याही त्यांना गरजेपुरत्या फांद्या काढून द्यायच्या. आंब्याचे झाड खूप मोठी असल्यामुळे काही फांद्या काढल्या तर एवढा फरक पडत नव्हता. पण छोट्या झाडांची फांद्या तोडून नासधूस करणे रमाकाकूंना आवडायचे नाही. मग ते देवाधर्माचे काम काय असे ना. काकू त्यांना स्पष्ट नकार द्यायचा.

    आज वटसावित्री पोर्णिमा होती. काकू सकाळीच उठून आंघोळ वगैरे आटपून तयार होत्या. पूजेचा ताट पण तयार होता. पण नेहमी सारखा उत्साह त्यांना वाटत नव्हता, कारण त्यांची मैत्रीण सई पण इथे नव्हती. अनेक वर्ष दोघींनी ज्या वडाची पूजा केली. त्याला लहानाचे मोठे केले. तो वड पण आज अंगणात नव्हता. सुरुवातीचे पाच सहा वर्ष त्या छोट्या रोपाचे संरक्षण त्यांनी कुंडीत केले होते. नंतर त्याला परसबागेत लावले होते.बघता बघता केवढा मोठा झाला होता तो. कितीतरी पक्षांना निवारा दिला होता त्याने. दिवसभर पक्षांची किलबिलाट सुरू असायची. जुन्या दिवसांच्या गोड आठवणी रमाकाकू रमून गेल्या होत्या. तेवढ्यात निशा तेथे आली. तिने छान काठापदराचे साडी घातली होती. केसांचा जुडा पाडून त्यावर गजरा लावला होता. नाकामध्ये मोत्यांची नथ घातली होती. महाराष्ट्रीयन वेशा मध्ये ती खूप सुंदर दिसत होती, तिने येऊन काकूंना नमस्कार केला. तशा रमाकाकू जुन्या आठवणीतून बाहेर आल्या. नमस्कारासाठी वाकलेल्या निशाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवून आशीर्वाद दिला.

  रमाकाकू तिला काहीशा नाराज वाटल्या. तिने काकूंना विचारले. काकू..‌.! तुम्ही पूजा नाही केली का? तेव्हा काकू म्हणाल्या नाही ग. तुम्ही भिंत घालताना अंगणातील ते वडाचे झाड तोडून टाकले.आज पर्यंत मी कुठे बाहेर गेले नव्हते. आज पण नाही गेले. पण तू कुठे पूजा केलीस? तेव्हा निशा म्हणाली. मी घरामध्ये साड्यांनी छान सजावट केली. तेथे एक कुंडी ठेवून, त्यामध्ये फांदी ठेवून त्याची पूजा केली.

 जय ने सकाळी आणून दिली मला फांदी. ते ऐकून रमा काकूंना खूप वाईट वाटले. त्या निशाला म्हणाल्या, अगं फांदीची पूजा करून आपल्याला आरोग्य लाभणार आहे का? निसर्गाचा सानिध्य लागणार आहे का? फांद्या तोडून आपण झाडांना नुकसान करतो आणि निसर्गाचा समतोल बिघडतो हे कसं कळत नाही ग तुम्हाला? मोठ्या शहरांमध्ये वटपौर्णिमेला लाखा मध्ये वडाच्या फांद्या तोडल्या जातात. हे तुला बरोबर वाटते का? घरात तर आपण नेहमीच एकटे असतो. पण सणाच्या निमित्ताने चार बायकांनी एकत्र येऊन आपल्या सुखदुःखांची देवाण-घेवाण करावी. आपल्या आरोग्यासाठी विश्रांतीचे चार क्षण निसर्गासोबत घालवावे असे नाही का वाटत तुला? असे काकू निशाला समजावून सांगत होत्या. तेवढ्या जय वडाचा रोपे घेऊन आला. आणि काकू ला म्हणाला. मी तुमचं बोलणं ऐकलं.तुम्ही अगदी खरं सांगताय काकू... भिंत घालताना वड तोडून केलेली चूक माझ्या लक्षात आली आहे. आणि आज सकाळी निशाला पूजेसाठी वडाची फांदी तोडली, तेव्हा त्या फांदी तील रस माझ्या हातावर पडला. ते पाहून मला असं वाटलं जणूकाही तो वड रडत आहे. याचा मला खूप पश्चाताप झाला. म्हणून मी रोप विक्रेत्याकडून हे वडाचे रोप घेऊन आलो. जयच्या आवाजाने आत गाणी ऐकत असणारे काका पण बाहेर आले. त्यांनी जय ला कुदळ दिली. खड्डा खोदण्यात मदत केली.माती काढण्यात मदतच केली. निशाने पाण्याची बादली आणली. आणि चौघांनी मिळून वडाचे रोप लावले.

    या कामात बराच वेळ निघून गेला तेव्हा निशा म्हणाली. अहो काकू…! बोलण्यामध्ये तुमची पूजा राहूनच गेली. तेव्हा रमाकाकू मंद हसत म्हणाल्या, अगं …! पूजा म्हणजे आटपायला एखादं काम नव्हे, तर मना पासून केलेलं प्रत्येक काम हे पूजे समानच असते.आज आपण नवीन वड लावला त्यामध्ये सर्व काही समाधान मिळालं. तो आपल्याला व आपल्या पिढ्यांना नक्कीच उत्तम आरोग्य देईल. जय आणि निशा ने यांच्या कडून झालेली चूक मान्य केली. आणि रमाकाकू,काका यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केले. यामध्ये दोन कुटुंबामधील नाते नव्याने बहरून आले. ते नाते नक्कीच दीर्घायुषी होईल. लावलेल्या त्या वडा सारखे.

    पुष्पा प्रमोद.