Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

वाचनातून लेखनाकडे

Read Later
वाचनातून लेखनाकडे


स्पर्धा : गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय : वाचाल तर वाचाल

शीर्षक : वाचनातून लेखनाकडे
मी सहावीत शिकत असताना आमच्या वर्गातल्या कपाटात काही पुस्तके मला काही पुस्तके दिसली. त्यातल्या एका पुस्तकावर मला पऱ्यांचे चित्र दिसले. म्हणून मी ते पुस्तक हातात घेऊन चाळू लागले. मला ते पुस्तक खूप आवडले. मग मी ते पुस्तक घरी घेऊन आले. अवांतर वाचनातले "पऱ्यांच्या राज्यात" हे माझे पहिले पुस्तक. आशा परुळेकर यांनी त्या पुस्तकाचे लेखन केले आहे. हे माझे खूप आवडते पुस्तक होते. मी दोनदा हे पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा वर्गातल्या कपाटात ठेवून दिले.

पुन्हा असच एखादं पुस्तक मिळतय का ते शोधू लागले. तेव्हा अचानक मला किशोर पुस्तकांचा गठ्ठा सापडला. जणू काही पुस्तकांचा खजानाच माझ्या हाती लागला होता. त्यात दिवाळी अंक होते. छान छान गोष्टी त्या पुस्तकांत होत्या. मी त्यातले एक एक पुस्तक घरी घेऊन जायचे आणि वाचून झाल्यावर पुन्हा तिथे ठेऊन द्यायचे. तेव्हापासून खऱ्या अर्थाने वाचन हा माझा छंद झाला. 

मी नववीत असताना मला कवितेच्या काही ओळी सुचल्या. मी लगेच वहीत लिहून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मी त्या ओळींना यमक देत छान कविता "क्षणभर विश्रांती" लिहिली आणि टीचरांना दाखवायला घेऊन गेले. त्यांनी माझे खूप कौतुक केले. दहावीच्या वर्गात जाऊन त्यांनी माझी कविता वाचून दाखवली. मला माझेच खूप कौतुक वाटू लागले. 

मला असं वाटलं की आपण पुन्हा एखादी कविता लिहावी आणि टीचरांना नेऊन दाखवावी. मी वही, पेन घेतला आणि विचार करू लागले. पण मला काहीच सुचेना. तेव्हा माझ्या लक्षात आले की कविता ही शब्दांत नाही तर भावनांत असते. मी जेव्हा पहिली कविता लिहिली होती तेव्हा माझ्या मनात अनेक भावना होत्या. मला मोठे होऊन काय झालं पाहिजे हे विचार सुरू होते. म्हणून त्या भावनांतून "क्षणभर विश्रांती" ह्या कवितेने जन्म घेतला. मी कॉलेजला गेल्यानंतर मी "कॉलेज" ही कविता लिहिली. तेव्हा तर माझ्या मैत्रिणींना खात्रीच पटली नाही की ही कविता मी लिहिली आहे. 

कॉलेजला गेल्यानंतर मला कादंबऱ्या वाचायचं वेडच लागलं होतं. 

मला फोन वर कुणीतरी पुस्तकांची पी. डी. एफ. पाठवली. मग मी त्यातली पुस्तके वाचू लागले. तसेच काही ब्लॉगिंग ची ॲप्स मी फोन मधे इंस्टॉल केले. त्यातल्या कथा आणि कथा मालिका मी वाचू लागले. त्याच त्याच व्यासपीठांवर मी माझ्या कविता शेअर करू लागले. मला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

एक दिवस मला सहज एक कथा सुचली. वाटलं लागेलच लिहावी. पण थोडी भीतीही वाटली. मला असं वाटलं की आपण अजून इतके प्रगल्भ नाही. पण तरीही मी कथा लिहायला सुरुवात केली. मला कथा सुचली तर होती पण लिहितांना शब्द सुचत नव्हते. मग मी आणखी वाचन करू लागले. बऱ्याच अवधी नंतर माझी कथा लिहून झाली. ती लिहून झाल्यावर मी सोशल मीडियावर पोस्ट केली. माझी कथा मोठ्या मोठ्या लेखकांनी वाचली आणि समिक्षाही केल्या. ह्या गोष्टीचे मला खूप समाधान वाटले. तेव्हापासून मी अनेक कथा लिहिल्या. आणि अजूनही लिहत आहे आणि लिहत राहील.

पण तरीही भविष्यात एक मोठी लेखिका होण्यापेक्षा मला चांगली वाचक व्हायला आवडेल. 


*** लेखन :- कोमल पाटील 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Komal Patil "कृषीकन्या"

कृषी कन्या?

//