वाचन का महत्वाचे आहे....

Vachan

मागच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे, अशी तक्रार सर्वच ठिकाणी आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण , टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गोष्टींमुळे आपल्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनासा झाला आहे.

अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्याघडीला जगातील कानाकोपर्याात घडणार्या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्यापिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते ज्ञान वाढवत असत. 

अलीकडे हा वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावा लागणारा अभ्यास, या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्य आणि पालक दोघेही अडकले आहेत त्यातून वेळ काढून  निरपेक्ष, निखळ आनंद देणारे वाचन करण्यास त्यांना फुरसतच मिळत नाही.

    वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, सृजनशीलतेला वाट सापडते, , दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव, त्यास आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. 

 इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. माता, पिता, शेजारी, समाज आणि राष्ट्रापर्यंत आपलीकही बांधिलकी आहे याची जाणीव जागृत राहते.

वाचनामूळे मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.


नमस्कार.   सौ सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )