"माई गिरीश येतोय ग...अगदी उद्याच".. हातातलं पत्र नाचवत गीता माईंच्या घरात आली. ते पत्र पुन्हा एकदा वाचून तिने आनंदाने गोल गिरकी घेतली. "अग बाई खरचं की काय"... डोळे पुसत माई म्हणाल्या. "जा देवापुढे साखर ठेव आधी आणि पटकन आण्णांना बोलावून घेऊन ये. समान आणायला हवे ना जास्तीचे. वाण्याकडे जाऊन चिठ्ठी देऊन या म्हणावं. तो देईल घरपोच आणून".
"माई हे काय आण्णा आलेच बघ. बरं..माई मी जाऊन येईन वाण्याकडे. पटकन मला चिठ्ठी दे आणि हो आण्णा पैसै ही काढून ठेवा वर".असे म्हणत गीता पळतच आपल्या घरी गेली.
तसे आण्णा माईंना म्हणाले "काय वेडी पोर आहे ही! गिरीश येणार म्हणून किती उत्साह आला आहे तिला. ते ही बरोबरच आहे म्हणा. गिरीश परदेशी जाऊन सात वर्षे झाली. आज येतो, उद्या येतो म्हणून तो काय आलाच नाही इतकी वर्षे.
त्याच्या माघारी गीतानेच पाहिलं सार आपलं. लहानपणी भातुकली खेळताना हट्ट धरून बसायची "गिलिषच माझा 'नवला' होणार म्हणून". आण्णा गीताची नक्कल करत म्हणाले.
"अजून ही गिरीश सोबत लग्न करायचे म्हणून लग्नच केले नाही हिने.. म्हणे मला वचन दिलंय गिरीश ने लग्नाचं".
गीता माई आणि आण्णांच्या संस्कारात वाढली. गीताची आई गेल्यानंतर माईंनी लहानग्या गीताला आधार दिला, आईचे प्रेम आणि माया दिली. काहीही झालं तरी माईंजवळ मन मोकळं केल्याशिवाय गीता ला चैनच पडायचे नाही. गिरीश ही तिच्याच वयाचा. दोघांची इतकी गट्टी जमली की एकमेकांचे एकमेकांशिवाय पान हलेना.
"अहों उद्या गिरीश आल्यानंतर वेळ बघून त्याच्याशी दोघांच्या लग्नाविषयी बोला". माई आठवणीतून जाग्या होत आण्णांना म्हणाल्या.
गिरीश आला. त्याच्या स्वागताला सारी चाळ हजर होती. परदेशी जाऊन नोकरी करणारा चाळीतला तो एकमेव व्यक्ती होता. त्यामुळे सर्वांना त्याचं भारी कौतुक होत.
गिरीश सर्वांच्या पाया पडत म्हणला..."माई आणि आण्णा ही तुमची सून देविका"..तशी गिरीश च्या मागून एक नाजुकशी मुलगी पुढे आली. माई आणि गीता दोघी एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या.
"गिरीश" .. "हे काय ऐकतोय मी"? आण्णा कितीतरी मोठ्याने गरजले.
"आण्णा आम्ही नुकतेच लग्न केले आहे. लग्नच इतक्या घाई- गडबडीत झाले की, तुम्हाला कळवायला ही वेळ मिळाला नाही आम्हाला. मग तुम्हाला 'सरप्राइज' देऊ म्हणून नंतर कळवले नाही". गिरीश बेफिकिरी ने म्हणाला. हे ऐकून माई मटकन खालीच बसल्या. त्यांना सावरायला गीता पुढे आली. गीताने त्यांना हाताशी धरून घरी आणले.
घरी येताच आण्णा माईंना म्हणाले, "आपल्या चिरंजीवांना सांगा.. या घराचे दरवाजे त्यांना बंद झालेत म्हणून. आलात तसा पाहुणचार घ्या आणि चालते व्हा म्हणावं. अरे लग्नासारख्या पवित्र संस्कारासाठी त्याने आपल्या आई -वडिलांना गृहीत धरलंय.. गीताकडे पाहात ते पुढे म्हणाले, आणि या पोरीचं काय? तिला वचन दिलं होतं ना याने! तुझ्याशी लग्न करेन म्हणून"!.. तेव्हा कुठे गिरीशचे लक्ष गीताकडे गेले.
ती पाणावलेल्या डोळ्यांनी गिरीशकडे पाहत होती. "लग्नाचं वचन वगैरे फारसं काही आठवत नाही मला ,पण माई.. गीता माझी चांगली मैत्रीण होती, आहे आणि यापुढे ही राहील.. बस्"
गिरीश गीताची नजर टाळत म्हणाला.
"वा...माई आपले चिरंजीव किती बदलले परदेशी जाऊन. तुम्हाला भारी कौतुक होत यांचं". झाला तेवढा तमाशा पुरे झाला म्हणावं.. चला चालू लागा आमच्या घरातून.
गिरीश रागा-रागाने निघून गेला. पण त्याला राहण्यासाठी घर नव्हते. परदेशातली त्याची नोकरी गेली असल्याने तो भारतात परत आला होता. हे माई -अण्णांना सांगायला त्याला वेळच मिळाला नव्हता.
काही दिवसातच गीताच्या वडिलांनी एक छानसे स्थळ पाहून गीताचे लग्न लावून दिले. पाणावलेल्या डोळ्यांनी माई आणि अण्णांनी भरभरून आशीर्वाद देत तिची पाठवणी केली.
एक दिवस माईंनी गिरीशला गडबडीने चाळीत येताना पाहिले. तसा माईंना आनंद झाला. "माझे लेकरू माफी मागायला आले वाटतं. आता झालं गेलं सारं विसरून जाऊ आणि सूनबाईंना ही इथे बोलवून घेऊया. म्हणावं नव्याने संसार सुरू करा आपल्या घरात. गीता ही रुळली आपल्या संसारात" . माई आपल्या मनाशी म्हणाल्या.
"माई आणि आण्णा तुम्ही निघायची तयारी सुरू करा." गिरीश सोफ्यावर हात - पाय पसरुन बसत म्हणाला. "विसरलोच होतो मी, हे घर माझ्याच 'नावावर' आहे ते". हे ऐकून माई आणि आण्णांना धक्काच बसला.
तसे आण्णा उसळून म्हणले.."घ्या चिरंजीव माफी मागायला आले आहे असं वाटलं. पण आम्हाला घराबाहेर काढायला निघालेत". गिरीश आणि आण्णा बराच वेळ वाद घालत राहिले.
माई अगतिकतेने म्हणाल्या "अरे कुठे जाणार आहे आम्ही या वयात? यापेक्षा सूनबाईंना घरी घेऊन ये, सारे एकत्रच राहू आपण. झालं गेलं गंगेला मिळालं.
"मला घराबाहेर काढताना कुठे विचार केला तुम्ही माई? नोकरी नाही, घर नाही अशा अवस्थेत किती दिवस फिरलो मी. मला वाटलं होतं तुम्ही लगेच एक्सेप्ट कराल माझे लग्न, पण तसं झालं नाही. उलट तुम्ही मला घराबाहेर काढलंत. तुमची तत्व आणि वचनं आड आली त्यावेळेस. त्या गीतासाठी मला नको -नको ते बोललात.
"इथून तुम्ही जा कुठेही ..आणि काहीही करा. माझा तुमच्याशी मुळीच संबंध नाही आता".
हे ऐकून अण्णा शांतपणे म्हणाले, "चूक आमचीच होती रे गिरीश. आम्ही आई -वडील म्हणून तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या. या वयात हे दिवस दाखवलेस.. एक बाप म्हणून थोडा रागावलो काय.. अन् तू आम्हाला घराबाहेरच काढलेस". एकुलता एक मुलगा म्हणून घर तुझ्या नावावर केले याचे चांगले पांग फेडलेस गिरीश.
"चला माई.. घ्या आवरायला". तशा माई पदराने डोळे पुसत आत गेल्या.
या घराने खूप काही अनुभवले होते. माई आणि आण्णांच्या उत्कट प्रेमाचे क्षण, गिरीशचा जन्म, त्याचे शिक्षण, गीता आणि गिरीशची निखळ मैत्री, आणखी बरंच काही..
माई आणि आण्णांनी आपल्या घराला मूकपणे नमस्कार केला अन् दोघे ही केवळ जरूरी पुरते सामान घेऊन घराबाहेर पडले.
इतक्यात गीता धावत -पळत आली. तुम्ही दोघे माझ्या घरी चला, म्हणून माई आणि आण्णांच्या हाता-पाया पडू लागली. माई गीताच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणाल्या.. "गिरीश ने तुझी आणि आमची ही फसवणूक केली. खूप केलेस तू आमच्यासाठी. आता आम्ही फक्त एक भार होऊ ग तुझ्यावर"..
असे म्हणत माई आणि आण्णांनी तिला स्पष्ट नकार दिला. इतक्यात गीताच्या नवऱ्याने पुढे होत आपले हात जोडत दोघांना विनंती केली, तुमच्या रूपाने मला आई - वडिलांचा सहवास लाभेल. किमान तुम्हाला दुसरे घर मिळेपर्यंत तरी आमच्या सोबत रहा.
नाईलाजाने आण्णा आणि माई गीताकडे आले. माईंना अजुन ही कुठेतरी आशा होती की गिरीश येऊन दोघांना घेऊन जाईल. 'मी चुकलो माई'.. म्हणत माझ्या कुशीत शिरेल.
घडल्या प्रकारानंतर माईंची तब्येत हळू हळू बिघडत चालली होती. नंतर अन्न- पाणी ही वर्ज्य केले त्यांनी. साऱ्यांनी समजावून पाहिले.. पण माई ही तितक्याच हट्टी होत्या. एक दिवस त्यांनी गीता ला बोलवून घेतले.. तिचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या .."गीता पोरीची माया दिलीस मला, भरभरून प्रेम दिलेस.. आणि काय मागू मी तुझ्याकडे! फक्त एक वचन देशील बाळा? मी गेल्यावर तुझ्या आण्णांना कधी अंतर देऊ नकोस..माझ्या माघारी त्यांना सांभाळून घेशील ना"?
"मी वचन देते माई.. पण तुम्ही असे बोलू नका हो. तुम्ही कुठे ही जाणार नाही आहात माई...गीता रडत - रडत माईंच्या कुशीत शिरत म्हणाली.
'माई काय होतंय तुम्हाला'? माई....?
माई कसेतरीच करु लागल्याने गीता डॉक्टरांना बोलवायला बाहेर गेली. माई आण्णांकडे आशेने पाहू लागल्या. तसे आण्णांनी माईंचे डोके आपल्या मांडीवर घेतले. त्यांचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांन ते म्हणाले..."माई मी वचन देतो, मी इथेच..इथेच राहीन ग आपल्या गीताकडे.. अगदी कायमचा". तशा माई आण्णांकडे पाहून क्षीणपणे हसल्या.. आणि त्यांनी समाधानाने डोळे मिटले..पुन्हा कधी ही न उघडण्यासाठी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा