वाचाल तर वाचाल !

.
नहूष रिटायर झाला. रिटायरमेंटनंतर त्याचा पहिलाच वाढदिवस होता. एव्हाना तिन्ही मुले आपापल्या करियरमध्ये बऱ्यापैकी सेटल झाली होती. सरकारी नोकरी असल्यामुळे नहूषला भरपूर पेन्शन होती. दुर्दैवाने नहूषची पत्नी फार आधीच देवाला प्रिय झाली होती. तिन्ही मुलांनी नहूषला आपापल्या घरी बोलावले. पण बागवान , नटसम्राट चित्रपट पाहिलेल्या नहूषने नम्रपणे तिन्ही मुलांचा प्रस्ताव नाकारला. घरी कामाला नोकरचाकर होती. नहूषची तब्येतही व्यवस्थित होती. त्यात नहूषचा वाढदिवस आला. तिन्ही मुलांनी आपल्या पित्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करावा म्हणून पार्टी ठेवायचे योजले. एक आठवडा सुट्टी घेतली. इनवीटेशन कार्ड्सचे डिझाइन नहूषला दाखवले.

" बाळांनो , या पत्रिकांमध्ये एक गोष्ट लिहा की जर गिफ्ट आणत असाल तर एखादी मराठी कादंबरी आणा. घरात असलेली जुनी कादंबरीही चालेल. ऐतिहासिक कादंबऱ्या असतील तर उत्तम. " नहूष म्हणाला.

हे ऐकून मुलांना आश्चर्य वाटले. पण पित्याची सूचना अमान्य करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नव्हते. वाढदिवशी नहूषला भरपूर कादंबऱ्या गिफ्ट म्हणून मिळाल्या. वाढदिवस झाल्यावर नहूषच्या नातवंडांनी सर्व गिफ्ट उघडले. पूर्ण हॉल पुस्तकांनी भरून गेला.

" दादा , आपलं घर तर पुस्तकांचे दुकान झाले आहे. या वयात बाबा इतकी सारी पुस्तके वाचून काय करणार ?" सर्वात धाकटा मुलगा आपल्या मोठ्या भावाशी कुजबुजला.

नहूषच्या कानावर ही गोष्ट गेली. नहूषचे सर्व नातवंडे नहूषचे गुप्तहेरच होते. ते सर्व खडानखडा माहिती नहूषला पुरवत. नहूषला तिन्ही मुलांना आणि इतर सदस्यांना समोर बसवले.

" तुम्हाला वाटत असेल की हा म्हातारा या वयात पुस्तके वाचून काय करेल ? तर त्यामागे फार मोठी गोष्ट आहे. मला लहानपणीपासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. पण माझे वडील माझ्या लहानपणीच वारले. घरी खूप गरिबी होती. मला जॉब करावा लागला. जॉब करत करत मी शिक्षण पूर्ण केले. पुढे सरकारी नोकरी लागली. पण कामाचा व्याप खूप होता. खालचा दर्जाचा अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकारी सर्व काम माझ्यावर ढकलत. पुढे लग्नानंतर मुले झाली. त्यांची शिक्षणे , घरचा खर्च या सर्वांमध्ये मला वाचनाची आवड कधी जोपासताच आली नाही. सकाळी वृत्तपत्र वाचले त्यातच समाधान. रविवार भेटायचा पण त्यात बायकोमुलांसोबत काही क्षण घालवायचो. आता उतारवयात बायको सोबत नाही. देवाच्या कृपेने खिश्यात पैसा आहे. डोळे ठणठणीत आहेत. मग या वयात दिवसभर बसून टीव्ही , रेडिओ यांवर वेळ घालवण्यापेक्षा मला वाटले आयुष्यात राहून गेलेला छंद पूर्ण करावा. ही पुस्तके आहेत ना ययाती , मृत्युंजय , युगंधर. ही पुस्तके नाहीत तर वेगळेच सुंदर भावविश्व आहे. मला ही सर्व पुस्तके वाचायची आहेत. वाचन केल्यामुळे फक्त ज्ञान भेटत नाही तर बुद्धीचाही विकास होतो. आत्म्याला समाधानही भेटते. शिवाय मला लेखनही करायची खूप इच्छा आहे. मला मरण्यापूर्वी शक्य तेवढी पुस्तके वाचायची आहेत. ही पुस्तकेच खरी सांस्कृतिक संपत्ती आहे आपली. मराठी म्हणून जन्मलो आणि साहित्यक्षेत्रातील अनमोल रत्नेच वाचली नाहीत ही खंत मरताना नको म्हणून हा प्रपंच. एक लक्षात घ्या मुलांनो. आपल्या मुलांना व्हिडीओ गेम्स वगैरे घेण्यापेक्षा दर महिन्याला एक पुस्तक गिफ्ट करा. वाचनाची गोडी लागू द्या त्यांना. वाचनाने त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार येईल. विचारांमध्ये प्रगल्भता येईल. वाचाल तर वाचाल. " नहूष म्हणाला.

हे स्पष्टीकरण ऐकून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नजरेत नहूषबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला.

©® पार्थ धवन