वाट हळवी वेचताना... (भाग-३०)

बापलेकाची कहाणी!

आर्यनला गालातल्या गालात मंद हसताना पाहून ज्ञानदाने त्याला त्याच्या हसण्यामागे कारण विचारले तेव्हा तो काहीच उत्तरला नाही म्हणून तिनेही परत विचारले नाही आणि नंतर तिने तिच्या उपायाविषयी आर्यनला त्याचे मत विचारले, त्यावर आर्यननेही समर्थन दर्शविले व तो ज्ञानदाला म्हणाला, " ज्ञानदा तू उपाय खूप जबरदस्त दिलास पण चेअरपर्सन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मला कशाप्रकारे समजूत घालता येईल? त्याचबरोबर सी.ई.ओ.पदावरून नक्षत्रला बडतर्फ करण्याकरीता कोणते तात्पुरते कारण दाखवणे योग्य राहील? " 


" अं! मला वाटतं, तू आधी चेअरपर्सनला विश्वासात घे. त्यांच्याशी चर्चा कर. सी.ई.ओ. नक्षत्रची बाजू त्यांच्यापुढे स्पष्ट कर; जेणेकरून त्यांना कोणताही निर्णय घेणे सोपे होईल. ज्या ज्या प्रोजेक्टस् चे स्ट्रक्चर रायव्हल कंपनी कॉपी करण्याची शक्यता वाटतेय, त्या सर्व प्रोजेक्टस् मध्ये नाविन्य आणून त्या डील फायनल करण्यासाठी तुमची कंपनी सज्ज होईल, अशी हामी वर्तविणारा प्रस्ताव त्यांच्यापुढे सादर कर! त्याचबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची खास मिटींग अरेंज करून त्यांनाही विश्वासात घे! 


                याशिवाय कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बोनस अन् पगारवाढ देऊन त्यांच्याकडून अतिरिक्त वेळ काम करवून घेण्याचाही प्रस्ताव बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चेअरपर्सनपुढे सादर कर! हा प्लॅन नक्की यशस्वी होईल. तू आताच चेअरपर्सनशी कॉलवर बोलून घे आणि उद्या त्यांना सविस्तर संपूर्ण माहिती दे! आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सी.ई.ओ.च्या बडतर्फीसाठी विशेष कारण काय? तर त्यासाठी आपल्याला सांगता येईल की, त्यांचा परफॉर्मन्स फारसा लक्षवेधी नाहीये म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे अन् त्यांच्याऐवजी नव्या सी.ई.ओ.ची निवड करण्यात येत आहे. " ज्ञानदा म्हणाली. 


" ओह ग्रेट यार ज्ञानदा! तू माझा प्रॉब्लेम अगदीच सॉल्व्ह केलास. थॅंक्यू सो मच यार! तू थांब इथेच मी आमच्या कंपनीच्या चेअरपर्सनशी कॉलवर बोलून घेतो. " आर्यन बोलला आणि लगेच कॉल करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. तोपर्यंत ज्ञानदा तिच्या मोबाईलमध्ये टाईमपास करू लागली. 


काही वेळाने कॉल आटोपून हॉलमध्ये ज्ञानदाजवळ येऊन बसला अन् आनंदात ज्ञानदाला म्हणाला, " ज्ञानदा, तुला विश्वास होणार नाही पण चेअरपर्सनने उद्याच्या मिटींगसाठी होकार कळविला. शिवाय मी नक्षत्रची बाजू थोडीफार समजावून सांगितली तर त्यांनी अगदी शांत राहून यावर उपाय काढण्यालाही दुजोरा दिला. खरंच मिस्टर कर्वे फार सपोर्टिव्ह आहेत. " 


" मिस्टर कर्वे? " ज्ञानदाने गोंधळून विचारले. 


" हो, आमच्या कंपनीचे चेअरमन मिस्टर द्विग्विजय कर्वे! " आर्यनने खुलासा केला. 


" अच्छा! " ज्ञानदा म्हणाली. 


" मला वाटतं सर्व कर्वे मोठ्या मनाचे आणि समंजस असतात. " आर्यन कौतुकास्पद बोलला. 


" चल रे काहीतरीच! " ज्ञानदा हलकेच हसत बोलली. 


" हो तर! बघ ना... आमचे चेअरमन कर्वे ते ही समंजस आहेत आणि शिवाक्षीसुद्धा! " आर्यन ओठातलं हसू दाबत बोलला. तर ज्ञानदा थोडी हिरमुसली; कारण तिला वाटलं की, आर्यन तिचं कौतुक करेल पण त्याने शिवाक्षीचं नाव घेतलं अन् तिचा साधा उल्लेखही केला नाही. म्हणून आर्यनने परत ज्ञानदाला विचारले, " ज्ञानदा तू का तोंड पाडून घेतलंस गं? "


" काही नाही सहज... " ज्ञानदाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. 


" ज्ञानदा, तू पण ना... मी तुझं नाव नाही घेतलं म्हणून लगेच रुसलीस. अगं मी मस्करी करत होतो, समंजस कर्व्यांच्या यादीत तू तर अव्वल आहेस; म्हणूनच तर आज मला एका क्षणात तू उपाय शोधून दिलास. " आर्यन हसून बोलला त्यावर ज्ञानदाही मंद हसली. 


                त्यानंतर त्यांच्याजवळ दर्शन आणि शिवाक्षी आले. ते चौघे एकत्र काही वेळ गप्पा मारत बसले. त्यानंतर त्या दोघी मायलेकी त्यांच्या घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी आर्यन आणि ज्ञानदा पॅरेंट्स मिटींगसाठी एकत्रच दर्शनच्या शाळेत गेले. 


                आर्यनची चेअरपर्सनसोबत विशेष मिटींग असल्याने तो शाळेच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने पॅरेंट्स मिटींग अर्धवट सोडून त्याच्या ऑफिसला निघून गेला. त्याच्या गैरहजेरीत दर्शनची गार्डियन या नात्याने ज्ञानदाने मिटींग अटेंड केली. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना तिच्या आणि आर्यनच्या नात्याबद्दल गैरसमज झाला; म्हणून ते कुजबुज करू लागले. ज्ञानदा प्रत्येकाचे गैरसमज दूर करू शकणार नव्हती म्हणून तिनेही दुर्लक्ष केले व मिटींग आटोपताच ती दर्शन आणि शिवाक्षीला सोबत घेऊन तिच्या घरी रवाना झाली. 


                थोड्या वेळानंतर ती तिच्या खोलीत जाऊन फ्रेश झाली आणि साडी नेसून ती थोडी तयार झाली. त्यानंतर तिने शिवाक्षीला दर्शनची काळजी घ्यायला सांगितले व ती त्या दोघांना घरी ठेवून तिच्या कामानिमित्त बाहेर गेली. काही वेळानंतर तिने तिची गाडी एका प्रशस्त कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केली व ती त्या कंपनीच्या एंट्रन्सजवळ येऊन उभी राहिली. ती त्या कंपनीच्या आत जाण्यासाठी तिचं पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात तिथे आर्यन आला आणि त्याने तिला हाक मारली. 


क्रमशः

.......................................................... 

©®

सेजल पुंजे

२३/११/२०२२.


🎭 Series Post

View all