वाट हळवी वेचताना... (भाग-२९)

अखंड नात्याची कथामालिका...

                ज्ञानदाने आर्यनला त्याच्या चीडचीड करण्यामागे कारण विचारले पण तो बराच वेळ काहीही बोलला नाही; तेव्हा तिने त्याच्या हातावर स्वतःचा हात ठेवून, त्याला आश्वस्त केले अन् मन हलके करायला सांगितले. हळूहळू आर्यनही त्याचं मन रिते करायला लागला. 


तो म्हणाला, " ज्ञानदा, मी ज्या कंपनीत नोकरी करतोय, त्या कंपनीच्या सी.ई.ओ.नक्षत्र चव्हाण याने रायव्हल कंपनीशी हातमिळवणी केल्याचा मला आधी संशय होता; पण नुकताच माझ्या हाती काही पुरावे लागले आणि त्यातून माझा संशय खरा निघाला. आमच्या कंपनीचा सी.ई.ओ. आमच्या कंपनीतील माहिती इतर रायव्हल कंपनींना पुरवतोय; त्यामुळे आमच्या कंपनीला भविष्यात नक्कीच नुकसान भरावे लागणार. "


" बापरे! खरंच? मग तुझ्याकडे पुरावे असताना तू गप्प का आहेस? तू तातडीने यावर ऍक्शन का घेत नाहीये? तू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि कंपनीच्या चेअरपर्सनपुढे हा मुद्दा मांडायला हवा, असं मला वाटतं. " ज्ञानदा म्हणाली. 


" हो गं! पण... " आर्यन बोलता बोलता थांबला. 


" पण काय? " ज्ञानदाने परत प्रश्न विचारला. 


" पण त्याची तक्रार मी कशी करू मला काही कळत नाहीये. " आर्यन बोलला. 


" का? " ज्ञानदाने गोंधळून विचारले. 


" कारण तो माझा मित्र आहे. " आर्यन म्हणाला. 


" आर्यन तो तुझा मित्र असला तरी सध्या प्रश्न कंपनीचा आहे ना! तुझ्या मित्रामुळे कंपनीला नुकसान भोगावे लागेल ना! " ज्ञानदा म्हणाली. 


" मला माहिती आहे गं! म्हणून तर मला काही सुचेनासे झालेय ना! " आर्यन चिंताग्रस्त स्वरात बोलला. 


" बरं, मग आधी तू त्याच्याशी व्यक्तिगत पातळीवर का नाही बोलून पाहात? कदाचित त्यामुळे तरी काही उपाय निघेल. " ज्ञानदाने उपाय सुचविला. 


" मी तेसुद्धा करून पाहिलं; पण हाती निराशाच आली. म्हणजे त्याने मान्य केलं की, तो आमच्या कंपनीच्या रायव्हल कंपनीशी हातमिळवणी करून आजकाल त्यांचा गुप्तहेर असल्याप्रमाणे येथील बहुंताश गोपनीय माहिती तिकडे पुरवत आहे. शिवाय त्याला यात काही गैर वाटत नाहीये! " आर्यन म्हणाला. 


" किती निर्लज्ज माणूस आहे? एवढं करूनही त्याला त्याचा पश्चात्तापही वाटत नाहीये... " ज्ञानदा चिडून बोलली. 


" ह्म्म! पण मला वाटतं त्यातंही त्याची चूक नाहीये. " आर्यन त्याच्या मित्राची बाजू घेत बोलला. 


" असा कसा बोलू शकतोस तू आर्यन? " ज्ञानदाने न कळून विचारले. 


" अगं म्हणजे तो हे सगळं करतोय ते स्वेच्छेने नव्हे तर नाईलाजाने! " आर्यन गंभीर आवाजात बोलला. 


" नाईलाजाने? " ज्ञानदाने एक भुवई उंचावून विचारले. 


" हो! त्याला सध्या पैशाची खूप निकड आहे; कारण त्याच्या बायकोला आणि मुलीला कॅन्सर आहे. दोघींचीही अवस्था गंभीर असल्याने दोघींच्याही ट्रीटमेंटमध्ये उशीर व्हायला नको, डॉक्टरने हे स्पष्ट बजावले आहे. त्याने आधीच होम लोन घेतले असल्याने त्याचा बॅंक बॅलन्स नाहीच्या प्रमाणात आहे. शिवाय त्या दोघींना लागणारी औषधेही फार महागडी असतात; त्यामुळे तो खर्च कसा मेंटेन करावा त्याला सुचत नव्हते. दरम्यान त्याचा नाईलाज अचूक हेरून रायव्हल कंपनीने त्याच्यापुढे ऑफर ठेवली. ती ऑफर स्विकारण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय दिसत नसल्याने त्याने रायव्हल कंपनीशी हात मिळवला आणि तो त्यांना माहिती पुरवू लागला. " आर्यनने इत्थंभूत प्रकार ज्ञानदाला सांगितला. 


" ओह! सी.ई.ओ. सध्या कोणत्या मानसिक परिस्थितीत असेल याचा अंदाज आपल्याला लावता येणार नाही पण नक्कीच विश्वासघात करण्यासाठी त्याचंही मन धजावत नव्हतं असणार पण नाईलाज व्यक्तीकडून काहीही करवून घेऊ शकतो. " ज्ञानदा बोलली. 


" हो ना! म्हणून तर मला यावर काय मार्ग काढावा ते सुचत नाहीये. " आर्यन विचारात हरवून निराश होत बोलला. 


" आर्यन मला सांग, तुमच्या कंपनीचा सी.ई.ओ. कधीपासून रायव्हल कंपनीचा साथीदार झालाय? " ज्ञानदाने विचारले. 


" कदाचित गेल्या दोन आठवड्यापासून... " आर्यन म्हणाला. 


" म्हणजे कंपनीला फारसे असे नुकसान झाले नसणार. कंपनीने जे प्रोजेक्ट्स हाती घेतले होते, त्याचं स्ट्रक्चर रायव्हल कंपनीकडे असेल तरी त्या सर्व प्रोजेक्ट्सवर ताबडतोब नव्याने काम करता येऊ शकतं. इतर इन्व्हेस्टर्सशीही सलगी साधता येऊ शकते जेणेकरून रायव्हल कंपनीने त्यांना ऑफर्स देऊ केल्या तरी ते सर्व इन्व्हेस्टर्स रायव्हल कंपनीच्या ऑफर्स नाकारून आपल्याच कंपनीशी एकनिष्ठ राहतील.


                शिवाय राहिला प्रश्न सी.ई.ओ. नक्षत्र चव्हाण यांचा तर त्यांना तात्पुरते त्यांच्या सी.ई.ओ.च्या पदावरून बडतर्फ करता येईल तेसुद्धा अस्सल कारण उघड न करता तात्पुरते कारण दाखवून; त्यामुळे मिस्टर नक्षत्र चव्हाण यांची नोकरी आणि इमेज तर सुरक्षित राहणारंच पण त्यांना त्यांच्या कुटुंबाची देखभाल करायलाही पुरेसा वेळ मिळेल. " ज्ञानदा एकटीच बोलत होती आणि आर्यन शांत बसून तिचा एकूण एक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. 


                ज्ञानदाला बिझनेसमध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतानाही ती अगदी तज्ज्ञ व्यक्तीप्रमाणे आर्यनला उपाय सुचवत होती; त्यामुळे आर्यनला तिचे पार नवल वाटत होते. म्हणून तो तिच्याकडे गालातल्या गालात मंद हसून पाहत होता. 


क्रमशः

............................................................ 

©®

सेजल पुंजे

२३/११/२०२२.

🎭 Series Post

View all