वाट हळवी वेचताना... (भाग-२८)

अनोळखी वळणावरचा ओळखीचा प्रवास!

शाळेत घडलेला प्रकार दर्शन रात्री आर्यनला सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचं लक्ष नव्हतं. तो वेगळ्याच विचारात हरवला होता अन् लॅपटॉपवर काही काम करत होता. तेवढ्यात दर्शनच्याही ध्यानात आले की, आर्यन त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून त्याने पळत जाऊन आर्यनचा लॅपटॉप बंद करून स्वतःच्या हातात घेतला. त्यामुळे आर्यनची तंद्री भंगली व तो दर्शनला लॅपटॉप परत मागू लागला पण दर्शन ऐकेना. तो आर्यनला म्हणाला, " बाबा, मी मघापासून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय; पण तू सर्रास माझ्याकडे दुर्लक्ष करतोय. " 


" दर्शन, माझा लॅपटॉप परत दे. मी सध्या थोडा बिझी आहे. माझं आवरलं की, मी सर्वकाही ऐकणार तुझं पण सध्या मला माझा लॅपटॉप तू परत दे! " आर्यन बोलला. 


" नाही, मी नाही देणार लॅपटॉप परत! " दर्शन हट्टाला पेटला होता. 


" दर्शन, असा हट्ट नको करू आणि माझा लॅपटॉप परत दे लवकर! " हळूहळू आर्यनची चीडचीड व्हायला लागली. 


" नाही, बाबा! मी नाही देणार! " दर्शन लॅपटॉप छातीशी कवटाळत बोलला. 


" दर्शन! एकदा सांगितलं तर कळत नाहीये का तुला? नेहमीच का बरं तू हट्ट करत असतोस? एक साधी गोष्ट ऐकत नाहीस. मी लॅपटॉप मागितला ना तुझ्याकडे? एकदा नाही, दोनदा नाही, कितीवेळा परत मागितला तरीही तू परत दिला नाहीस. मी कामात आहे एवढं देखील लक्षात आलं नाही का तुझ्या? दे इकडे तो लॅपटॉप माझ्याकडे गपगुमान... " आर्यन चढ्या आवाजात दर्शनवर ओरडत होता. 


                आर्यन पहिल्यांदा दर्शनवर असा ओरडला होता म्हणून दर्शनला लगेच रडू कोसळले, त्याने हुंदका आवरून तो लॅपटॉप आर्यनच्या स्टडीटेबलवर ठेवला आणि तो पळतच खोलीतून बाहेर गेला. दर्शन खोलीतून निघून जाताच खोलीत भयाण शांतता पसरली अन् लगेच आर्यनला त्याची चुकी लक्षात आली. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला अन् तो खोलीतच डोकं पकडून बसला. 


                दुसरीकडे दर्शन हॉलमध्ये रडत रडत आला अन् तेवढ्यात कुणीतरी दार ठोठावले. दर्शनने दार उघडले तर त्याला नजरेपुढे शिवाक्षी आणि ज्ञानदा दिसल्या. त्यांना पाहताच त्याने त्याचे अश्रू पुसायला सुरुवात केली; पण तोपर्यंत त्या दोघींना दर्शन रडत असल्याचा अंदाज आला होता. त्या दोघीही त्याची विचारपूस करत होत्या पण तो काहीच सांगत नव्हता. तोपर्यंत आर्यनही हॉलमध्ये आला आणि दर्शनजवळ सोफ्यावर बसला. 


आर्यन दर्शनला म्हणाला, " दर्शू... आय ऍम सॉरी! मी तुला हर्ट करणार नव्हतो. मी तुला ओरडलो आणि तुझ्यावर रागावलो; पण तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी थोडा वेगळ्या विचारात हरवलो होतो आणि तेवढ्यात तू लॅपटॉप हिसकावून घेतला; त्यामुळे माझी चीडचीड झाली. आय ऍम सॉरी बाळा! प्लीज मला माफ कर! " 


                आर्यन माफी मागत होता पण दर्शन तरीही रडतच होता. आर्यनने दर्शनचे डोळे पुसले अन् तो वारंवार त्याची माफी मागत होता; पण दर्शन काहीच प्रतिसाद देत नव्हता. आर्यनही हिरमुसून गेला होता. म्हणून ज्ञानदाने त्याला नजरेनेच आश्वस्त केले आणि ती दर्शनची समजूत घालू लागली.


ज्ञानदाने समजूत घालताच हळूहळू दर्शन शांत झाला. त्यालाही त्याची चूक कळली; म्हणून त्याने रडणे थांबविले आणि तो आर्यनचा हात हातात घेत म्हणाला, " आय ऍम सॉरी बाबा! मला तुझ्या कामात डिस्टर्ब करायला नाही पाहिजे होतं. तू कामात होता हे मला माहीत असूनही मी तुझा लॅपटॉप हिसकावून घेतला आणि त्यामुळे तू हायपर झालास, हे मला आता कळलं. आय ऍम सॉरी बाबा, मी परत असं कधीच करणार नाही. "


" इट्स ओके! मला माहीत आहे तुझी काहीच चुकी नव्हती. तू तर मला शाळेत जे जे घडलं ते सांगत होतास आणि मी तुझं काहीच ऐकून न घेता तुझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा तू लॅपटॉप तुझ्या हातात घेतलास तेव्हा उगाच जास्त चीडचीड केली तुझ्यावर! " आर्यन दिलगिरी व्यक्त करू लागला. 


" नाही बाबा माझी चूक झाली. " दर्शन परत माफी मागू लागला. 


" ओह गॉड! आता तुम्ही दोघेही एकमेकांची माफीच मागत राहणार का? आता कळलं ना तुम्हाला की, चूक थोड्याफार प्रमाणात तुम्हा दोघांचीही झालीय मग काय आता उगाच स्वतःला दोषारोप करत आहात. एकमेकांची सॉरी एक्सेप्ट करा आणि परत एकमेकांना हर्ट होईल, असं वागू नका. इट्स सो सिंपल! " शिवाक्षी बोलली. तिच्या वाक्यावर ज्ञानदासह दर्शन आणि आर्यनही हसले.


                त्यानंतर ते चौघेही गप्पा मारत बसले. दर्शनने सगळ्यांसमोर शाळेत शिवाक्षीने कशी त्याची मदत केली, ते सांगितले. ते ऐकल्यावर आर्यनने शिवाक्षीचे खूप कौतुक केले. ज्ञानदालाही शिवाक्षीचा अभिमान वाटला. त्यानंतर दर्शन आणि शिवाक्षी टीव्हीवर कार्टून बघत बसले तर ज्ञानदा आणि आर्यन गप्पा मारत बसले. 



क्रमशः

............................................................... 

©®

सेजल पुंजे 

२३/११/२०२२.


🎭 Series Post

View all