वाट हळवी वेचताना... (भाग-२७)

बापलेकाची कहाणी!

शिवाक्षी दर्शनच्या वर्गमित्रांना दम देत होती त्यामुळे सर्व मुले तिचं ते महाकालीचं रुप पाहून पार घाबरून गेले अन् मुळमुळ रडू लागले. तेव्हा दर्शनलाच त्यांची कीव आली आणि तो मध्यस्थी करत शिवाक्षीला म्हणाला, " ताई, इट्स ओके! ते मस्करी करत होते माझ्याशी. तू एवढी रागवू नकोस. ते बघ, खूप घाबरले आहेत. म्हणून तू शांत हो ना! " 


" बघितलंत? तुम्ही त्याला एवढं छळूनही तो माझ्यापुढे तुमची बाजू मांडतोय; पण तुम्हाला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाहीये ना? अजूनही दगडासारखे स्तब्ध उभे आहात. साधं सॉरी म्हणायला तुमचा इगो आडवा येतोय. " शिवाक्षी रागीट कटाक्ष टाकून बोलली. 


" शिवा ताई! इट्स ओके ना! मैत्रीत सॉरी वगैरे नसतं ना! म्हणून तू शांत हो बघू! " दर्शन शिवाक्षीची समजूत काढत बोलला. 


" दर्शन वेड्या, तूच ह्यांना मित्र मानतोस पण या स्वार्थीं मुलांना तुझ्या मैत्रीची पर्वा तर नाहीच आहे पण साधी जाणीवही नाहीये. " शिवाक्षी चिडचिड करत बोलली. 


" ताई! जाऊ दे ना! तसं पण बाबा बोलतो की, मैत्री हा व्यवहार नसतो... म्हणजेच मी एखाद्याला मित्र मानलंय तर त्या व्यक्तीने माझ्या मैत्रीचा स्विकार करायलाच हवा, असं बंधन नसतं. कुणी कुणाशी मैत्री करायची हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. म्हणून आपण ज्या व्यक्तीला मित्र मानतो त्या व्यक्तीनेही कळत-नकळत आपल्याला त्रास दिला तर त्यामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी घृणा वा द्वेष ठेवू नये; कारण राग, द्वेष, मत्सर, घृणा यामुळे इतरांचं काहीच अहित होत नसतं तर याउलट आपल्याच मनाला नकारात्मकता कवटाळत असते. सो, लेट इट बी! " दर्शन नम्रपणे बोलला अन् त्याचे शब्द ऐकून तिथे उपस्थित त्याचे वर्गमित्र अवाक् झाले. 


                त्याच्या वर्गमित्रांना त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप वाटू लागला. त्यामुळे त्या सगळ्यांनी दर्शनची माफी मागितली. दर्शननेही एका क्षणाचाही विलंब न करता त्यांना माफ केले; पण शिवाक्षी अद्याप रागाने धुसफूस करत होती. म्हणून त्याच्या वर्गमित्रांनी त्यांचे कान पकडून नम्रपणे शिवाक्षीचीही माफी मागितली. दर्शननेही नजरेनेच तिला त्याच्या वर्गमित्रांना माफ करायला सांगितले. त्यामुळे शिवाक्षीनेही त्या मुलांना माफी दिली. 


एव्हाना ती बऱ्यापैकी शांत झाली होती; म्हणून समजुतीच्या सुरात ती त्या मुलांना म्हणाली, " हे बघा, लिंबू-टिंबू आणि इतर चिल्यापिल्यांनो माझं तुमच्याशी काही वैर नाही पण मला तुमचं दर्शनशी वागणं पटलं नाही म्हणून मी तुमची कान उघाडणी केली. मला सांगा, आज जर दर्शनच्या ऐवजी तुमच्यापैकी कुणी एक असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तुम्ही निदान एक दिवस तरी तो जगतोय तसं आयुष्य जगू शकणार का? एक दिवस तरी तुमच्या आईपासून दूर राहू शकणार का? नाही ना? किंबहुना तुम्ही त्याच्या ठिकाणी स्वतःला इमॅजिनही करू शकणार नाही मग तुम्ही दर्शनला का म्हणून असे शब्द वापरून त्रास देतात? 


                हे बघा, तुम्ही सगळे माझ्यासाठी माझ्या लहान भावडांसारखे आहात; म्हणून तुम्हाला सांगतेय की, आपण एखाद्याला कशी वागणूक देतो त्यावरून एखाद्याच्या मानसिकतेवर परिणाम होत नाही ना, हे पाहत चला! बोलण्याआधी विचार करत जा रे! मला माहीत आहे की, तुम्ही सर्वजण सध्या लहान आहात आणि म्हणूनच या वयापासूनच तुम्हाला योग्य-अयोग्याची जाण असायला हवी, असं मला वाटतं! कारण तुमचं बालपण सुखात जातंय म्हणून दुसऱ्याचं बालपण हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही किंवा एखाद्याला एवढे वाईट अनुभव देऊ नका की, त्याला भावी आयुष्यात बालपण वा आठवणींचा उल्लेख होताच अंगावर काटा येईल. 


                हे वय आनंद लुटण्याचं आहे. म्हणून मौजमजा करा फक्त नकारात्मकता तुमच्या पवित्र मनाला शिवू देऊ नका. कळलं ना लिंबू-टिंबू आणि बाकी चिल्यापिल्यांनो? " 


" हो! " सर्व एक सुरात बोलले. 


" हो गं ताई आणखी किती क्लास घेणार आहेस? पुरे की आता! " दर्शन मस्करी करत बोलला. 


" आगाऊ बेण्या! लबाड! तुझीच बाजू घेत होती ना मी! " शिवाक्षी दर्शनचा कान खेचत म्हणाली. 


" अगं... अगं... तू चिडतेस कशाला? मी मस्करी करत होतो. " दर्शन बोलला. 


" हो का हुशार! जा गपचूप, तुझ्या वर्गात जा! आलाय मोठा मस्करी करणारा चष्मेबहाद्दर! " शिवाक्षी दर्शनचा कान सोडत बोलली. 


" ह्म्म बरं! जातो मी! चला रे आपण सर्व जाऊ वर्गात आता ही सुट्टी काही वेळात संपेलच! " दर्शन म्हणाला. त्याला दुजोरा देत त्याचे वर्गमित्रही गेले. शिवाक्षी मात्र वर्गात पळत जाणाऱ्या दर्शनकडे पाहून गालातल्या मंद हसली. ती नेहमीप्रमाणे आजही त्याच्या समजंसपणाने भारावून गेली होती अन् मनोमन त्याचं कौतुक करत होती. म्हणूनच दर्शनच्या विचारशक्तीला आणि आर्यनने दर्शनवर केलेल्या संस्कारांना दाद देत ती तिच्या वर्गात निघून गेली. 


क्रमशः

.......................................................... 

©®

सेजल पुंजे

२३/११/२०२२.



🎭 Series Post

View all