Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-२५)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-२५)

ज्ञानदा मंद स्वरात बोलली, " आर्यन! शिवाक्षी मला मम्मा बोलते कारण तिला आवडतं मला मम्मा अशी हाक मारायला; पण प्रत्यक्षात तिला ठाऊक आहेत तिचे आई-बाबा ज्ञानेश्वरी ताई आणि कनिष्क जिजू होते म्हणून... आणि आमचं नातं मायलेकीपेक्षा मैत्रिणीसारखं नक्कीच आहे पण ते आधीपासूनच आहे. ती माझ्या अंगाखांद्यावर वाढलीय त्यामुळे कदाचित ती माझ्याशी अटॅच असावी, असं मला वाटतं. म्हणून मी तिला योग्य वातावरणात वाढवण्यात किती प्रमाणात यशस्वी झालीय अन् किती नाही तेच कळत नाही; कारण बरेचदा नाईलाजाने मला तिच्यावर रागवावं लागतं, बरेचदा तिच्या इच्छांविरूद्ध निर्णय घ्यावे लागतात; त्यामुळे बऱ्याच अंशी मी तिला दुखावत असेल, असं मला कायम वाटतं. " तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 


" इट्स ओके! तुझ्या प्रयत्नांना यश मिळाले की नाही यापेक्षा तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतेय, हेच खूप आहे. शिवाय मान्य आहे की, कधीकधी तू शिवाक्षीच्या मनाविरुद्ध वागत असशील पण त्यामागे तुझा योग्यच हेतू असतो ना... कदाचित हे शिवाला आता नाही कळणार पण जसजशी ती मोठी होईल, तिला ते ही कळेल. म्हणून तू स्वतःच्या मनात काहीच शंका ठेवू नकोस. तू तुझी जबाबदारी पार पाडत राहा आणि ट्रस्ट मी, शिवाचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. ती सुद्धा काळजी करते तुझी फक्त तिला ते व्यक्त करायला जमत नाही. म्हणून तू काहीच नकारात्मक विचार करू नकोस. " आर्यन ज्ञानदाची समजूत काढत बोलला. 


" ह्म्म! मी आता पॉझिटिव्ह विचार करणार. थॅंक्यू आर्यन, नेहमीप्रमाणेच आजही बुस्ट अप केल्याबद्दल! " ज्ञानदा बोलली. 


" अरे त्यात काय गं एवढं... बरं असो! पण तुझं भारी चाललंय हं! आर्मी सोडल्यानंतर तू तुझं दुसरं स्वप्न जगतेय डान्स टीचर होण्याचं! " आर्यन म्हणाला. 


" ह्म्म! आवड होती आफ्टरऑल मला डान्सची! " ज्ञानदा बोलली. 


" हो, माहितीये मला! " आर्यन मंद हसत बोलला. 


" ह्म्म! बाय द वे सध्या तुझं काय सुरू आहे? म्हणजे आर्मी सोडल्यापासून तू काय करतोयस? " ज्ञानदाने विचारले. 


" सध्यातरी मी डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. " आर्यन म्हणाला. 


" ओह खरंच? " ज्ञानदाने आश्चर्याने विचारले. 


" अगं हो! यात एवढं आश्चर्याने विचारण्यासारखं काय आहे? " आर्यन मंद हसून बोलला. 


" अं... ती कंपनी फार प्रसिद्ध आहे ना आपल्या महाराष्ट्रात; त्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीत तुझं उच्च पदस्थ असणं म्हणजे प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी! " ज्ञानदा मंद हसत बोलली. 


" ह्म्म, तू पण ना अगदी आधी सारखीच आहे! " आर्यन म्हणाला. 


" म्हणजे? " ज्ञानदाने गोंधळून विचारले. 


" माझ्या क्षुल्लक गोष्टीचंही उगाच भरमसाठ कौतुक करणारी... " आर्यन मस्करी करत बोलला. 


" असं नाही हं काहीच! मी उगाच वगैरे कौतुक करत नाही. " ज्ञानदा बोलली. 


" हो गं! मस्करी करतोय मी तुझी! " आर्यन म्हणाला. 


" ह्म्म! " ज्ञानदाने हुंकार भरला. 


त्यानंतर ते दोघेही थोडा संवाद साधत बसले होते; तेवढ्यात तिथे शिवाक्षी आणि दर्शन आले. दर्शनला बघताच आर्यन म्हणाला, " झालं ना खेळून की आणखी बाकीच आहे? "


" झालं! " दर्शन म्हणाला. 


" बरं! मग जायचं ना आता घरी? " आर्यनने दर्शनला विचारले. 


" हो जायचं! " दर्शन आनंदात म्हणाला. 


" ह्म्म, चला मग! " आर्यन म्हणाला. 


                त्यानंतर ते दोघे बापलेक बाहेर आले. शिवाक्षी आणि ज्ञानदा त्या दोघांना निरोप द्यायला बाहेर आल्या. दर्शन कारमध्ये बसताच शिवाक्षीने त्याला परत घरी येण्याचे आवाहन केले. त्यावर तो बोलला की, पुढच्या वेळी शिवाक्षीने त्याच्या घरी यावे. त्याच्या वाक्याला शिवाक्षीनेही दुजोरा दिला. त्यानंतर शिवाक्षी आणि ज्ञानदाचा निरोप घेऊन ते दोघेही तेथून त्यांच्या घरी गेले. घरी पोहोचताच ते दोघेही लगेच त्यांच्या खोलीत झोपायला गेले. दर्शन फार दमला होता म्हणून लगेच त्याला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली; पण आर्यन मात्र नेहमीप्रमाणेच बेडवर कुस बदलत होता. 


                कित्येक वर्षानंतर ज्ञानदाची भेट झाल्याचा आनंद त्याला होता पण तिच्या ताई आणि जिजूंच्या निधनाची वार्ता मिळाल्याने तो दुःखी झाला होता. शिवाय लहानग्या वयात शिवाक्षी पोरकी झाल्यानेही त्याचं मन खिन्न झालं होतं; पण शिवाक्षीला ज्ञानदासारखी एक आई अन् मावशी लाभल्याचं समाधानही वाटलं. त्याचबरोबर ज्ञानदाच्या डोळ्यात शिवाक्षीप्रती जिव्हाळा पाहता तो खरंच भारावून गेला होता. 


तेवढ्यात आर्यनने कुस बदलली तर त्याला दर्शनचा चेहरा डोळ्यापुढे दिसला. तो दर्शनच्या चेहऱ्याकडे पाहताना शिवाक्षीच्या आयुष्याला उद्देशून मनोमन पुटपुटला, " खरंच देव कुणाच्या नशिबात काय लिहेल काही सांगता येत नाही! लहानश्या जीवांनाही किती ते भोग भोगावे लागतील काय माहित! पण असो शिवाक्षीकडे ज्ञानदा आहे आणि त्यामुळे लहान वयातच खंबीर होण्याचं प्रशिक्षण तिला तीच देईल, हा मलाही विश्वास आहे. " त्याने खोल श्वास घेऊन सकारात्मक दृष्टीकोन बाळगून उसासा दिला अन् विचार करतच तो झोपी गेला. 


क्रमशः

................................................................. 

©®

सेजल पुंजे

२२/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//