Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-२४)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-२४)

आर्यन काहीच प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यावर ज्ञानदा परत त्याला उद्देशून म्हणाली, " आर्यन! तुझ्या दर्शिकाला तिच्या बोलक्या 'आरू'चा असा निर्विकार आर्यन होणे कधीच अपेक्षित नव्हते असेल ना? अरे दर्शनला तू सुरक्षित वाढवतोय, त्याच्यावर तू योग्य संस्कार करतोयस पण तुझं काय? "


" माझं असं आता काही अस्तित्व राहिलंच नाहीये ज्ञानदा... तो दर्शिकाचा 'आरू' दर्शिकासवेच अनंतात विलीन झाला, आता जो आहे तो एका आठ वर्षाच्या मुलाचा बाप आर्यन आहे अन् ह्या आर्यनच्या जगण्यावर आता फक्त एकाच व्यक्तीचा अधिकार आहे, तो म्हणजे दर्शनचा! कारण मी दर्शिकाला वचन दिलंय दर्शनला सुयोग्य बालपण देण्याचं अन् तिला दिलेल्या त्या वचनाला मी जागलंच पाहिजे. " आर्यन शून्यात नजर घालून बोलला. 


" आर्यन पण... " ज्ञानदा आर्यनला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिला संधीच दिली नाही. तो म्हणाला, " काही पण वगैरे शिल्लक नाहीये ज्ञानदा... आता या विषयावर कोणतीच चर्चा नकोय मला... प्लीज! " 


" बरं! " ज्ञानदाने माघार घेतली. 


" ह्म्म! ज्ञानदा तू माझ्याबद्दल जाणून घेतलंस पण माझ्याही मनात सध्यातरी बरेच प्रश्न भिरभिरत आहेत आणि त्या सगळ्यांची उत्तरे मला जाणून घ्यायची आहेत; अर्थात जर तुझी काही हरकत नसेल तरच... " आर्यन ज्ञानदावर नजर रोखत म्हणाला. 


" अर्थातच माझी काही हरकत नाहीये आर्यन; पण तुझ्या मनात कोणते प्रश्न आहेत? " ज्ञानदाने आश्चर्याने विचारले. 


" शिवाक्षी आणि तुझ्याबद्दल विचारायचे आहेत प्रश्न... ज्ञानदा तू लग्न कधी केलंस? आणि शिवाक्षी तुला मम्मा बोलते; पण ती दर्शनपेक्षा चार वर्षाने मोठी आहे. हे कसं काय? मला आठवतं, आपण एकाच रेजिमेंटमध्ये होतो. दर्शिका आणि माझं लग्न झालं तेव्हासुद्धा तू अविवाहित होतीस. आमचं लग्न झाल्यावर एक वर्षांनंतर काहीही न कळवता तू राजीनामा दिला होतास; त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट तुटला. मग तू राजीनामा दिल्यानंतर लग्न केलं असेल तर शिवाक्षी सुद्धा दर्शनच्याच वयाचीच असायला हवी होती पण असं काहीच नाहीये. त्यामुळे नक्की काय बाब आहे ते सांगशील का? मला माहीत आहे, मी अति व्यक्तिगत प्रश्न विचारलाय; म्हणून जर तुला गोपनीय ठेवायचं असेल तर काही हरकत नाही. " आर्यन बोलला. 


" नाही, असं काही नाहीये! खरंतर माझं लग्न नाही झालंय आर्यन, मी अजुनही अनमॅरीड आहे आणि शिवाक्षी ती माझी बहिणलेक आहे. " ज्ञानदा म्हणाली. 


" काय? म्हणजे शिवाक्षी ज्ञानेश्वरी ताईची मुलगी आहे? मग ती तुला मम्मा अशी हाक का मारते? " आर्यनने परत प्रश्न विचारले. 


" ह्म्म! मी आर्मी सोडली त्यामागे कारण होतं. ज्ञानेश्वरी ताई आणि कनिष्क जिजूंचा गंभीर अपघात झाला आणि त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची खबर मला मिळाली अन् क्षणात सगळं चित्र धुसर झालं. माझ्या आई-बाबांनी मला बोलावून घेतलं कारण शिवाक्षी तिच्या आई-बाबांपेक्षा माझ्याशी अटॅच होती. त्यामुळे पाच वर्षाच्या ज्ञानदाला सांभाळणे माझ्या आई-बाबांना अवघड जात होतं. म्हणून तात्काळ त्यांनी मला बोलावून घेतले.


                माझ्याही डोक्यात फक्त शिवाक्षीचाच विचार होता, मी त्यावेळी फक्त तात्पुरती रजा घेतली अन् माझ्या घरी गेली; पण तिथे गेल्यावर पुढ्यात असलेल्या जबाबदाऱ्यांना पाठ दाखवताच आली नाही. म्हणून नाईलाजाने मी आर्मी सोडली कारण मला शिवाक्षीला तिच्या आई-वडिलांची कमतरता भासू द्यायची नव्हती अन् म्हणून मी शिवाक्षीसह नवीन संसार थाटला. " ज्ञानदाने तिचा भूतकाळ सविस्तर सांगितला. 


" ज्ञानदा! एवढं सगळं घडलं आणि तू साधी खबरही दिली नाहीस? अगं मित्र होतो मी तुझा! अन् तू अशी निभावलीस मैत्री? " आर्यन बोलला. 


" सॉरी आर्यन! पण त्यावेळी माझीच मला शुद्ध नव्हती. खरंच मला नाही सुचलं काहीच... " ज्ञानदा भावूक होत म्हणाली. 


" ह्म्म! समजू शकतो मी! असो... मला वाटतं, तुझा निर्णय योग्य ठरला. तू शिवाक्षीला तिच्या खऱ्या आई-वडिलांची उणीव भासूच देत नाहीयेस, हे स्पष्ट जाणवतं. " आर्यन बोलला. 


" काय माहित... मी माझ्या परीने प्रयत्न करतेय; पण शेवटी तिच्या आई-वडिलांच्या प्रेमाची जागा मी कशी भरून काढू शकणार ना... " ज्ञानदा बोलली. 


" हो मान्य आहे! पण ती तुला मम्मा बोलते, तुमच्या मायलेकीचं नातं अगदी खेळीमेळीचं आहे. तुम्ही मैत्रिणीसारख्या एकमेकींशी वागता. एवढेच नव्हे तर तुमचं नातं फार लाघवी वाटतं, त्यात बरेच रुसवे-फुगवे असतील तरी प्रेम भरभरून असल्याचं निदान माझ्यातरी निदर्शनास आलं; त्यामुळे नक्कीच तू तुझी जबाबदारी चोख पाडत आहेस, असं मला वाटतं. " आर्यन बोलला; पण ज्ञानदा गप्पच बसून होती. आर्यनचे शब्द तिला सुखावत होते पण तिच्या आणि शिवाक्षीच्या नात्याबद्दल तिला वाटणारी साशंकता, इनसेक्युरिटी यामुळे तिचा कंठ दाटून आला होता. म्हणून काहीही न बोलता ती गप्प राहून तिच्या भावनांवर संयम साधत होती. 


क्रमशः

......................................................... 

©® 

सेजल पुंजे

२२/११/२०२२.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//